गांधींनी कधिही न वापरलेला गांधी टोपी, नेमकी कोणाची ?

गांधींच्या विचारांच वजन खूप मोठ्ठ होतं. सहजासहजी कोणत्याच राजकारण्याला न झेपणारी गोष्ट म्हणजे गांधी विचार. कदाचित हेच वजन हलकं करायला भारतीय राजकारणात गांधी टोपी आली असावी. एकदा टोपी घातली की ती मिरवणं सोप्प जातं. मग टोपीखाली नेमके कोणते विचार आहेत हे बघायचं कष्ट घेतले जात नाही.या गोष्टीस सन्मानीय अपवाद देखील आहेतच.  

असो, कॉंग्रेस आणि गांधी टोपी हेच राजकिय समीकरण वाटणाऱ्या तुम्हा आम्हा मतदारांना या टोपीचे आणि टोपी खालचे काही किस्से माहित असायलाच हवेत, 

म्हणून हा खास गांधीजयंतीचा लेख !

पहिला मुद्दा म्हणजे गांधी टोपी आणि महात्मा गांधी हे एकमेकांसोबत कसे जोडले, याचा शोध गांधींना लावला होता का ? 

तर नाही. गांधी टोपी हि पुर्वीपासून भारतीय संस्कृतीचा घटक राहिली आहे. उत्तर भारतापासून ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गांधी टोपी पुर्वीपासून प्रचलित होती. ती तितकीच लोकप्रिय देखील होती. फक्त या टोपीला गांधी टोपी अस नाव नव्हतं.. 

महात्मा गांधी द. आफ्रिकेमध्ये होते तेव्हाची हि गोष्ट. तिथे त्यांनी आंदोलन केली आणि तिथल्या ब्रिटीश सत्तेनं त्यांना जेलमध्ये टाकलं. तेव्हा भारतीय कैद्यांसाठी जेलमध्ये वेगळी सोय करण्यात येई. तिथे भारतीय कैद्यांची चटकन ओळख व्हावी म्हणून त्यांना सरकारकडून टोपी देण्यात येत असे. तीच हि गांधी टोपी. पुढे अस झालं की गांधी भारतात आले. इथे आल्यानंतर त्यांनी काही दिवस पगडी वापरली. नंतर डोक्यावरचा तो भार देखील हलका केला. आंदोलन करुन त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार करण्यास सुरवात केली. हे करत असताना खादीचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून त्यांनी रोजच्या वापरातील टोपी देखील स्वदेशी सोबत जोडून घेतली. कॉंग्रेसच्या सोबत असणारे नेते, स्वातंत्र आंदोलनात सक्रिय असणारे नेते, कार्यकर्ते अशा सर्वांनी गांधी टोपी वापरण्यास सुरवात केली व तिथून पुढे टोपी सोबत गांधींच नाव म्हणजे जीवाभावाचं नात म्हणून जन्माला आलं. 

आत्ता किस्से गांधी टोपीचे.

गांधी टोपीमध्ये अग्रक्रमांकावर नाव घ्याव लागेल ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच. भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून केल्या जाणाऱ्या त्यांच्या उल्लेखात गांधी टोपी वापरणाने पहिले पंतप्रधान म्हणून देखील उल्लेख करावा लागेल. तसेच महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे देखील गांधी टोपी वापरणारे होते. या दोघांनीही गांधी टोपीची शोभा वाढवली, किंवा गांधी टोपीमुळे यांची शोभा वाढली असही म्हणता येईल. नेहरू तसे हिरो दिसायचे. राजकुमार टाईपमध्ये त्यांचा संपुर्ण पोशाख असायचा. कोटावर लाल गुलाब असायचं. अशा पोशाखावर त्यांनी एखादी इंग्लीश हॅट वापरली असती तर सुरेख मेळ साधला असता पण त्याच एका टोपीमुळे नेहरू अस्सल भारतीय पोशाखात खरे उतरायचे. पण यशवंतरावाचं थोड वेगळं होतं. यशवंतराव चव्हाण कृष्णेचं पाणी अगाखांद्यावर घेतलेले माणूस. त्याचं आणि गांधी टोपीचं नात गांधींच्या स्वदेशी चळवळीच्या अगोदर पासूनच असावं. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना, उपपंतप्रधान असताना बाहेरील देशात जायचे. तेव्हा देखी त्या सुटाबुटावर पांढरी गांधी टोपी असायचीच. 

