अडवाणींच प्रचाराचं भाषण चालू होतं आणि या IAS अधिकाऱ्याने माईकच हिसकावून घेतला होता !!

७ एप्रिल २००४ पटना गांधी मैदान 

भारताचे गृहमंत्री आणि उपपंतप्रधान असणाऱ्या लालकृष्ण अडवाणींची लोकसभा निवडणुकीची प्रचारसभा सुरु होती. रात्रीची वेळ असूनही लाखो कार्यकर्ते उपस्थित होते. स्टेज वर नितीश कुमार शत्रुघ्न सिन्हा, सुशीलकुमार मोदी यांच्या सह अनेक जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींच भाषण लक्ष देऊन ऐकत होते.

अचानक एक तरुण स्टेज वर आला. त्याने थेट जाऊन अडवाणींच्या माईक ला हात घातला आणि म्हणाला

“Your TIME is over Sir !!”

सगळे चाट पडले. कोणालाच काही कळेना नेमकं काय झालंय. प्रेक्षकांत खळबळ सुरु झाली स्टेजवरचे लोक त्या माणसाला काही तरी सांगताना दिसत होते पण तो कमरेवर हात ठेवून उभा होता आणि मानेने सगळयांना नाही म्हणत होता.

थेट उपपंतप्रधानांचं भाषण बंद पाडणारा हा माणूस आहे तरी कोण याची उत्सुकता सगळ्यांना होती. त्याच नाव होत डॉ.गौतम गोस्वामी !!

03 04 2019 gautam goswami 19098699

हा गौतम गोस्वामी तेव्हा पटण्याचा कलेक्टर होता. गावातली शांतता सुव्यवस्था राखणे हा त्याच्या अखत्यारीत  येणार विषय होता. निवडणूक आयोगाने त्यावेळी आचारसंहितेचे नियम कडक केले होते. रात्री १०च्या पुढे कोणालाही प्रचार करण्याची स्पीकर लावण्याची परवानगी नव्हती.

डॉ.गौतम गोस्वामी त्याच पालन करत होता.

पण भाजप चे म्हणणे होते कि गौतम गोस्वामीने राज्यसरकारच्या सांगण्यावरून हे धाडस केलं होतं. राज्यात तेव्हा लालूप्रसाद यादव यांच्या पत्नी राबडी देवी मुख्यमंत्री होत्या. यापूर्वी लालू प्रसाद मुख्यमंत्री असताना अडवाणी यांची रथ यात्रा बिहार मध्ये अडवली गेली होती आणि आता भाषण बंद पाडलं.

अडवाणी याना १००% खात्री होती कि हि लालू यांची राजकीय खेळी आहे.

पण गौतम गोस्वामी याचा इन्कार करत होते. ते १९९१ सालच्या बॅच चे आय ए एस ऑफिसर. मूळचे बिहारचेच. शिक्षण बनारस हिंदू विद्यापीठातून एमबीबीएस एमडी!! यूपीएससीमध्ये संपूर्ण देशात ७वा क्रमांक पटकावलेला. बिहार मध्ये स्वच्छ आणि कडक शिस्तीचा अधिकारी म्हणून त्यांची इमेज होती.

त्यांची गेल्या ११ वर्षात ११वेळा बदली झाली होती याचा अर्थ त्यांनी भ्रष्टाचारा विरुद्ध सरकारपुढे झुकण्यास नकार दिला होता म्हणून त्यांची वारंवार बदली होते असेच सर्वसामान्य जनतेचे मत होते.

२००४ मध्येच जुलै महिन्यात बिहार वर आभाळ कोसळले. गंगा, कोसी, महानंदा, बागमती या सर्व मोठ्या नद्यांना महापूर आला. यापूर्वी कधीही पहिला नाही असा हा महापूर होता. सगळा बिहार पुराखाली आला होता. जवळपास सडे आठशे लोक पुरात वाहून गेले होते. बाकीचं नुकसान किती झालं होता याची गणनाच नाही.

राज्य सरकारने मुख्य नोडल ऑफिसर म्हणून गौतम गोस्वामी यांची नियुक्ती केली. त्यांनी आपल्या झपाट्याने सगळी परिस्थिती आटोक्यात आणली. रात्रंदिवस एक करून बिहारच्या प्रत्येक भागात मदत पोहचवली.

