पानिपतमध्ये शौर्य गाजवणाऱ्या इब्राहिम खानाच्या वंशजांना महाराष्ट्र विसरलेला नाही.

पानिपतची तिसरी लढाई म्हणजे मराठेशाहीच्या इतिहासातील भळभळती जखम. अफगाणिस्तानच्या अहमद शहा अब्दालीला दिल्लीवर विजय मिळवण्यासाठी नजीबखान रोहिल्याने भारतात आणले. त्याने तिथे महाप्रचंड लूट माजवली. भारताचा सर्वनाश करण्यासाठी आलेल्या अब्दालीला रोखण्याची जबाबदारी नानासाहेब पेशवे यांनी आपला चुलत भाऊ सदाशिवराव यांच्याकडे दिली.

सदाशिवराव भाऊ  पेशवे यांच्या सेनेत मल्हारराव होळकर, जनकोजी शिंदे,पुरंदरे, विंचूरकर असे अनेक दिग्गज सरदार होते. खुद्द पेशवेपदाचा भावी वारस विश्वासराव सुद्धा सेनेत होता. लाखोंचं सैन्य घेऊन सदाशिवराव भाऊ उत्तरेत आले होते.

पण त्यांचा मुख्य विश्वास होता आपल्या तोफखान्यावर. याचा प्रमुख होता इब्राहिम खान गारदी.  

एकेकाळी पाँडिचेरी येथे द ब्यूरी या अधिकाऱ्याच्या पालखीपुढे छडी घेऊन धावणारा एक लहानसा शिपाई. असं म्हणतात की तो मूळचा औरंगाबाद जवळच्या कायगाव टोक या गावचा. हुशार होता, मेहनती होता. नोकरीसाठी देशभर फिरला. पोर्तुगीज भाषा त्याला थोडी फार येत होती. लवकरच  आपल्या कार्यकर्तृत्वावर फ्रेंच फौजेत अंमलदारी मिळवली.

फ्रेंचांच्या पलटणीतील अधिकारी बुसी याने इब्राहिमखानाला प्रशिक्षण दिले. या बुसीच्याच नेतृत्वाखाली इब्राहिम खानाने गोदाकाठच्या दहा हजार गारद्यांची सेना उभा केली. ही भारतातली पहिली गारदी पलटण.

पुढे इब्राहिम खानाने फ्रेंचांची नोकरी सोडली. वेगवेगळया दरबारात काम करता करता तो हैद्राबादच्या निजामाकडे जाऊन पोहचला. इथेच त्याला खान ही पदवी मिळाली असं सांगतात. डिसेंबर १७५७ साली सिंदखेडला मराठा आणि निजाम अली यांच्यात झालेल्या लढाईत इब्राहिमखान निजामाकडून लढला. या लढाईत मराठ्यांनी निजामाचा पराभव केला.

पुढे हैद्राबादच्या दरबारात कारभारी बदलल्यामुळे अनेक राजकीय घडामोडी घडल्या यात इब्राहिम खान गारदी याला आपल्या नोकरी गमवावी लागली. याचा फायदा मराठ्यांनी उचलला. त्यांनी इब्राहिम खान आणि त्याची गारदी सेना आपल्यात सामावून घेतली.

उदगीरच्या लढाईत हा सदाशिवराव भाऊंच्या सोबत त्याने मोठा पराक्रम गाजवला. या लढाईनंतर सदाशिवराव भाऊंचा त्याच्या वरील विश्वास वाढला आणि त्यांनी त्याला अब्दाली विरुद्धच्या मोहिमेत सोबत नेलं.

पानिपतच्या युद्धावेळी मराठ्यांच्या सेनेत इब्राहिम खानाचे दहा हजार गारदी व शंभर तोफांचा तोफखाना होता.

