कापसाचे एक बोंड देखील न पिकवणारी इचलकरंजी वस्त्रोद्योगाची मँचेस्टरनगरी कशी बनली?

इचलकरंजी हे पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर. पंचगंगा नदीच्या तीरावर ऊस भाजीपाला पिकणार संपन्न गाव. महाराष्ट्रातला दुसरा सहकारी साखर कारखाना इथे सुरू झाला. या गावात एकाही शेतात कापूस पिकत नाही. पण तरीही संपूर्ण देशात इथला टेक्स्टाईल उद्योग फेमस आहे.

कारण काय असेल?

इचलकरंजी ही घोरपडे संस्थानची जहागीर. मराठेशाहीच्या काळापासून हे गाव प्रसिद्ध आहे. सरसेनापती संताजी घोरपडेनी एका हुशार ब्राम्हण मुलाला आपल्या राज्यात आसरा दिला. त्या मुलाने म्हणजेच नारो महादेव जोशी यांनी इचलकरंजी संस्थान स्थापन केले.

संताजी घोरपडेंचे उपकार लक्षात ठेवण्यासाठी नारो महादेव याने घोरपडे आडनाव स्वीकारलं.

पुढे पेशवाईमध्ये हे संस्थान प्रसिद्धीस आले.

बाजीराव पेशव्यांची लाडकी बहीण अनुबाई या घोरपडेना दिली होती. अखेर पर्यंत तिच्या शब्दाला पेशव्यांच्या दरबारात मान होता. पार पोर्तुगीजांच्या गोव्यापर्यंत इचलकरंजीकर घोरपड्यांनी तलवार गाजवली होती.

पण इचलकरंजीचे भाग्य विधाते ठरले श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे.

१८९२ साली श्रीमंत नारायण बाबासाहेब इचलकरंजीच्या गादीवर बसले. ते स्वतः पदवीधर होते. नव्या विचारांचे पुरस्कर्ते होते. इंग्लंडला जाऊन आल्यामुळे त्यांच्या विचारसरणीला नव्या बदलत्या काळाचा स्पर्श झाला होता.

आपल्या जहागिरीमध्ये या नव्या विचारांचे रोपण व्हावे म्हणून त्यांनी अथक प्रयत्न केले.

गावात शाळा सुरू केल्या, कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप सुरू केली, ग्रंथालय स्थापन केले, महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पासून ते रँग्लर परांजपे यांच्या पर्यंत विद्वानांना व्याख्यानासाठी गावात आणलं.

गायन वादन नृत्य नाटक या कलानां प्रोत्साहन तर दिलंच शिवाय संस्थानातील शेतकऱ्यांनी शेतीचे नवे तंत्र अवलंबावे यासाठी इचलकरंजी शेतकरी संघाची स्थापना केली. बेंदराच्या निमित्ताने जनावरांच्या स्पर्धा, प्रदर्शने, शर्यती घोरपडे सरकारांनी भरवली

इचलकरंजीमध्ये सहकाराची चळवळीची मुहूर्त मेढ देखील नारायणराव घोरपडे यांनी रोवली होती.

फक्त इचलकरंजी नाही तर संस्थांनातील छोट्या मोठ्या खेड्यात देखील त्यांनी पतपेढ्या उभारल्या. रयतेला बँकेत पैसे साठवण्याची सवय लावली. दक्षिण महाराष्ट्रातील संस्थानचे प्रतिनिधी म्हणून त्यांची मुंबईच्या कायदेमंडळात नेमणूक झाली होती. तिथे अर्थसंकल्पावर त्यांनी केलेली अभ्यासपूर्ण भाषणे प्रचंड गाजली.

इचलकरंजीमध्ये वस्त्रोद्योग कसा सुरू झाला याची कथा देखील इंटरेस्टिंग आहे.

