९ वेळा बदली करून मन भरलं नाही आणि आता धमक्यांचे फोन सुरु झालेत

ईमानदारी तेरा किरदार है तो खुदकुशी कर ले,

सियासी दौर को तो जी हुजूरी की जरूरत है।

हा व्हॉटसअप स्टेट्स होता मध्य प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी लोकेश कुमार जांगिड यांचा. ५४ महिन्यातल्या ९ व्या बदली झाल्यानंतरचा..

मध्य प्रदेश केडरचे आयएएस अधिकारी लोकेश कुमार जांगिड हे सध्या त्यांच्या याच ९ व्या बदलीनंतर मोठ्या चर्चेत आले आहेत. अशा चर्चांमध्ये यायची त्यांची ही काही पहिलीच वेळ नाहीये. प्रत्येक बदलीवेळी नवी चर्चा. पण मुद्दा एकच भ्रष्ट्राचाराला विरोध. 

मूळचे परभणी जिल्ह्यातले लोकेश कुमार जांगिड हे सध्या मध्यप्रदेश सरकारच्या सेवेत आहेत. २०१४ च्या बॅचचे ते आयएएस अधिकारी असून त्यांच्या फील्ड पोस्टिंगला साडेचार वर्षे झाली आहेत. विशेष म्हणजे एवढ्या कमी कालावधीत त्यांची ९ वेळा बदली झाली. म्हणजेच, सरासरी काढली तर दर ६ महिन्याला एक बदली झालीय.

आता या बदल्यांच सत्र नेमकं काय?

सध्या आपण ९ व्या बदलीचाच विषय बघूया,

लोकेश कुमार जांगिड यांची नुकतीच बडवानीच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावरुन बदली केली गेली होती. आणि त्यांना मध्यप्रदेशच्या राज्य शिक्षण केंद्रात विस्थापित करण्यात आलं. आताच्या काळात प्रशासनिक बदल्या होणं सामान्य समजलं जात. आणि वरवर पाहता लोकेश कुमारांची ही बदली पण तशीच सामान्य वाटते. पण नाही ती बदली एका वेगळ्या कारणासाठी केली गेली.

खरं तर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघून त्यांना लोकेश कुमारांना बडवानी जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त केलं गेलं होत. त्या दरम्यान ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरच्या खरेदीत घोटाळा झाला होता. एक ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर ४० हजारांना मिळत असताना देखील तो ६० हजारांना खरेदी केला गेला होता. त्यांनी या भ्रष्टाचाराला लगाम घालण्याचा प्रयत्न केला. हा घोटाळा बाहेर काढण्यासाठी लोकेश कुमार प्रयत्नशील असतानाच त्यांची बदली राज्य शिक्षण केंद्रात केली गेली.

पण हा घोटाळा तेव्हाच बाहेर आला जेव्हा लोकेश कुमारांचे व्हॉटसअप चॅट लीक झाले.

आपली बदली झाल्यावर नाराज लोकेश कुमारांनी एमपी आयएएस असोसिएशन वर पोस्ट केली. यात ते म्हणतात,

जो लोग हर तरह के माफिया से पैसा निकालते हैं, उनका इस क्षेत्र से उस क्षेत्र में तबादला हो जाता है। वहीं, ईमानदारी से काम करने वाले लोगों का तबदला कर सचिवालय में फेंक दिया जाता है।एमपी में कार्यकाल की स्थिरता और सिविल सेवा बोर्ड नामक संस्था मजाक है। मैं रिटायरमेंट के बाद एक किताब लेकर आऊंगा और उम्मीद है कि सभी सामने तथ्य लाऊंगा। अभी मेरे हाथ आचरण के नियमों से बंधे हुए हैं।

दुसर्‍या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की,

मुझे एक जिले में एसडीएम पद से इसलिए हटाया गया क्योंकि कलेक्टर मैंने कमजोर कहा था। वह पैसा नहीं खा पा रहे थे। शिवराज सिंग वर्मा, इसलिये शिवराज सिंग चौहान (Hon’ble CM) के कान भर दिये.

पुढं ते म्हणतात,

they are from same kirar community. and collector’s wife is secretary of kirar mahasabha. CM’s wife is president.

यावर एमपी आयएएस असोसिएशनचे अध्यक्ष आय.सी.पी केसरी यांनी लोकेश कुमारांच्या पोस्टवर आक्षेप घेतला आणि त्या पोस्ट डिलीट करा असे सांगितले. मात्र लोकेश कुमारांनी त्या पोस्ट डिलीट करण्यास नकार देत, वाटल्यास तुम्ही मला ग्रुप मधून काढून टाका असे उत्तर दिले.

