खरच १९७१ च्या युद्धावेळी राजीव गांधी इटलीला पळून गेले होते का ?

एक पोस्ट व्हायरल होतं आहे, सुरवातीला हिंदीमधून आलेली ही पोस्ट हळुहळु मराठीमध्ये देखील भाषांतर झाली. बऱ्याच जणांनी हि पोस्ट शेअर केली आहे. सुरवातीला या पोस्टमध्ये काय लिहण्यात आलं आहे ते आपण पाहू. 

Screenshot 2019 03 04 at 6.50.41 PM

 

राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्यावर आरोप करण्यात येणारी पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर वेगवेगळ्या व्यक्तीमार्फत खुलासे करण्यात आले. त्यातील सर्वात महत्वाचा खुलासा होता तो म्हणजे राजीव गांधी हे कमर्शियल पायलट होते. ते भारतीय हवाई दलाचे पायलट नव्हते त्यामुळे त्यांना रजा मंजूर करण्याचा किंवा न करण्याचा प्रश्नच सरकारपुढे नव्हता. 25 जानेवारी 1968 साली राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच लग्न झालं तर त्याच वर्षी राजीव गांधी इंडियन एअरलाईन्समध्ये पायलट म्हणून नोकरीस लागले.

19 जून 1970 रोजी राहूल गांधी यांचा जन्म झाला तर 12 जानेवारी 1972 रोजी प्रियांका गांधी यांचा जन्म झाला. देशात युद्धजन्य परस्थिती असताना सोनिया गांधी, राजीव गांधी हे इंदिरा गांधी यांच्यासोबत दिल्लीतल्या निवासस्थानी असल्याचं, त्या काळात सोनिया गांधी गरोदर असल्याची माहिती मिळते.

मात्र तरिही एक प्रश्न काही लोकांसाठी पडतो तो म्हणजे 1971 च्या युद्धप्रसंगी राजीव गांधी, सोनिया गांधी खरेच इटलीला गेले होते का. 

या गोष्टीबद्दल अधिक माहिती घेतली असता लेखिका सविता दामले यांनी केलेला खुलासा वाचण्यात आला. राजहंस प्रकाशन पुणे यांच्यामार्फत सोनिया गांधींच चरित्र मराठीत भाषांतर करण्याच काम लेखिका सविता दामले यांनी केलं आहे. ज्या पुस्तकाचं भाषांतर झालं ते पुस्तक स्पॅनिश लेखक हावियर मोरो यांनी लिहलं आहे. लेखक स्पॅनिश असल्याने त्यावर गांधी घराण्याचा कोणताच दबाव असण्याचा प्रश्न नसल्याचं लेखिका सविता दामले लिहतात. तसेच हे पुस्तक वाचताना ते खुलेपणाने मांडण्यात आल्याचं वाचक सांगतात.

याच पुस्तकात, 1971 च्या युद्धप्रसंगावेळी इंदिरा गांधी, सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांच्या खाजगी आयुष्यात कोणत्या घडामोडी घडत होत्या याबद्दल लिहण्यात आलं आहे. लेखिका सविता दामले यांनी केलेले भाषांतर त्यांच्याच शब्दात खालीलप्रमाणे आहे, 

निर्वासितांच्या लोंढ्याला खंडच पडत नव्हता. दररोज जवळजवळ दीड लाख लोक सीमा ओलांडून भारतात येत होते. ते ट्रकमधून येत होते, रिक्षांतून येत होते, पायी येत होते. कलकत्त्याला भेट देऊन आल्यावर इंदिराजी किती अवस्थ होत्या हे सोनियानं स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. 

मुसळधार पावसात मी निर्वासितांच्या छावण्यांना भेट दिली. जेवणाच्या टेबलाशी बसताना त्या म्हणाल्या. त्यांना भूकच नव्हती त्यामुळे त्यांनी काहीच खाल्लं नाही.

