कोल्हापूरपेक्षाही छोटा देश फुटबॉल विश्वचषकासाठी पात्र ठरलाय…!!!
आईसलँड. युरोपमधील एक छोटासा देश. छोटासा म्हणजे किती छोटा तर अगदी आपल्या कोल्हापूर शहरापेक्षाही कमी लोकसंख्येचा. देशाची लोकसंख्या जेमतेम ४ लाखांच्या घरात. नागरिकांना राहण्यासाठी जगातील सर्वात सुरक्षित देशांपैकी एक अशी ओळख असणारा हा देश सध्या वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आहे. चर्चेत असण्याचं कारण असं की यावर्षीच्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरलेला तो जगातला सर्वात छोटा देश ठरला आहे. होय, या स्पर्धेत आपल्याला आईसलँडच्या संघाचा खेळ बघायला मिळणार आहे.
आता तुम्ही म्हणाल की यात काय विशेष, तर थांबा कुठल्याही निष्कर्षावर पोहोचण्याआधी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घ्या. आईसलँडचा विश्वचषक स्पर्धेत पात्रता मिळविण्याचा प्रवास बराच खडतर राहिलेला आहे. अनेक अडचणींवर मात करून हा संघ इथपर्यंत पोहोचलाय. एक तर जेमतेम ४ लाखांची लोकसंख्या आणि त्यातही फुटबॉल खेळणारे फक्त १०० व्यावसायिक खेळाडू. देशातील वातावरणही खेळासाठी प्रतिकूलच. कारण वर्षातले फक्त ३ महिनेच तिथं सूर्यदर्शन होतं, बाकीच्या वेळी जिकडे तिकडे बर्फ पसरलेला. संघाला पूर्णवेळ प्रशिक्षक सुद्धा नाही, प्रशिक्षक म्हणून काम करणारा माणूस फावल्या वेळेतील व्यावसायिक डॉक्टर. अशा परिस्थितीत खेळायचं कसं, कधी, कुठे आणि त्यासाठी संघबांधणी करायची कशी हाच मोठा प्रश्न.
पण अशा परिस्थितीतही एक गोष्ट मात्र इथल्या खेळाडूंकडे होती, ती म्हणजे फुटबॉलसाठी असणारं पॅशन. या पॅशनच्या जीवावरच हा संघ इथपर्यंत पोहोचलाय. विश्वचषकासारख्या महत्वाच्या इव्हेंटमध्ये सहभाग घ्यायचं ध्येय्य समोर ठेवलं आणि ते स्वप्न अक्षरशः जगलं. प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत खेळासाठी मैदानं नव्हती म्हणून इनडोअर मैदानं बांधली. या मैदानावर घाम गाळला. साधारणतः ६ वर्षांपूर्वी म्हणजे २०१२ साली आईसलँडच्या संघाचं जागतिक फुटबॉलमधलं रँकिंग होतं १३१ इतकं, सध्या ते आहे २२ इतकं. या गोष्टीवरूनच आपल्याला या संघाने गेल्या ६ वर्षात कशा प्रकारची कामगिरी केली असेल याचा अंदाज बांधता येऊ शकेल.
यावर्षीच्या विश्वचषक स्पर्धेत हा संघ अतिशय नवखा आहे. २०१६ चा ‘युरो चषक’ या एकमेव मोठ्या स्पर्धेचा अनुभव संघाच्या पाठीशी आहे. पण असं असलं तरीही संघाचा आजवरचा ट्रॅक रेकॉर्ड बघून स्पर्धेतील इतर कुठलाही संघ आईसलँडच्या संघाला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही. कारण स्पर्धेतल्या कुठल्याही तुल्यबळ संघाला ‘अपसेट’ करण्याची संपूर्ण क्षमता आईसलँडच्या या संघात आहे. २०१६ सालच्या युरो चषकाच्या पात्रता फेरीत आईसलँडच्या संघाने, २०१४ सालच्या विश्वचषक उपविजेत्या हॉलंडच्या संघाला एकदा नाही तर २ वेळा पराभवाचं पाणी पाजलंय. शिवाय मुख्य स्पर्धेत रोनाल्डोच्या पोर्तुगालविरुद्धचा सामना अनिर्णीत ठेऊन आणि इंग्लडच्या संघाला २-१ असा धक्का देत आईसलँडने स्पर्धेच्या क्वार्टर फायनलपर्यंत मजल मारली होती.
विश्वचषक स्पर्धेसाठी संघाला तुलनेने अवघड ड्रॉ मिळालाय. कारण साखळी फेरीतच त्यांना लिओ मेस्सीच्या अर्जेन्टिना आणि क्रोएशिया यांसारख्या बलाढ्य संघांविरुद्ध लढावं लागणार आहे. त्यामुळे या स्पर्धेतील आईसलँडच्या कामगिरीवर सर्वच फुटबॉल चाहत्यांच्या नजरा खिळलेल्या असणार एवढं मात्र नक्की.
Nicely done