इचलकरंजीमध्ये त्या काळी किरकोळ स्वरूपात हातमाग होते. त्यावर गालिच्याचे गूढार कापड विणले जात आडे पण या कापडाला फारशी मागणी नसल्यामुळे हा व्यवसाय नुकसानीचाच होता. हातमाग चालवणारे विणकर कर्जबाजारी झाले होते. जहागीरदारांनी त्यांना भांडवल देऊन सूत व रेशीम रंगवण्याचे काम सुरू केले.

१९०२ साली मुंबईमध्ये भरलेल्या यंत्रसामुग्री प्रदर्शनास श्रीमंत नारायण घोरपडे यांनी भेट दिली.

तेव्हा इंग्लंडमधून आणलेला शेफिल्डचा यंत्रमाग त्यांनी पहिला. इचलकरंजीच्याच विठ्ठलराव दातार या हरहुन्नरी तरुणाला त्यांनी हे प्रदर्शन व तो यंत्रमग पाहण्यासाठी पाठवून दिले.

दातार मुंबईला गेले. त्यांनी तो यंत्रमाग खरेदी केला. आपला पुण्यातील कुलुपाचा बिझनेस गुंडाळून यंत्रमागासह इचलकरंजीला आले.

१९०४ साली श्रीमंत घोरपडेंच्या मदतीने सुरू झालेल्या कारखान्यास त्यांनी आपल्या कुलदैवताचे नाव दिले,

व्यंकटेश रंगू तंतू मिल

पुढे मुंबईबाहेर विकेंद्रित झालेल्या कापड उद्योगाची ही सुरवात होती.

दातार यांच्या कारखाण्याचे यश बघून इचलकरंजीमधल्या इतरांनी देखील यंत्रमाग कारखाने सुरू केले. बाबासाहेब घोरपडे यांनी १९०७ साली जिनिंग कारखाना सुरू करण्यासाठी व्यापाऱ्यांना प्रोत्साहन दिले. नाममात्र भाड्याने जागा देऊन कारखानादारी वाढवली.

यंत्रमाग उद्योग इचलकरंजीमध्ये रुजावा म्हणून जहागीरदारांनी सढळ हाताने मदत केली.

बाहेर गावचे कसबी कारागीर गावात आणून वसवले. भांडवलाची सोय केली. बुगड, कांबळे, मराठे, सांगले या गावातल्या तरुणांनी देखील अपार मेहनत घेऊन व्यवसाय वाढवला.

या उद्योगपतींना पतपुरवठा व्हावा म्हणून जहागीरदारांनी इचलकरंजी अर्बन बँकेची स्थापना केली.

सुरवातीच्या काळात गावात धोतराचे कापड तयार होत होते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जवळपास ३०० हातमाग असणाऱ्या गावात काहीच वर्षात १४०० यंत्रमाग धडधडत होते.

पहिल्या महायुद्धानंतर गावात रंगीत पातळे तयार होऊ लागली. तेव्हाच इचलकरंजीला मँचेस्टर ही ओळख मिळाली.

फक्त इचलकरंजीच नाही तर आसपासच्या छोट्या खेड्यातील शेतकरी देखील आपल्या गोठ्यात यंत्रमाग घालून कापडाच उत्पादन घेऊ लागले. कोणतेही पारंपरिक कौशल्य नसताना, कापड उद्योगासाठी कच्चा माल उत्पादन होत नसताना, कापडाची बाजारपेठ नसताना इचलकरंजीच्या राजाच्या दूरदृष्टीच्या जोरावर हा व्यवसाय बहरला.

स्वातंत्र्यानंतर हे संस्थान विलीन झालं. त्यांनंतरही हा उद्योग वाढतच गेला.

बाबासाहेब खंजिरे, दत्ताजीराव कदम, रत्नाप्पा कुंभार , बाळासाहेब माने, कल्लाप्पा आवाडे,प्रकाश आवाडे यांच्या सारख्या नेत्यांमुळे गावात सहकारी चळवळ रुजली. सहकारी सूतगिरण्या उभ्या राहिल्या. सायझिंग, प्रोसेसिंग कारखानेदेखील सहकारी तत्वावर उभे राहिले. याचा वस्त्रोद्योगाला प्रचंड फायदा झाला.

