हल्दीराम ते बजाज : या 9 कंपन्या भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीपासून टॉपवर आहेत..

आपण बाजारात साध्या मिठापासून मोटरपर्यंत सगळ्या वस्तू खरेदी करतो. पण ती वस्तू खरेदी करतांना आपण एक गोष्ट आवर्जून बघतो. ती म्हणजे खरेदी करायची वस्तू कोणत्या ब्रँडची आहे. कारण ब्रँडेड वस्तू या कायमच उत्तम मानल्या जातात. हल्ली बाजारात चायनीज ब्रँडचा सुळसुळाट झालाय.

परंतु भिडूंनो भारतात अशा सुद्धा कंपन्या आहेत ज्यांनी स्वातंत्र्यापूर्वीच सुरुवात केली आणि आज भारतासह जगभरात सेवा पुरवतात. त्यातल्याच १० जुन्या भारतीय कंपन्या ज्या आजही भारतात आपले पाय रोवून आहेत.

१. वाडिया ग्रुप

वाडिया ग्रुप हा देशातील सगळ्यात जुना उद्योगसमूह आहे. लोजी नुसेरवानजी वाडिया यांनी सर्वप्रथम १७३६ मध्ये मरीन कंस्ट्रक्शनची स्थापना केली. ही कंपनी ब्रिटिशांसाठी जहाजांची बांधणी करायची. स्थापनेपासून १५० वर्षापर्यंत मरीन कंस्ट्रक्शनने ३५५ हुन अधिक जहाजांची बांधणी केलीय. त्या जहाजांमध्ये जगातील सगळ्यात जुने जहाज एचएमएस ट्रिंकोमालीचा समावेश आहे.

जहाजबांधणीपासून सुरु झालेल्या वाडिया ग्रुपकडे आज अनेक जागतिक कंपन्या आहेत. 

यामध्ये विमानवाहतुकीत ‘गो एयर लाईन’; चहाच्या व्यापारात ‘बॉम्बे बर्मा’ कंज्युमरमध्ये ‘बॉम्बे डाईंग’, ‘ब्रिटानिया’; केमिकल्स मध्ये ‘नॅशनल पॅरॉक्साईड’चा समावेश आहे. तर रियल इस्टेटमध्ये ‘बॉम्बे रियल्टी’, ‘वाडिया टेक्नो इंजिनियरिंग सर्व्हिस’ तर हेल्थकेअर मध्ये ‘डेंटल प्रोडक्टस’, ‘मेडिकल मायक्रोटेक्नोलॉजी’ आणि ‘इंस्ट्रुमेंट्स आर्थोपेडिक्स’ या वेगवेगळ्या कंपन्यांचा समावेश आहे.

२. आदित्य बिर्ला ग्रुप

आदित्य बिर्ला ग्रुप अथवा बिर्ला ग्रुपची स्थापना शेठ शिव नारायण बिर्ला यांनी १८५७ मध्ये केली होती. सुरुवातीला शेठ शिव नारायण बिर्ला हे कापसाचा व्यापार करायचे. कापसाच्या व्यापारानंतर १९१९ मध्ये घनश्यामदास बिर्ला यांनी ‘बिर्ला ब्रदर्स लिमिटेडची स्थापना केली. त्यांनतर बिर्ला ग्रुपच्या घोडदौडीस सुरुवात झाली.

वर्तमान परिस्थितीत आदित्य बिर्ला ग्रुप भारतातील सगळ्यात मोठ्या उद्योगसमूहांपैकी एक आहे. कापसाच्या व्यापारापासून सुरु झालेल्या बिर्ला ग्रुपच्या आज कार्बन ब्लॅक, सिमेंट, केमिकल्स, खाणकाम, मेटल्स, रिटेल, टेक्सटाईल्स, फिनान्शिअल सर्व्हिस, पवनऊर्जा टेकनॉकम्म्युनिकेशन तसेच पल्प अँड फायबर यांसारख्या कंपन्या आहेत. आजच्या घडीला २६ देशात व्यवसाय करणारा बिर्ला ग्रुप हा एक  आंतराष्ट्रीय उद्योगसमूह आहे.

३. ‘टाटा ग्रुप म्हणजेच देशाचा ग्रुप’

‘टाटा ग्रुप म्हणजेच देशाचा ग्रुप’ असं समीकरण भारतीय लोकांच्या मनात रुजलंय. या टाटा ग्रुपची स्थापना १८६८ मध्ये २९ वर्षीय जमशेदजी टाटा यांनी केली. कापूस आणि अफूच्या व्यापारापासून सुरु झालेला हा टाटा उद्योगसमूह आज भारतातील सगळ्यात मोठा उद्योग समूह आहे.