बिहारच्या जनतेसाठी ते हिरो झाले होते.

एवढंच नाही तर जगातली सुप्रतिष्ठित टाइम मॅगझीनने त्यांना यंग अशियन अचिव्हर हा पुरस्कार देऊन त्यांच्यावर कव्हर स्टोरी केली होती. पहिल्यांदाच एका भारतीय अधिकाऱ्याला अमेरिकेतल्या मासिकामध्ये मानाचं स्थान मिळालं होत.

त्या मध्ये गौतम गोस्वामी यांनी आपल्याला मिळालेल्या तुटपुंज्या मदती जोरावर लाखो लोकांचे प्राण वाचवले वगैरे वगैरे माहिती दिली होती.

यानंतर काही महिन्यातच गौतम गोस्वामींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि सहारा ग्रुपमध्ये नोकरी सुरु केली. अर्थात त्यांचा राजीनामा अजून मंजूर व्हायचा होता आणि त्याची प्रोसिजर सुरूच होती. गौतम गोस्वामींच्या या निर्णयावर उलट सुलट  चर्चा सुरु होती.

इतक्यात एक दिवस बातमी येऊन थडकली माजी आयएसएस अधिकारी डॉ. गौतम गोस्वामींना अटक.

ज्या पुरतील मदतीमुळे गोस्वामींना टाइम मॅगझीनने त्यांना यंग अचिव्हर अवॉर्ड दिला होता त्याच पुरामुळे गोस्वामी गोत्यात आले होते. त्यांच्यावर संतोष झा याला नियमबाह्य काँट्रॅकट दिल्याचे आरोप झाले होते. संतोष झा हा लालूप्रसाद यादव यांचे मेहुणे साधू यादव यांचा मित्र होता. त्याने काही पैसे त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर केल्याचं हि दिसत होतं.

राबडी देवी मुख्यमंत्री असल्याचा फायदा घेऊन त्यांच्या भावाने मोठा घोटाळा केला आहे याची चर्चा सुरु झाली मात्र यात गौतम गोस्वामी यांचा यात हात असेल यावर मात्र बिहारी जनतेचा विश्वास बसत नव्हता.

एकेकाळचा बिहारचा हा हिरो अधिकारी एका रात्रीत व्हिलन बनला होता.

त्यांना एक वर्ष कोठडी मध्ये काढायला लागले. राबडी देवींचे सरकार जाऊन राष्ट्रपती राजवट आल्यामुळे कोणताही राजकीय हस्तक्षेप होणे शक्य नव्हते. याकाळात गौतम गोस्वामींच्यावर अत्याचार झाला. लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी सरकार ची अनेक कृष्ण कृत्य त्यांना माहिती असतील असेच पोलिसांना वाटत होते.

अखेर एका वर्षाने त्यांना जामीन मिळाला. तेव्हाचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांचे निलंबन मागे घेऊन सेवेत घेतले देखील मात्र याच दरम्यान त्यांना कॅन्सर आहे हे स्पष्ट झाले. कोणतेही उपचार त्यांना वाचवू शकले नाहीत. पुढच्या दोनच वर्षात वयाच्या ४१ वर्षी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे त्यांची डॉकटर पत्नी आणि मुले एवढं कुटुंब होतं .

आज या गोष्टीला दहा वर्षे होतील. मात्र पुराच्या त्या घोटाळ्याचे पुढे काही झालेच नाही.

साधू यादव जो या सगळ्या मागचा मुख्य ब्रेन होता त्याने लालूप्रसाद यादव यांच्याशी भांडून पक्ष सोडला, लोकजनशक्ती पार्टी  काँग्रेस,बसपा असे सगळे पक्ष ट्राय करून तो आता भाजपच्या वळचणीला जाता येईल का याचा प्रयत्न करतोय. एकेकाळी त्याच्यावर गंगाजल सारखे सिनेमे आले होते त्याच्या गुंडगिरीचे किस्से सिनेमातही चर्चिले जात होते हा साधू यादव यावर्षीच्या निवडणुकीत जोरदार आपटी खाऊन ताठ मानेने फिरतोय.

हे हि वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.