कोल्हापूरच्या वडणगे या छोट्या गावातून आलेली मी आज मुंबईत रेल्वे चालवतेय.

जेव्हा एक दोन प्रवासी मागे बसलेले असतात तेव्हा सामान्य टू व्हीलर ड्रायव्हरलाही टेन्शन असत. टेन्शन पेक्षा ती एक जबाबदारी असते. इथे आमच्यासारख्या लोको पायलटला हजारो लोकांना घेऊन प्रवास करायचा असतो. त्यामुळे या गोष्टीचे टेन्शन नक्की असतं पण त्या ही पेक्षा ही जबाबदारी अधिक असते.

मी तन्वी चौगुले नुकतीच पश्चिम रेल्वेत लोको पायलट म्हणून रुजू झाली आहे.

आणि ही आहे माझी गोष्ट…

परिघाबाहेरील करिअरचे आकाश शोधणाऱ्या आणि अथक परिश्रमातून तिथंपर्यंतचे ध्येय गाठणाऱ्या मुलींच्या पंक्तीत आज माझ नाव समाविष्ट झालं याचा मला अभिमान आहे. जिल्ह्यातील पहिली महिला लोको पायलट होण्याचा बहुमानही या निमित्ताने कोल्हापूरला मिळाला.

मी कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे या छोट्या गावातील मुलगी. 

माझं कुटुंब शेतकरी आहे. वडणगे गावातल्याच शाळेत माझ सातवीपर्यंतचे झालं. शहरातील एमएलजी शाळेतून माध्यमिक शिक्षण तन्वीने पूर्ण केले. करिअर निवडताना मेकॅनिकलची आवड होती त्यामुळे अभियांत्रिकेचे शिक्षण न्यू पॉलिटेक्निक आणि डॉ. डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, आकुर्डी(पुणे) इथे पूर्ण केलं.

महाविद्यालयीन जीवनापासूनच करिअरची वेगळी वाट निवडण्याचे स्वप्न मी उराशी बाळगले होते. मेकॅनिकल क्षेत्र निवडले तरी इतर ठिकाणी परीक्षा आणि संधी शोधत रहायचे.

वर्तमानपत्रे, तज्ज्ञांची व्याख्याने यामध्ये नवं काही काहीतरी शोधायचे. काही दिवसांनी रेल्वे खात्यात लोकापायलट या पदासाठीची जाहीरात मला दिसली. यासाठी अर्ज केला आणि त्या परीक्षेची तयारी सुरु केली. परीक्षेसोबत या पदासाठी मानसिक सक्षमतेचीही चाचणी द्यावी लागते. 

हजारो प्रवाशांचा जीव लोको पायलटच्या हातात असल्याने तसेच इमर्जन्सीमध्ये येणाऱ्या प्रसंगात त्वरीत निर्णय घेणे, प्रसंगावधान राखणे यासाठी मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक असते. पूर्व, मुख्य आणि मानसिक चाचणी या परीक्षा मी पास केल्या. आणि प्रशिक्षणाच्या दिशेने माझा प्रवास सुरू झाला.

आजही अनेक शहरातील मुलांना जनजागृती नाही याची खंत वाटते. कारण या क्षेत्रात मराठी मुलांची कमी आहे.

आपल्या कोल्हापूर स्टेशनवर गेलं तरी एकही अधिकारी मराठी दिसणार नाही. मला मुंबई लोकलला काम करायची इच्छा होती. ती पूर्ण झाली. लोकल थांबली की मुंबई थांबते त्यामुळे कामात दिरंगाई होणार नाही, याची काळजी घेत काम मला आता कामाची सुरुवात करायची आहे.

या पदासाठी आवश्यक असलेले मनोधैर्य मला माझ्या ग्रामीण जीवनशैलीने दिले. या पदासाठी अंतिम निवड झालेल्या देशातील तीन मुलींमध्ये मला स्थान मिळाल्याचा आनंद आहे. या सर्व अभ्यास आणि प्रवासात कुटुंबाची साथ म्हणजे माझ्यासाठी मोलाचा दगड ठरला. 

महिलांच्या गाडी चालवण्यावर कधीही विश्वास ठेऊ नये अस कुत्सितपणे ऐकवल जात. पण, आता माझ्या हाती तर चक्क भलीमोठी रेल्वे आहे. आणि ती यशस्वीरीत्या चालवून मी ही उक्ती खोडून टाकण्याचा नक्की प्रयत्न करेन.

शब्दांकन : पूजा कदम 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.