वाटलं होतं की फाळणीच्या काळात निर्वासितांच्या छावण्या पाहाण्याचा अनुभव गाठीशी असल्यामुळे तिथं काय पाहायला मिळेल ह्याबद्दल मनाची तयारी झाली असेल. पण तसं झालं नाही. दात कोरायच्या काडीसारखे वाळलेले स्त्रीपुरूष मी तिथं पाहिले, मुलांचे तर हाडांचे नुसते सापळे शिल्लक होते. वृद्ध लोकांना त्यांच्या तरूण मुलांनी पुरात बुडलेल्या शेतांमधून पाठुंगळीला मारून आणलेलं होतं. तासंतास त्यांना चिखलात उभं राहावं लागलं होतं.माझ्यासोबतच्या लोकांची अपेक्षा होती की मी निदान चार शब्द बोलावेत. पण मी एवढी अस्वस्थ झाले होते की माझ्या तोंडून त्या लोकांची समजूत काढायला शब्दच फुटले नाहीत.

आठ आठवड्यात पस्तीस लाख निर्वासितांनी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली. त्यातले बहुसंख्य हिंदू असले तरी त्यात मुसलमान, बौद्ध आणि ख्रिश्चनही होते. इंदिराजींनी वारंवार सांगितलं की काय वाट्टेल ते झालं तरी आम्ही निर्वासितांना वाऱ्यावर सोडून देणार नाही. त्यांनी आणि त्यांच्या सल्लागारांनी निर्वासितांच्या छावण्यांची व्यवस्था अत्यंत काळजीपूर्वक आखली. हा खर्च भागवण्यासाठी पुन्हा एकदा त्यांना पैसे मागत जगभर फिरावं लागलं असतं तर तेही करण्याची त्यांची तयारी होती. 

प्रसंगाला लागलेल्या नव्या वळणामुळे सोनिया थोडी घाबरली होती. परंतु तिनं आपली भीती दाखवली नाही. तिचा आपल्या सासुबाईंवर पूर्ण विश्वास होता. प्रसारमाध्यमे वारंवार सांगत होती की अत्याचार अजूनही चालूच आहेत आणि निर्वासितांचे लोंढेही कमी झालेले नाहीत. ह्या सगळ्याचा शेवट होणार होता तरी कुठं? हेच प्रश्न टीव्हीवरील भयानक दृश्यं पाहून लोकांना पडत होते.

सरकारनं सैन्य पाठवावं असं आवाहन सगळीकडून होऊ लागलं. परंतु भरपूर ताण असूनही इंदिराजींनी आपला शांतपणा ढळू दिला नाही. नेहमीप्रमाणे संकटसमयी त्या परिस्थितीचा संपूर्ण ताबा घेत तसाच आत्ताही त्यांनी घेतला. घरातील वातावरणामुळेच केवळ त्यांच्या जीवाला थोडासा शांतपणा मिळत होता. राहुलला बागडताना पाहून त्यांच्या मनावर जणू फुंकरच घातली जात होती. जगातील एक शष्ठांश लोकसंख्येवर ज्या निर्णयाचा परिणाम होणार होता असा निर्णय घेणं हा मानसिक छळवादच होता. डोक्यातील विचार स्पष्ट ठेवणं आणि शांत राहाणं हे त्यांच्या दृष्टीनं, देशाच्या दृष्टीनं आणि जगाच्या दृष्टीनं गरजेचं होतं. त्यासाठी त्यांना सोनियाची खूप मदत झाली.

त्यांनी पॉलाला लिहिलं, तुमची मुलगी म्हणजे रत्न आहे रत्न. चार लोकांतही त्या सोनियाचं खूप कौतुक करीत. एका ज्येष्ठ पत्रकाराला त्यांनी सांगितलं की, साध्या शब्दांत सांगायचं तर ती खूपच छान मुलगी आहे. एक उत्तम पत्नी, उत्तम सून, उत्तम माता आणि अत्यंत उत्तम गृहिणी आहे. कुणाचा विश्वासही बसणार नाही अशी गोष्ट म्हणजे अंतःकरणाने सोनिया कुठल्याही भारतीय मुलीपेक्षा अधिक भारतीय आहे.

