इब्राहिम कासकरला एका बाबाने सांगितलेलं, “तुझा दुसरा पोरगा मोठ्ठ नाव कमावणार आहे”
रत्नागिरी जिल्ह्यातील मुमका खेडेगाव हे इब्राहिम कासकरचं मूळ गाव. इब्राहिम कासकर हा त्या गावात प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखला जायचा. पुढे मुंबईमध्ये डोंगरीतल्या चार नळ भागात ते राहायला होते. मुंबईतल्या मुस्लिम बहुल भागातून इब्राहिम कासकर हा हेड कॉन्स्टेबल झाला होता. हेड कॉन्स्टेबल असूनही गरिबी त्याच्या पाचवीला पुजलेली होती.
या काळात हाजी मस्तान आणि करीम लाला यांनी आपलं बस्तान बसवलं होतं. त्यांच्या धाकात सगळी मुंबई वागत होती मात्र एका माणसाला त्यांच्या दरबारात केव्हाही प्रवेश असायचा तो म्हणजे इब्राहिम कासकर. गुन्हेगारी जगतात इब्राहिम कासकरला सगळ्यात जास्त इज्जत मिळत होती. गरिबी हटवण्यासाठी जरी तो मस्तानसाठी अधूनमधून काम करायचा पण मस्तान आणि इतर तस्कर लोकं त्याच्याकडे मित्रत्वाच्या भावानेच पाहायचे.
सार्वजनिक वाद, कुटुंबातील भांडण, वाटणीवरून होणारे वाद अशा सगळ्या ठिकाणी इब्राहिमला बोलावलं जायचं. त्याच्या मध्यस्थीने तो वाद निकाली निघायचा. स्थानिक वादांव्यतिरिक्त तो गरीब लोकांनाही शक्य तितकी मदत करायचा. १९६७ मध्ये तो नोकरीतून निवृत्त झाला आणि क्राईम ब्रांच पथकात सामील झाला. या स्क्वाडचा उद्देश होता नव्याने निर्माण होणारे गुन्हेगार आटोक्यात आणणे. पुढे त्याचा मुलगा या क्षेत्रात येणं हा मोठा विरोधाभास होता.
इब्राहिम कासकर हा अत्यंत धार्मिक माणूस होता. ज्यावेळी दाऊदचा जन्म झाला तेव्हा निराले शाह बाबा यांच्या भविष्यवाणीची त्याला आठवण झाली.
ती भविष्यवाणी होती, तुला सहा मुलगे होतील, आणि तुझा दुसरा मुलगा हा फार सामर्थ्यवान , प्रसिद्ध व श्रीमंत बनेल.
त्या बाबाच्या भविष्यवाणीवर विश्वास ठेवून त्याने आपल्या दुसऱ्या मुलाचं नाव दाऊद ठेवलं. इब्राहिमला दुसरा मुलगा झाल्याच करीम लालाला कळलं आणि त्याने मोठी दावत दिली होती. कारण इब्राहिम दावत देईल इतके पैसे त्याच्याकडे नव्हते. पण भविष्यात दाऊद हा करीमलालाचा सूड उगवणार होता हे खुद्द करीम लालालाही माहिती नव्हतं.
इब्राहिमला आपली मुलं शिकली पाहिजे असं फार वाटायचं. १२ मुलांचा त्याचा संसार होता. साबीर हा थोरला मुलगा होता. त्याला दाऊदला पाहिलं तर ती भविष्यवाणी आठवायची. हा पोरगा पुढं जाऊन आपलं नाव करणार असच वाटायचं. म्हणूनच नागपाड्यातील इंग्रजी शाळेत त्याने दाऊदला घातलं आणि इतर मुलांना उर्दू प्राथमिक शाळेत घातलं.
पुढे दाऊदला वाहतूक नियंत्रणाचे प्रशिक्षणही दिले. दाऊद पुढे महान कर्तृत्व करणार यावर तो ठाम होता.
