तिकीट नाय मिळालं, तर मनोहर पर्रिकरांचा मुलगा कठोर निर्णय घेणार म्हणतोय

देशाचे माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे देशातल्या राजकारणातलं सुसंस्कृत, मितभाषी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखलं जायचं. पर्रिकरांचा साधेपणा हा राजकीय नेत्यांसाठी मापदंड मानला जातो. कॅन्सरमुळं मार्च २०१९ मध्ये पर्रिकरांचं वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झालं.

त्यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणूकीत भाजपनं पणजीची जागा गमावली. काँग्रेसच्या अतानासिओ मोन्सेरात यांनी पोटनिवडणुकीत विजय मिळवला होता.

सध्या आगामी विधानसभा निवडणुकांमुळं गोव्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. यावेळी लढाई फक्त सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये मर्यादित नाही, तर ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस आणि अरविंद केजरीवालांचा आम आदमी पक्षही या लढाईत पूर्ण ताकद लावतंय. त्यामुळं या चौरंगी सामन्यात कुणाच्या वाट्यातली मतं फुटणार आणि कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल. गोवा छोटं राज्य असलं, तरी चारही पक्ष मजबूत ताकद लावतील अशा शक्यता आतापासूनच व्यक्त केल्या जात आहेत.

आता निवडणुका आल्यात म्हणल्यावर पक्षांतरं आली, तिकीट वाटपावरून नाराजीही आलीच. एकदा का नाराजीनाट्य सुरू झालं, की कोण कुठल्या पक्षात जाणार? कुणाचा पत्ता कट होणार? याची चर्चा फुल फॉर्ममध्ये येते.

एवढी रिक्षा फिरवलीये म्हणल्यावर आम्ही तुम्हाला ग्रँड काहीतरी सांगणार हे फिक्स-

तर गोव्यात भाजपच्या गोटात इलेक्शनच्या तिकीटावरुन वाद झालाय, तेही पणजीच्या जागेवरच्या. विषय असा झालाय की, पणजीतून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी मनोहर पर्रिकरांचा मुलगा उत्पल पर्रिकर इच्छूक आहे. आता तुम्हाला वाटत असेल, की पर्रिकरांचा मुलगाय म्हणल्यावर सहज तिकीट मिळेल की.

पण भिडू तसं नाहीये. पर्रिकरांच्या निधनानंतर झालेली पोटनिवडणूक काँग्रेसच्या अतानासिओ मोन्सेरात यांनी जिंकली. याच मोन्सेरात यांनी जुलै २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळं पणजीच्या जागेसाठी उमेदवार म्हणून त्यांचं पारडं जड मानलं जात आहे. अमेरिकेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर, उत्पल पर्रिकर यांनी पर्रिकर यांच्या मृत्यूनंतर राजकारणात यायची इच्छा व्यक्त केली होती.

उत्पल आणि मोन्सेरात यांच्यात तिकीट कुणाला मिळणार आणि कुणाचा पत्ता कट होणार याची चर्चा गोव्यात रंगलीये. याबद्दल उत्पल यांना भाजपकडून तिकीट मिळालं नाही तर तुमची भूमिका काय असेल, असा प्रश्न विचारण्यात आला.

त्यावर ते म्हणाले, ‘यावर बोलण्याची ही वेळ नाही. मनोहर पर्रिकर यांना आयुष्यात काहीच सहजासहजी मिळालेलं नाही. मलाही त्याच पद्धतीनं काम करावं लागणार आहे. मला काही कठोर निर्णय घेण्यास भाग पाडलं जाऊ शकतं, त्याच्यासाठी मला शक्ती मिळावी अशी प्रार्थना मी करतो. मी पक्षाला सांगितलंय आणि मला खात्री आहे की पक्ष मला तिकीट देईल.’

उत्पल यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची भेट घेतल्यानं चर्चांना आणखी उधाण आलं. मात्र तानावडे यांनी, ‘आमच्यात तिकीटाबद्दल कुठलीच चर्चा झाली नाही. तिकीटावर दावा कुणीही करू शकतं, मात्र तिकीट कुणाला द्यायचं याचा निर्णय पक्षाचं संसदीय मंडळ घेणार आहे. स्थानिक पातळीवर काहीच सांगता येणार नाही,’ असं या भेटीबद्दल सांगितलं.

दिवंगत मनोहर पर्रिकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत जवळपास २५ वर्ष पणजी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय. त्यांच्या मृत्यूनंतर भाजपला ही जागा राखता आली नाही. त्यात या वादाला तोंड फुटलं आणि मोठ्या प्रमाणावर मतं फुटली तर भाजपवर ही जागा पुन्हा एकदा गमावण्याची नामुष्की ओढवू शकते.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.