एके दिवशी घरातील सर्वजण निर्वासितांवर बनवलेली डॉक्युमेंटरी फिल्म पहायला गेले. इंदिराजींची मैत्रीण आणि पत्रकार गीता मेहता ह्यांनी बनवलेली ती फिल्म अमेरिकेत दाखवली जाणार होती. त्यातील दृश्ये पाहून सोनिया हेलावून गेली. पाकिस्तानी सैनिकांनी काही स्त्रियांना पकडून खंदकात डांबून ठेवलं होतं, त्या स्त्रियांची अवस्था त्यात दाखवली होती, त्यांच्या मुलाखतीही होत्या. त्यातील पंधरा वर्षांच्या एका मुलीवर दोनशे वेळा बलात्कार झाला असावा. तिला रडूसुद्धा येत नव्हतं. ती एक प्रकारच्या सुन्न बेहोषीत जाणवत होती. उद्ध्वस्त घरांकडे परतणारे तरूण आणि वयस्कर लोक त्यात दिसत होते, जाळलेली, उखडून टाकलेली शेतं त्यात दिसत होती. ती फिल्म संपली तेव्हा सोनियाला दिसलं की इंदिराजी रडत आहेत.

जागतिक जनमताचा रेटा वाढवण्यासाठी युरोप-अमेरिकेचा दौरा करण्याशिवाय दुसरा पर्यायच इंदिराजींपुढे राहिला नव्हता. 

‘आपण त्या दिवशी पाहिलेल्या माहितीपटामधील चित्रं पाश्चात्यांनी पाहिली तर मला खात्री आहे की ते नक्कीच काहीतरी हालचाल करतील, त्या सोनियाला म्हणाल्या.

ह्या कारणासाठी प्रवास करायला त्यांनी बराच वेळ हाताशी ठेवला होता. घरची व्यवस्था नीट होईल ह्याची निश्चिंती वाटूनच त्या बाहेर पडल्या होत्या, कारण त्यासाठी लागणारी मनःशांती त्यांना नक्कीच लाभली होती. वाटेत एके ठिकाणी थांबल्या असताना त्यांनी एका अरब पत्रकाराला सांगितलं, सोनिया घरी असली की मला घराची काळजी नसते. दौऱ्यावर निघण्यापूर्वी त्यांच्या सुनेनं त्यांना आणखी एक गोड बातमी दिली होती, ती पुन्हा गरोदर होती आणि नऊ महिने तिला पलंगावर झोपून काढावे लागतील असं ह्यावेळी तरी वाटत नव्हतं.

भारतात परतल्यावर त्यांना समजलं की निर्वासितांची संख्या कोटीपर्यंत पोचली आहे. आता लढाई अटळ आहे ह्याबद्दल त्यांची खात्रीच झाली. परंतु त्याबद्दल आपल्या घरच्यांशी त्यांनी अवाक्षरही काढलं नाही. प्रवासात अनुभवलेले ताणतणाव, देशाच्या सीमेवर घोंगावणाऱ्या संकटाचं सावट ह्या गोष्टींबद्दल न बोलता व्हिएन्ना येथे त्या ऑपेराला गेल्या होत्या त्याबद्दल त्यांनी सांगितलं. जणू आपण छोट्याशा सुटीवरूनच परतलो आहोत असा देखावा त्या करीत होत्या. तसं करताना, आपण खूप दमलो आहोत आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं काहीच प्रतिसाद न दिल्यामुळे खूप हताशही झालो आहोत हे वास्तव त्या लपवू पाहात होत्या.

परंतु राजीव आणि सोनिया त्यामुळं फसले नाहीत. त्या कसल्या तणावाच्या परिस्थितीत जगत होत्या ह्याची त्यांना चांगलीच कल्पना होती. लढाई होणार हे सत्य सरतेशेवटी इंदिराजी त्यांच्यापासून लपवू शकल्या नाहीतच. तुम्ही बाहेर कमी जात जा, गेलात तर सुरक्षा व्यवस्था ठेवत जा, निदान हे सगळं थांबेपर्यंत तरी तसं करा. इंदिराजींनी त्यांना सांगितलं. सारा देशच मागणी करतोय की ताबडतोबीची आणि अचूक कृती करा, वेळ निघून चालला आहे.