यानंतर लोकेश कुमारांना आयएएस असोसिएशनच्या ग्रुपमधून काढून टाकण्यात आले. केसरी लोकेश कुमारांच्या पोस्टवर म्हणतात की,

यह उसके डर या अनुपस्थिति का सवाल नहीं है। आपने न केवल अपने सहकर्मियों पर बल्कि परिवार पर आरोप लगाते हुए बुनियादी शालीनता खो दी है। सभी पोस्ट जल्दी हटा लें। यह मेरी सच्ची सलाह है और भविष्य में ऐसी चीजों से दूर रहें।

आता हे चॅट असोसिएशन ग्रुपवरचं होत. ते कसं लीक झालं याबाबत कोणीच काही माहिती देऊ शकलं नाही.

पण यावर राजकारण सुरु झालं. 

कॉंग्रेसचे खासदार विवेक तन्खा यांनी मध्यप्रदेश सरकारवर ताशेरे ओढायला सुरवात केली. ते म्हणाले की, मध्यप्रदेश प्रशासन हे सर्वात खालच्या पातळीवर आहे. भ्रष्टाचार आणि भाई-भतीजावाद शिगेला पोहोचला आहे. हे व्यवस्थेच्या विरोधात आहे. नोकरशाही मध्ये चाटूगिरी हे नवीन मानक आहेत. मध्यप्रदेशात प्रामाणिक अधिकाऱ्यांना जागा नाही.

यावर मध्यप्रदेश सरकारच्या वतीने कॉंग्रेसच्या आरोपावर मंत्री विश्वास सारंग म्हणाले की, आयएएस अधिकाऱ्यांची बदली ही रूटीन ट्रांसफर आहे, जर या अधिकाऱ्याने पूर्वग्रहदूषितपणनाने बदली स्वीकारल्यास तो स्वत: आणि आपल्या सोबतच्या लोकांना न्याय देऊ शकणार नाही. तसेच काँग्रेसने तर या विषयावर बोलूच नये. त्यांच्या काळात पण त्यांना हे अधिकारी नकोच होते.

या सगळ्या वादात ११ जूनला लोकेश कुमारांनी DoPT सचिव आणि मध्यप्रदेशाचे मुख्य सचिव यांना तीन वर्षांसाठी आंतर-संवर्ग प्रतिनियुक्तीवर मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात जाण्यासाठी अर्ज केला आहे. या पत्रात त्यांनी प्रतिनियुक्तीचे कारण कौटुंबिक असं जरी दिल असलं तरी वारंवार झालेल्या बदल्यामुळे जांगिडे नाराज असल्याच्या चर्चा अधिकाऱ्यांच्यात रंगल्या आहेत.

आता या सर्व प्रकरणावर आणि त्यांच्या वॉटसअप चॅटवरुन सुरु असलेल्या राजकारणावर त्यांचं मत जाणून घेण्यासाठी बोल भिडूने त्यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. पण अवघ्या नऊ मिनिटांतच त्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याच्या न्यूज फ्लॅश झाल्या. 

गुरुवारी रात्री पावणेबारा वाजता त्यांना अज्ञात नंबरवरून  एक फोन कॉल आला,

तू जानता नहीं है कि तूने किससे पंगा लिया है। अगर तुझे जान प्यारी है, तो मीडिया से बात करना और लिखना बंद कर दे। तू अपने बच्चे की भी खूब फोटो डालता है। कल से छह महीने की छुट्‌टी पर चले जाओ।

धमकी मिळाल्यावर लगेच लोकेश जांगिड यांनी मध्यप्रदेशच्या DGP ना वॉट्सऍप आणि अन्य माध्यमातून आपला मॅसेज पोहोचवला. मात्र १२ तासाहून अधिक काळ लोटला, पण त्यावर त्यांना कोणताच रिस्पॉन्स आला नाही.

वरचा सगळा सीन बघता प्रशासनात असे किती अधिकारी असतील जे प्रामाणिकपणे आपलं काम करत असतील असा प्रश्न पडतो. तर दुसरीकडे जे अधिकारी प्रामाणिकपणे काम करतील त्यांचा लोकेश कुमार किंवा आपल्या जवळचंच उदाहरण म्हणून तुकाराम मुंढे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आता लोकेश कुमारांना महाराष्ट्रात यायचंय. पण प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या बाबतीत महाराष्ट्राचा ही इतिहास ही मध्यप्रदेशाहून काही वेगळा राहिलेला नाही. किंबहुना तो जास्तच कडवा राहिलाय. हे लोकेश कुमारांसारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यायला हवं.

म्हणजे कोर्ट आणि सामान्य व्यक्तीच्या बाबतीत जसं का ‘तारीख पें तारीख’ म्हंटल जात तसं आता प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या बाबतीत ‘तबादले पें तबादला’ असा विषय झालाय. 

 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.