राजस्थान गुजरात येथून आलेल्या व्यापाऱ्यांनीदेखील गावात बस्तान मांडलं. साखर विरघळावी तसे हे इचलकरंजीमध्ये विरघळून गेले. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या उद्योगपतींमुळे गाव कॉस्मोपोलिटीन बनलं.

मजुरी करण्यासाठी आलेले गोरगरीब देखील आपल्या कष्टाने उद्योजक बनले.

रात्रंदिवस धडधडणारे यंत्रमाग इचलकरंजीत अनेकांसाठी रक्तवाहिनी बनले आहेत. सहकारी चळवळीपासून कामगार चळवळीपर्यंत प्रत्येक चळवळ गावात रुजली व आजही जिवंत ठेवली.

जहागीरदारांच्या आलिशान राजवाड्यातच कल्लापा आवाडे या दूरदृष्टी असलेल्या नेत्याने वसंतदादा पाटलांच्या मदतीने टेक्स्टाईल इंजिनियरिंग कॉलेज सुरू केलं.

नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी पाहिलेलं आधुनिकतेच स्वप्न आणखी पुढे गेले. इथे शिकून बाहेर पडणाऱ्या इंजिनियर्सनी गावात ऑटो लूम, शटल लूम, गारमेंट, होजिअरी सारखे हायटेक मशिनरी आणले.

गेले काही वर्षे मात्र सरकारची धोरणे व मंदीच्या कारणांनी गावातला वस्त्रोद्योग थंडावला आहे.

पंचगंगा नदीचा महापूर व कोरोना या लागोपाठच्या अस्मानी संकटांनी गावाचे कंबरडे मोडले आहे. मात्र इथले उद्योगपती, कामगार, व्यापारी सहजासहजी हार मानणारे नाहीत.

वस्त्रोद्योगाच्या जागतिक नकाशावर तेजाने तळपणाऱ्या या नगरीच्या शतकोत्तर वाटचाल नव्या दमाने नव्या जोमाने पुन्हा उभारी घेईल यात शंका नाही.

हे ही वाच भिडू.

2 Comments
 1. Tushar Sutar says

  अलिकडे एक जाहिरात बघण्यात आली hair oil chi त्या जाहिरातीत एक कंपनी आपल्या प्रति स्पर्धा असणार्‍या दुसर्‍या hair oil che direct नाव घेऊन जाहिरात करते असे करता येते मला पडलेला एक प्रश्न? धन्यवाद