एके दिवशी अचानक इब्राहिमच्या नोकरीवर गदा आली. एका खुनाचा तपस त्यांच्या ब्रांचला लावता आला नाही म्हणून हि वेळ ओढवली होती. आता यामुळे दाऊदच्या शाळेचा खर्च उचलणे त्याला शक्य होईना. शाळेत असताना दाऊदने कुठलेही वेडेवाकडे काम केले नाही. पण जशी त्याची शाळा बंद झाली तसा तो सुखी मुलगा झाला. त्याला अभ्यास करायचा ताण उरला नव्हता त्यामुळे तो दिवसभर भटकत असायचा.
डोंगरीतल्या रिकामटेकड्या मुलांसोबत तो वेळ घालवू लागला. त्याला खेळ विशेष आवडे आणि त्यातही क्रिकेट. पुढे फरारी झाला तरी खेळ खेळणे त्याने सोडले नाही. इब्राहिम पुढे बाशू दादाची पडेल ती कामं करू लागला. फायली नेऊन देणे वैगरे अशी काम त्याच्या वाट्याला येऊ लागली. गुन्हेगारी जगात वावरूनही तो कधी गुन्हेगारीच्या नादाला लागला नाही पण मुलांवर त्याला अंकुश ठेवता आला नाही.
तोवर दाऊदने आपल्या मोठ्या भावाच्या साबीरच्या साथीने रस्त्यावरील गुंड म्हणून नाव कमावले होते. दाऊदच्या वडिलांची धार्मिक शिकवण अडगळीत जाऊन दाऊद आपल्याच धुंदीत जगत होता. त्याला सत्ता गाजवायची हाव सुटली होती. पैशासाठी तो काहीही करायला तयार होता. पाकिटमारी, लोकांना मारझोड, गळ्यातली चेन खेचणे, दुकानदारांना धमक्या देणे अशा गोष्टी दाऊद करू लागला होता.
वयाच्या १४ व्या वर्षी दाऊदने पहिला गुन्हा केला. रस्त्यावर पैसे मोजणाऱ्या एका माणसाच्या हातून त्याने पैसे हिसकावले आणि पळून गेला. त्या माणसाने त्याचा माग काढत काढत इब्राहिमक कासकरला गाठले. इब्राहिमला एव्हाना आपल्या मुलाचे प्रताप कळले होते. त्याने दाऊदला बेदम चोप दिला आणि जेमध्ये डांबलं. काही चार हिताच्या गोष्टी सांगितल्या.
पण दाऊद इथून त्याच्या आवाक्याच्या बाहेर गेला तो कायमचाच. लोकांवर त्याची दादागिरी वाढली. त्याच्या सतत तक्रारी येऊ लागल्या. साबीर हा मोठा असला तरी तो दाऊदला घाबरून असायचा. इब्राहिम कासकर तर दाऊदच्या गुन्हेगारीने निरुत्तर झाला होता. लोकांमध्ये असलेली त्याची इज्जत दाऊदने कायमचीच जमीनदोस्त केली होती.
इब्राहिमला पुढे फक्त त्या बाबाची भविष्यवाणी आठवत राहिली कि, दुसरा मुलगा हा महान कर्तृत्व करेल पण गुन्हेगारी मार्गाने करेल याचा त्याने कधीही विचार केला नव्हता.
स्वतः पोलिसात असूनही मुलगा जगातला सगळ्यात मोठा डॉन बनतो हेच मोठं आश्चर्याच कारण होतं.
हे हि वाच भिडू :
- भारतातल्या गुटखा किंगचं भांडण सोडवता सोडवता दाऊद पाकिस्तानचा गुटखा किंग बनला
- मुंबई अंडरवर्ल्ड मधील सगळेच डॉन तिला घाबरायचे, दाऊद तिला मावशी मानायचा..
- मुख्यमंत्र्यांना ५ कोटीची लाच ऑफर झालेली, तरी दाऊदचा बंगला हातोड्याने पाडला..
- छोटा राजनने बाळासाहेबांना सल्ला दिला,” दाऊद देशद्रोही नाही, ठाकरेंनी लक्ष घालू नये.”