मारूती जेव्हा “मिडलक्लास” झाली तेव्हा लक्झरी “सॅंट्रो” मुळे आली..आज सॅंट्रो बंद झाली..

एक जमाना होता, जेव्हा कित्येकांसाठी कार घेणं सोडा कारमध्ये बसणं सुद्धा फार मोठी गोष्ट होती. कुणाचं लग्न बिग्न असलं किंवा अचानक काय प्लॅन ठरला की, चाळीतून निघणाऱ्या सार्वजनिक कारमध्ये बसायचं आणि पुढचे दोन तीन दिवस ‘गाडीत बसलो’ याच हवेत तरंगायचं.

पुढं जागतिकीकरण झालं, लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली, कारच्या किंमतीही परवडण्याजोग्या झाल्या. आता मध्यमवर्गाचाही उच्च मध्यमवर्ग झाला होता, त्यामुळं कार घेणं जमत होतं. मारुती ८०० चं मार्केट तर होतंच, पण त्याहीपेक्षा थोड्या मोठ्या आणि स्वतःच्या गाड्या लोकांच्या बकेट लिस्टमध्ये होत्या.

बऱ्याच कंपन्यांनी हे मार्केट ओळखलं आणि वेगवेगळ्या गाड्या बाजारात आल्या. पण या गर्दीत एक कार लोकांना आपली वाटली. सध्याच्या पिढीला कोरिया म्हणलं की, बीटीएस आणि किम जोंग उन आठवत असला,

 तरी एका पिढीला मात्र कोरिया म्हणलं की, ह्युंदाई कंपनीच आठवते आणि त्याला कारण होतं 

सँट्रो गाडी.

पाच जणांचं कुटुंब आरामात बसू शकतं, गाडीला उंची चांगली असल्यानं रुबाब होऊ शकतो आणि स्वतःच्या गाडीचा एसी जास्त थंडगार असतो… याची जाणीव लोकांना ‘सँट्रो’ मुळं झाली. 

शिक्षण झालं की, नोकरी करायची, लग्न करायचं आणि मग सँट्रो घ्यायची, हे असं स्वप्न लोकांनी पाहावं एवढी सँट्रो लोकप्रिय झाली होती.

आज या गाडीची आठवण काढायचं कारण म्हणजे, ह्युंदाईनं जवळपास २३ वर्षांनंतर सँट्रोचं प्रॉडक्शन बंद करण्याचा निर्णय घेतलाय. 

या मागचं कारण आणि सॅंट्रोचा इतिहास माहिती असणं, सँट्रोच्या प्रेमापोटी महत्त्वाचं आहे.

सँट्रो मार्केटमध्ये आली १९९८ मध्ये. एका कोरियन कंपनीनं भारतात एंट्री मारणं सोपं नव्हतं. कारण लोकांना परवडणाऱ्या आणि विश्वासार्ह असणाऱ्या ब्रँडच्या गाड्या आधीच मार्केटमध्ये होत्या. लोकांची प्राथमिक गरज गाडी असणं आणि तीचा खर्च परवडणं एवढीच होती. त्यामुळं आपली गाडी लोकांपर्यंत पोहोचवायची कशी आणि त्यासाठी गाडीचं नाव काय ठेवायचं हा फार मोठा प्रश्न होता.

पण ह्युंदाईवाल्यांनी खुंखार डोकं लावलं, त्यांना माहित होतं की, भारतीय मार्केटमध्ये उतरताना नाव तगडं पाहिजे. या नावाचा विचार करण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांवर लोडही तगडा येणार. म्हणून हे काम एकदम रिलॅक्समध्ये करायला यांनी कार्यकर्त्यांना फ्रान्समध्ये पाठवलं.

तिथल्या ‘सेंट ट्रोपेझ’ शहरातल्या एका आलिशान रिसॉर्टमध्ये त्यांचा डेरा पडला. सेंट ट्रोपेझ म्हणजे ‘गोवा अल्ट्रा मॅक्स प्रो.’ इथं सगळं निवांत आणि तेवढंच ग्लॅमरस.