हे दोन मोठ्ठे आणि पहिल्या क्रमांकाचे नेते झाले की राज्यात आणि केंद्रात असणारी काही ठळक नावं आठवतात. त्यात पहिलं नाव म्हणजे लालबहादूर शास्त्री. महाराष्ट्रातल्या नेत्यांची नावे आठवायची झाले तर बाळासाहेब विखे पाटील, राजारामबापू पाटील, शंकरराव चव्हाण, शंकरराव मोहिते पाटील… अशी यादी निघते. 

बाळासाहेब विखे पाटलांना तर खाजगीत टोपीच म्हणायचे, असं जुने कार्यकर्ते सांगतात. राजकारणात पाठीमागे बोलण्याचा एक भारी प्रकार अस्तित्वात आहेच. तर अशी चर्चा करत असताना टोपी म्हणलं तरी ते बाळासाहेब विखे पाटलांबद्दल बोलतायतं ते समजून जायचं. राजारामबापू पाटील हे देखील गांधी टोपी वापरणाऱ्यांमधील एक भन्नाट नेते. जयंत पाटील यांचे वडिल असणारे राजारामबापू पाटील धोतर वापरायचे. त्यावरती सदरा कोट आणि टोपी.

हे ही वाचा –

त्यानंतर उल्लेख करावा लागेल तो हेडमास्तरांचा !

शंकरराव चव्हाण यांची टोपी थोडीशी गोल दिसायची पण गांधी टोपीचं नात सांगणारीच होती. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना मंत्रालय आवोजावो घर तुम्हाला झालं होतं. वसंतदादांचा स्वभाव देखील तसाच माणसात मिसळणारा असल्याने मंत्रालयात देखील कोणाही कधीही येत असे. शंकरराव चव्हाणांनी कारभार हातात घेतल्यानंतर त्यात वक्तशीरपणा आणला. त्याचं नाव महाराष्ट्राने हेडमास्तर म्हणून कोरून ठेवलं. याच हेडमास्तरांच्या डोक्यावर गांधी टोपी लख्खपणे शोभून दिसायची. सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटलांनी देखील आपली टोपी तितक्याच ताकदीने संभाळली म्हणता येईल.. 

आत्ता गांधी टोपी वापरणाऱ्या नेत्यांमधलं साम्य शोधायचं झालं तर ती निव्वळ अशक्य गोष्ट आहे. पण आत्ता मुख्य गंम्मत अशी की आज गांधी टोपी वापरणारे महाराष्ट्रातले एकमेव नेते मात्र भाजपकडे आहेत. आत्ता चोरून कोणी म्हणाल की, हा बघा पुरावा भाजपचं पुर्णपणे कॉंग्रेस झालय तर ते वरचेवर बरोबर देखील वाटेल. 

हरिभाऊ बागडे हे एकमेव नेते आणि आपले लाडके #अध्यक्षमहोदय गांधी टोपी वापरतात.

दूसरं महत्वाच नाव येते ते म्हणजे अण्णा हजारे. अण्णांना म्हणजे प्रतीगांधीच जणू. महात्मा गांधींना जी टोपी वापरण्याचं भाग्य मिळालं नाही ती टोपी वापरुन अण्णा हजारेंनी जनलोकपालचा नारा दिला. या  हुंकारादरम्यान नकळतपणे हि टोपी मैं अण्णा म्हणत आपच्या डोक्यावर जावून चिटकली. त्या टोपीवर पुन्हा आम आदमीचा शिक्का लागला. गांधीनी ज्या भावनेतून टोपी स्वराज्याशी जोडून घेण्याचा प्रयत्न केला होता तो आम आदमी लिहून करण्यात आला खरा, पण यंदाच्या वेळेला पक्ष वेगवेगळे होते. 

गांधी टोपी न वापरणारे नेते म्हणजे वसंतदादा, शरद पवार, गोपीनाथ मुंडे, महाजन, विलासराव देखमुख वगैरे वगैरे हिकडून तिकडून असणारी भल्ली मोठ्ठी यादी. या नेत्यांनी कधीच रोजच्या कारभारात गांधी टोपी वापरली नाही.

त्यामुळे ना टोपीचं महत्व कमी झालं ना नेत्याचं. टोपीनं काय दिलं तर वेगळेपण… इतकं की गांधीबाबाची असलेली नसलेली हि टोपी कधी काळी झाली तर कधी हिरवी.. हल्लीच्या मोर्चांमध्ये ती भगवी आणि निळी देखील झाली. पण आकार बदलण्याचं धाडसं मात्र बदललं नाही, अशा वेळी गांधीबाबा टोप्या पाहून हसत असतील हे मात्र नक्की ! 

हे ही वाचा –  

Leave A Reply

Your email address will not be published.