टाटा ग्रुपमध्ये टाटा स्टील, टीसीएस, टाटा मोटर्स, टाटा केमिकल्स, टायटन, टाटा कपिटल, टाटा पॉवर, इंडियन हॉटेल्स, टाटा कम्युनिकेशसन्स, टाटा डिजिटल्स, टाटा इलेकट्रोनिक्स, टाटा पॉवर्स यांसारख्या बलाढ्य कंपन्या टाटा ग्रुपच्या हातात आहेत. या सगळ्या कंपन्यांचा कारभार टाटा सन्सच्या माध्यमातून चालतो.

टाटा सन्सचे ६० टक्के भागभांडवल टाटा सन्सच्या एकूण २९ समाजसेवी संस्थांच्या मालकीचे आहेत. २०२१-२० मध्ये टाटा ग्रुपचा एकूण महसूल १२८ बिलियन डॉलर होता. आजच्या घडीला टाटा ग्रुपच्या सर्व कंपन्यांमध्ये तब्बल ९ लाख ३५ हजार कर्मचारी काम करतात. 

४. ‘मेड इन इंडिया’ची संकल्पना आणणारा गोदरेज ग्रुप

लग्नात आहेर म्हणून नेहमी गोदरेजचंच कपाट दिलं जातं. आपल्या गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेल्या गोदरेज कंपनीची स्थापना अर्देशीर गोदरेज आणि पिरोजशहा गोदरेज यांनी १८९७ मध्ये केली होती. आपल्या लॉकर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या या कंपनीची स्थापनाच कुलुप बनवण्यापासून झाली होती.

कुलुप निर्मितीनंतर कंपनीने आपला व्यवसाय खाद्यतेल, फर्निचर ते रियल इस्टेट या क्षेत्रात विस्तारला. गोदरेज ग्रुपचे संस्थापक अर्देशीर गोदरेज यांनीच ‘मेड इन इंडिया’ ही संकल्पना अस्तित्वात आणली होती. परंतु ब्रिटिश शासनाने भारतीय वस्तूंवर मेड इन इंडिया लिहिण्यास परवानगी नाकारल्यामुळे त्यांची कल्पना तेव्हा साकार होऊ शकली नाही.

१९५८ मध्ये गोदरेजने भारतातील पहिला फ्रिज बनवला तर २००८ मध्ये चांद्रयान-१ साठी लोंकच व्हीकल आणि लुनर आर्बीटर बनवलं होतं. गोदरेज उद्योग समूह आपली गुंतवणूक शिक्षण आणि पर्यावरपूरक व्यवसायांमध्ये करतो. त्यामुळे या समूहाला ग्रीन उद्योग समूह सुद्धा म्हणतात

५. शालिमार पेंट्स

शालिमार पेंट्स हे भारतातील सगळ्यात महागड्या पेन्ट्सपैकी एक आहे. शालिमार पेन्ट्सची सुरुवात ब्रिटिश उद्योजक ए. एन. टर्नर आणि ए. सी. राईट यांनी १९०२ मध्ये केली. ही कंपनी भारतातील सगळ्यात दर्जेदार पेंट्स उत्पादनांसाठी ओळखली जाते.

राष्ट्रपती भवन, हावडा ब्रिज, सॉल्ट लेक स्टेडियम, एम्स यांसारख्या अतिशय महत्वाच्या इमारतींना कलर करण्यासाठी शालिमार पेंट्सचा वापर करण्यात आलाय. त्यामुळे शालिमार पेन्ट्सला प्रतिष्ठा मिळालेली आहे. 

६. कन्साई नेरोलॅक पेंट्स

कन्साई नेरोलॅक पेंट्स ही भारतातील सगळ्यात नावाजलेल्या पेंट्स कंपनीपैकी एक आहे. कन्साई नेरोलॅक पेंट्सची निर्मिती कन्साई पेंट्स या मूळ जापनीज कंपनीपासून झालीय. परंतु १९२० मध्ये भारतीय असलेल्या एच. एम. भारुका यांनी या कंपनीची सुरुवात मुंबईत केली. 

वर्तमानात कन्साई नेरोलॅक पेंट्स ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी पेंट्स कंपनी आहे. जेव्हा या कंपनीची सुरुवात झाली होती तेव्हा केवळ भिंती रंगवण्याचं पेंट या कंपनीत तयार व्हायचं. परंतु आता भिंती रंगवण्याच्या पेन्टबरोबर केमिकल्स, गाड्या रंगवण्याचे ऑइल पेंट्स, जुन्या गाड्यांचे रिनोव्हेशन आणि काचेच्या कोटिंग्स करण्याच्या क्षेत्रातील सगळ्यात मोठी कंपनी म्हणून कन्साई नेरोलॅक पेंट्सचं नाव घेतलं जातं. 