 2. Ashok Govande says

  या पोस्ट मधील माहिती अर्धवट आहे. किंबहुना इचलकरंजीतील वस्त्रोद्योगाच्या उभारणी आणि वाढीसाठी कारणीभूत असलेल्या कांहीं महत्वाच्या घटना आणि व्यक्तींचा त्यात उल्लेख नाही. त्या मी तुमच्या माहितीसाठी खाली देत आहे.
  १९५९ सालची ही घटना आहे. दिवाळीचे दिवस होते ते. एक व्यक्ती मिरज स्टेशन वर सांगलीला जाण्यासाठी पॅसेंजर ट्रेनसाठी वाट पहात बसली होती. ती व्यक्ती नुकतीच त्यावेळच्या कुर्डुवाडीहून आलेल्या नॅरोगेज बार्शी लाईट ट्रेन मधून उतरली होती. त्या व्यक्तीच्या दोन्ही बहिणी सांगली येथे रहात होत्या. भाऊबीजेच्या ओवाळणी साठी त्या व्यक्तीला त्यांच्या कडे जायचं होतं. ती व्यक्ती प्लॅटफॉर्म वर गाडीची वाट पहात उभी असताना अचानक त्यांच्या पाठीवर कुणीतरी थाप मारून तिला विचारलं”अरे तु राम नं? ” त्या व्यक्तीनं गडबडून मागे वळून पाहिलं व म्हणाली ‘हो ‘ अरे आब्या तु ? आणि मग त्या दोघांनी एकमेकांना चक्क मिठी मारली. किती वर्षांनी दोघे एकमेकांना भेटत होते. त्या दोन व्यक्ती पैकी एक होती माजी खासदार “कै.आबासाहेब खेबुडकर ” आणि दुसरी व्यक्ती होती कै. रामचंद्र दत्तात्रय गोवंडे ” माझे वडील. आबासाहेब आणि माझे वडील एकमेकांचे शालेय मित्र. दोघेही इचलकरंजीला एकाच शाळेत शिकलेले. माझे वडील त्यावेळी गुलबर्गा (कर्नाटक) येथे एका मोठ्या स्पिनिंग मिल मधे जनरल मॅनेजर या पदावर काम करत होते व दरवर्षी ते दिवाळीला भाऊबीजेच्या दिवशी सांगलीला यायचे. गुलबर्गा ते कुर्डुवाडी व कुर्डुवाडी ते मिरज असा तो प्रवास असायचा. ते एका स्पिनिंग मिल मधे एवढ्या मोठ्या पदावर आहेत हे कळल्यावर आबासाहेबानी त्याना त्यांच्या सांगलीच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले.
  त्यानंतर त्याची सांगलीत भेट झाली. आबासाहेबानी माझ्या वडिलांना विचारलं अरे राम तु एवढा वस्त्रोद्योगातला तज्ञ झाला आहेस पण आपल्या गांवासाठी तुझ्या ज्ञानाचा काय उपयोग ? तु इकडे ये आपण इथेच कांहीतरी करू. मग माझ्या वडिलांनी त्यांना सांगितले की तुम्ही इचलकरंजीत स्पिनिंग मिल काढत असाल तर मी येथे यायला तयार आहे. मग काय आबासाहेबानी त्वरीत पाउले उचलली. त्यांनी लगेच इचलकरंजीतील आपल्या कांहीं मित्रांना , माजी खासदार कै.दत्ताजीराव कदमअण्णा, अनंतराव भिडे, पंडितराव सावनुरे, ताराचंदजी बोहरा, वसंतराव दातार व अन्य कांहीं यांची बैठक बोलावली व त्याना माझ्या वडिलांच्या बरोबर झालेल्या चर्चेचा तपशील सांगितला व त्या बैठकीतच सहकारी तत्त्वावर स्पिनिंग मिल काढण्याचे ठरले. वसंतराव दातार यांनी आपली २६ एकर जागा मोफत देऊकरून जागेचा प्रश्न सोडवला. अनंतराव भिडेनी तर चक्क सायकलवरून फिरून शेअर्स गोळा केले. अश्या तर्हेने दि डेक्कन को.ॲाप. स्पिनिंग मिल्स लिमिटेड या आशिया खंडातल्या पहील्या सुतगिरणीचा जन्म झाला.
  माझे वडील या मिलचे पहिले संस्थापक जनरल मॅनेजर झाले. गुलबर्गा येथे मिलच्या भल्या मोठ्या बंगल्यात राहणारे माझे वडील सुरवातीला, डेक्कनची उभारणी चालु असताना एका खोपटीवजा घरात रहात होते. या मिलचे १९६१ साली तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली डॅा.राधाकृष्णन यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झाले. माझ्या वडिलांना त्यांच्या हस्ते सुवर्ण पदक देण्यात आले. त्यानंतर या सुतगिरणीने १९६१ ते १९७५ या दरम्यान अशी कांहीं झेप घेतली की हा काळ इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाच्या इतिहासातला सुवर्णकाळ म्हणून गणला जातो. या गिरणीमुळे इचलकरंजी परिसरातील अनेक सहकारी संस्थांना , आयको, दत्त साखर कारखाना व इतर अनेक खाजगी कारखान्याना जन्म दिला.
  वरील माहिती डेक्कन शी संबंधित फक्त कांहीं लोकांनाच माहीत आहे. तुम्ही पाठवलेल्या पोस्ट वरील सर्व व्यक्तींचा उल्लेख नाही. सदर माहिती नव्या पिढीला कळावी म्हणूनच हा प्रपंच.

Leave A Reply

Your email address will not be published.