असं म्हणतात की इब्राहिम खानाचे मराठा सेनेतील वाढते महत्व पाहून अनेक सरदार नाखूष होते. त्यांनी सदाशिवराव भाऊ यांना गारदी मुसलमान आहे कधी हि दगा देईल असे शंकेचे वातावरण निर्माण करायचा प्रयत्न केला होता. पण पेशव्यांच्या समोर इब्राहिम खानाने बेल भांडार उधळून शपथ घेतली होती आणि त्याने भाऊंना साजक रोटी (शपथेचा एक प्रकार) दिला होता.

अहमदशाह अब्दाली जेव्हा मराठयांच्या युद्धची तयारी करू लागला तेव्हा त्याला जाणवलं की आपल्याला या युद्धात टिकाव धरणे अवघड आहे आणि म्हणूनच त्याने मराठ्यांविरुद्धच्या युद्धाला धर्मयुद्धाचे रंग दिले आणि उत्तरेतील सर्व मुस्लिम राजांना मदतीची हाक मारली.

अब्दालीच्या झेंड्याखाली मुस्लिम सैन्य गोळा होत होतं मात्र त्याचवेळी मराठ्यांच्या सेनेत इब्राहिम खान मोठा पराक्रम गाजवत होता. त्यालाही रोहिल्याच्या मार्फत फोडण्याचा अब्दालीने प्रयत्न केला तेव्हा इब्राहिम खानाने आपल्याला आलेली २५ पत्रे सदाशिवराव भाऊला दाखवली त्यात लिहिलं होतं,

तुम्ही आम्ही एक जात आहो. यासमयी आमच्याकडे यावे म्हणजे तुम्हास पंचवीस लक्षाचा मुलूख देऊ. उमरावीही देऊ.ʼ

पण इब्राहिम खानाने पेशव्यांना विश्वास दिला की तुमचे आमचे इमान प्रमाण झाले तेच करार आहे.

पानिपतात दोन्ही सेना एकमेकांना भिडण्यापूर्वी त्याने कुंजपुराचा किल्ला सर केला होता. पानिपतावर जेवढ्या लहानमोठ्या चकमकी झाल्या तिथे इब्राहिम गारदी आणि त्याचा तोफखाना प्रचंड उपयोगी ठरला.

१४ जानेवारी १७६१ रोजी जेव्हा अब्दालीची सेना आणि मराठे एकेमकांना पानिपतात भिडले तेव्हा इब्राहिमखान तोफखाना घेऊन आघाडीस होता. त्याच्या उजवीकडे शिंदे आणि होळकर होते, तर डावीकडे पवार आणि गायकवाड हे सरदार होते. इब्राहिमखान पानिपतच्या आग्नेयेस तीन मैलांवर उग्रखेडीच्या पुढे निंबडीच्या दक्षिणेस आपल्या गारद्यांसह जाऊन उभा राहिला.

ऐन युद्धात त्याच्या तोफखान्याने शत्रूपक्षाच्या रोहिल्यांची दयनीय अवस्था केली. असं म्हणतात की त्याने त्या दिवशी ८००० रोहिले सैनिक ठार केले.

पण जेव्हा शत्रूसेनेत भगदाड पडले तेव्हा विठ्ठल शिवदेव व दमाजी गायकवाड या सरदारांना राहवले नाही आणि ते युद्ध आघाडीवर पुढे सरसावले. आता मात्र इब्राहिम खानाची पंचाईत झाली.

 “तोफगोळे सोडावेत तरी कुणावर परकीयांवर कि आपल्याच सैन्यातून रणमैदानात उडी घेतलेल्या स्वकीयांवर”

अखेर त्याने गारद्यांचा तोफखाना थंड केला. 