७. बजाज ग्रुप

बुलंद भारत की बुलंद तस्वीर हमारा बजाज… हमारा बजाज… 

या एका वाक्यावरून बजाज कंपनीला संपूर्ण भारतात ओळखलं जातं. महात्मा गांधींचे शिष्य असलेल्या शेठ जमनालाल बजाज यांनी १९२९ मध्ये बजाज ग्रुपची स्थापन केली होती. जमनालाल बजाज हे मुळात एका व्यापारी कुटुंबातले होते. परंतु समाजसेवेची आवड असल्यामुळे त्यांनी घरदार सोडलं आणि गांधीजींचे अनुयायी झाले. महात्मा गांधी त्यांना आपला मानस पुत्र मानत होते.

जमनालाल बजाज यांनी बजाज उद्योगाची स्थापना केली तेव्हा केवळ कच्चा माल आणि खाण्यापिण्याच्या वस्तू विकल्या जात होत्या. त्याच बजाज ग्रुपमध्ये आज २२ हुन अधिक कंपन्यांचा समावेश होतो. त्यात बजाज ऑटो, बजाज फायनान्स, बजाज फिन्सर्व, बजाज इलेक्ट्रिक या मोठ्या कंपन्यांचा समावेश होतो.

बजाज ऑटो ही जगातील तिसरी सगळ्यात मोठी ऑटो बनवणारी कंपनी आहे. तर बजाजची स्कुटर ही एकेकाळी भारतातील सगळ्यात फेमस स्कुटर होती. 

८. हल्दीराम

हल्दीराम ऐकून तोंडाला पाणी आलं! हल्दीरामच्या व्यवसायाबद्दल फारसं सांगण्याची गरज नाही कारण सगळ्यांना ते माहीतच आहे. हल्दीराम कंपनीची स्थापन बिकानेरचे प्रसिद्ध हलवाई गंगा बिशन अग्रवाल म्हणजेच हल्दीराम यांनी केली होती. अग्रवाल यांनी कंपनीची स्थापना बिकानेरमध्ये केली मात्र काहीच काळात हल्दीराम कंपनी भारतभर पसरली. सध्या या कंपनीचं मुख्यालय नागपूर शहरात आहे.

एका सध्या मिठाईच्या दुकानापासून सुरु झालेली ही कंपनी आज भारतातील सगळ्यात मोठी स्नॅक्स कंपनी आहे. आजच्या घडीला हल्दीराम कंपनीचे तब्बल ४१० प्रॉडक्ट आहेत आणि हे प्रॉडक्ट जगभरातील ८० देशांमध्ये विकले जातात. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या सगळ्या मोठ्या शहरांमध्ये हल्दीरामचे फूड प्लॅन्ट आहेत.

एक साधा मिठाईवाला गल्लीतलं दुकान किती मोठं करु शकतो त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हल्दीराम. 

९. महिंद्रा अँड महिंद्रा

महिंद्रा अँड महिंद्रा गुपचे सीईओ आनंद महिंद्रा हे कायम आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात. आनंद महिंद्रा यांच्या महिंद्रा ग्रुपची स्थापन सुद्धा स्वातंत्र्यापूर्वीच झाली होती. १९४५ मध्ये के सी महिंद्रा, जे सी महिंद्रा आणि एम जी मुहम्मद यांनी स्टीलच्या व्यापाराची सुरुवात केली. १९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर एम जी मुहम्मद पाकिस्तानात गेले. त्यामुळे संपूर्ण कंपंनी केवळ महिंद्राकडेच  राहिली.

१९४५ मध्ये सध्या स्टीलच्या व्यापारापासून सुरु झालेली ही कंपनी ट्रॅक्टर, कार, मोटारसायकलचं उत्पादन करते. एवढंच नाही तर महिंद्रा ही भारतातील सगळ्यात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी आहे. तर पाचवी मोठी कार उत्पादक कंपनी आहे.

या ९ कंपन्यांबरोबरच अनेक भारतीय कंपन्यांची स्थापना स्वातंत्र्यापूर्वीच झालीय. मात्र या कंपन्यांचं नाव भारतात विशेषकरून घेतलं जातं. तसेच स्वातंत्र्यानंतर सुद्धा अनेक कंपन्यांची भारतात सुरुवात झालीय आणि अल्पावधीतच त्या कंपन्या आंतराष्ट्रीय कंपन्या झाल्यात.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.