खरंतर असल्या वातावरणात काम करणं हाच मोठा लोड असला पाहिजे.

पण त्या कार्यकत्यांनी पण एक स्कीम केली. गाडीला साधं, सोपं पण ग्लॅमरस नाव दिलं.. सँट्रो.

सेंट ट्रोपेझची पहिली दोन अक्षरं घेऊन.. रीतसर विषय बसवला.

नुसतं नाव देऊन गोष्टी विकत नसतात आणि लाखातल्या गोष्टींसाठी फक्त नाव नाय चेहराही पाहिजे. ह्युंदाईनं सँट्रोसाठी जाहिरात केली आणि त्यातलं मॉडेल होता शाहरुख खान. एसआरकेच्या डीडीएलजेची हवा अजून ओसरली नव्हती, त्याचं स्टारडम फुल फॉर्ममध्ये होतं आणि त्यातच सँट्रोनं हात धुवून घेतले.

चांगल्या उंचीची, डौलदार वाटणारी सँट्रो हातोहात खपली. १९९८ मध्ये गाडीत एसी आणि बाकीचे फीचर्स दिल्यानं, त्यात बजेट फ्रेंडली असल्यानं कित्येकांनी सँट्रो घेण्याला पसंती दिली. या गाडीमुळं लोकांचा ह्युंदाईवर विश्वास बसला आणि खपही चांगलाच वाढला.

सँट्रो खपत होती म्हणून त्याच्यात आणखी तीन मॉडेल्स ह्युंदाईनं आणली. ज्यांची नाव होती, ZipPlus, ZipDrive, Xing.

त्या काळच्या पोरांमध्ये जो नाव न वाचता मॉडेल ओळखू शकेल, त्याची इज्जत वाढायची.

नुसत्या सँट्रोचं अनेक वर्ष प्रॉडक्शन केल्यानंतर, २०१८ मध्ये ह्युंदाईनं न्यू जनरेशन सँट्रो मार्केटमध्ये आणली. बीएस सिक्स इंजिन आणि हायटेक फीचर्स असलेल्या या गाडीची किंमत चार ते साडेपाच लाखांमध्ये गेली.

नव्या सँट्रोमध्ये सुविधा जास्त होत्या, लूक बदलला होता… पण जुनं ते सोनं असतंय, हे मात्र ह्युंदाई विसरलं.

नव्या मॉडेलचा जेवढा खप होईल अशी त्यांची अपेक्षा होती ती फेल गेली. अल्टो पुढं ही गाडी फारशी टिकलीच नाही. गेल्या चार वर्षात नव्या सँट्रोची फक्त १.४६ लाख युनिट्सच विकली गेली. हे गणित ह्युंदाईला परवडेना झालेलं. दुसऱ्या बाजूला क्रेटा, व्हेन्यू आणि आय टेनची सिरीज त्यांना बक्कळ पैसा मिळवून देतायत. म्हणूनच त्यांनी सँट्रोचं प्रॉडक्शन बंद करण्याचा निर्णय जाहीर केला.

आता नवी सँट्रो रस्त्यांवर दिसेलही, पण जिला बघितलं की बालपण आठवेल अशा सँट्रो क्वचितच दिसतील. दिसल्या तरी पार्किंगमध्ये धूळ खात असतील… 

काचेवरच्या धुळीत ‘आता मला पुसा’ हे लिहायच्या आधी काही मिनिट का होईना आठवणीत रमा.. कारण ती सॅंट्रोच होती, जिनं आपल्याला आपल्या गाडीत बसायचं सुख दिलं, एसीची थंडगार हवा जाणवू दिली आणि मेन म्हणजे, आपल्यालाही गाडी घ्यायची हे स्वप्न बघण्याची सवय लावली आणि म्हणून सँट्रो भारी होती…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.