रात्री जनरल माणेकशा आले तेव्हा त्यांच्यातील अर्धमुर्धं संभाषण सोनिया- राजीवच्या कानी पडलं. सैन्याची तयारी, बांगलादेशात उभारलेले सैन्याचे तळ हयाबद्दल ते माहिती सांगत होते. त्या तळांवरून सैन्याच्या हालचाली होणार होत्या. त्याशिवाय पश्चिम पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवरही तुकड्या तैनात करून आपण संरक्षण पुरवले आहे हेही त्यांनी इंदिराजींना सांगितलं.

आपल्याला युद्धात उतरावंच लागेल, सॅम, इंदिराजींचं बोलणं त्यांनी ऐकलं.

युद्धात उतरायचं असेल तर ते आत्ताच उतरायला हवं. ४ डिसेंबरला पौर्णिमा असल्याचा फायदा घेऊन आपण ढाक्यावर हल्ला करू शकतो.

इंदिराजी क्षणभर विचारात बुडल्या. आपल्यावर युद्ध सुरू करण्याचा प्रसंग येईल अशी कल्पनाही त्यांनी आत्तापर्यंत कधी केली नव्हती. परंतु सारं जग त्या समस्येकडे दुर्लक्ष करीत असेल, परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर सगळी सूत्रं आपल्या हातात घेण्यावाचून त्यांच्यापुढे कसलाही पर्यायच शिल्लक राहिला नव्हता. इंदिराजींनी आपल्या जुन्या मित्राकडे- माणेकशांकडे मान वळवली आणि म्हटलं,

’’ ठीक आहे सॅम, तसंच करा.’’

घरी असताना आपण चिंतेत आहोत हे दिसू नये ह्यासाठी इंदिराजी आटोकाट प्रयत्न करीत. खरं तर घरातले सर्वजणच तसा प्रयत्न करीत होते. कधीकधी आई खूप तणावात दिसली की राजीव तिला मिठी मारत असे.

आता सर्वांना सोनियाची काळजी वाटत होती कारण तिचं गरोदरपण आता बऱ्यापैकी पुढं गेलं होतं. नाहीतरी पडत्या काळात आपल्या भावना दडवून ठेवण्याची सवय नेहरू कुटुंबाला झालेली होतीच.

समजा, राजीव आणि सोनिया काही काळ इटलीला गेले तर?

एका मैत्रिणीनं सोनियाला सुचवलं परंतु सोनियानं ती सूचना नाकारली. अशा परिस्थितीत इंदिराजींना एकटं टाकून जाण्याची तिची मुळीच तयारी नव्हती. सोनिया आता आपल्या सासुबाईंना चांगली ओळखू लागली होती. तिला माहिती होतं की आत्ता, ह्या वेळेस त्यांना आपल्या कुटुंबीयांच्या आधाराची, प्रेमाची जास्त गरज आहे. त्याशिवाय तिचा आणि राजीवचा जीवनावर, भविष्यावर, इंदिराजींवर आणि भारतावर दृढ विश्वास होता. पराभवाच्या शक्यतेचा विचारही त्यांच्या मनात येत नव्हता.

फारसे प्रश्न न विचारता इंदिराजींच्या अवतीभवती ते आपुलकीनं वावरत होते, दिवस भरत आल्यामुळे अवघडलेल्या स्थितीतल्या सोनियाला बाळंतपण कसं निभेल ह्याची काळजी वाटत होती. पण ती चेहऱ्यावरुन मात्र अजिबात तसं दाखवत नव्हती. आयुष्य तसं नेहमीसारखंच चाललं होतं फक्त त्यांच्या घराभोवतीची सुरक्षा वाढवली होती. शिवाय जनरल माणेकशा रोज सकाळी त्यांच्या घरी येत होते आणि इंदिराजींसोबत ब्रेकफास्ट करताकरता त्यांना रोजचा अहवाल देत होते.

अस सविता दामले यांनी भाषांतरीत केलेल्या पुस्तकात लिहण्यात आलं आहे. लेखिका सविता दामले यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर देखील हा उतारा दिला आहे. 

हे ही वाचा. 

2 Comments
  1. Kalash Bhagwat says

    Nice page

  2. Anurag says

    कुठून ढापले हे सगळ, तुम्ही तर मला मराठी के Quint वाटू राहिले .. कांग्रेस धरजिन्या पालीव सहित्यकारांची कृति छापन्या पूर्वी विचार तरी करावा

Leave A Reply

Your email address will not be published.