इथून पुढे मात्र लढाईचा रंग बदलला. मराठ्यांनी आपल्या सेनेची वाताहत केलेली पाहून अब्दालीने आपली राखीव सेनेचा पत्ता काढला. त्याने १५००० कसलेले योद्धे त्यांच्या मागे बंदूकधारी घोडदळ व उंटावर लादलेल्या छोट्या तोफा बाहेर काढले व चाल केली. या उंटावर लादलेल्या छोट्या तोफा पानिपतच्या युद्धात निर्णायक ठरल्या, या तोफा घोडदळाविरुद्ध अतिशय परिणामकारक ठरल्या तसेच मराठ्यांचे घोडदळ अफगाणी बंदुकधार्‍यांपुढे टिकाव धरू शकले नाहीत. 

अशातच पेशव्यांचे सुपुत्र विश्वासराव गोळी लागून ठार झाले व सर्वत्र गोंधळाचे वातावरण झाले.

विश्वासराव पडल्याची  कळताच बेभान झालेले  सदशिवभाऊ पेशवा धुमश्चक्रीमध्ये नाहीसे झाले. त्यांच्यासोबत पुढे काय झाले याचे कोणालाच काही माहित नाही आपला पराभव झाला असे समजून सैनिक व बाजार बुणग्यांनी पळ काढला.

हजारो मराठे  मारले गेले, समोर पराभव दिसू लागल्यावर मोठमोठ्या सरदारांनी देखील माघार घेतली. मात्र इब्राहिम गारदी व त्याची सेना संध्याकाळ झाली तरी एकाकी लढत होती. अब्दालीच्या सेनेने पाच हजार गारदी कापले गेले. त्यामध्ये इब्राहिमखानाचा पुत्र व भाचा मारला गेला. स्वतः इब्राहिमखान जखमी अवस्थेत सापडला.

तेव्हा अब्दालीने त्याला विचारले,

तू मला का सामील झाला नाहीस?

तेव्हा त्याने सांगितले की, सदाशिवराव भाऊंना दिलेले वचन सर्वांत महत्त्वाचे होते. ते सोडून त्यांचा दगा करणे माझ्या तत्त्वात बसणारे नव्हते. हे ऐकल्यावर अब्दालीने इब्राहिमखानास ठार करण्याचा हुकूम दिला. अफगाणी सेनेने त्यांना हालहाल करून मारून टाकले. 

पानिपतामुळे मराठ्यांचा कणाच मोडला. लाखो घरे उध्वस्त झाली. पिढीच्या पिढी नष्ट झाली.

आजही या शूरवीरांच्या गाथा पारधी समाजात जातात. इब्राहिम खान पानिपतात मारले गेले मात्र इब्राहिम खान यांच्या वंशजांना श्रीमंत माधवराव पेशवे यांनी बेबडोहाळची सरदेशमुखी दिली व आडे या गावांमध्ये जमीन दिली होती.

त्यांचे वंशज आजही पुण्यात खडकीमध्ये राहतात. यापैकी रेहान सरदार हे इंजिनियर आहेत.

रेहान, मीर अली व इम्रान हे तिघे भाऊ मिळून वाई येथे एक बॉक्स बनवण्याचा छोटा कारखाना चालवतात. त्यांना पानिपतच्या युद्धात हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक बनलेल्या व मातृभूमीसाठी शेवट्पर्यंत लढा देऊन आपले प्राण अर्पण करणाऱ्या पूर्वजांच्या पराक्रमाचा सार्थ अभिमान आहे.

आजही ते पेशवे कुटुंबाच्या संपर्कात आहेत. पानिपतच्या शौर्यदिनाच्या कार्यक्रमात इब्राहिम खान गारदी यांच्या वंशजांना देखील मानाचे स्थान आहे. फक्त शपथेसाठी हौतात्म्य स्वीकारणाऱ्या खानाच्या स्मृतींना महाराष्ट्र कधीच अंतर देणार नाही.

हे ही वाच भिडू.

 

1 Comment
  1. Asharamji Sikandar Pharas says

    त्याची परत फेड आताचे पेशवे करत आहेत.मुस्लमानाना राष्ट्रद्रोही ही पदवी देऊन

Leave A Reply

Your email address will not be published.