प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची निंदा केली तर मुस्लिम देशात ईशनिंदा कायद्यान्वये मृत्यूदंड असतोय
डिसेंबर २०२१ मधील एक घटना आहे. पाकिस्तानमधील जमावाने एका श्रीलंकन नागरिकाची हत्या केली अन त्याचा मृतदेह जाळला होता. त्याचा गुन्हा काय होता ? ईशनिंदा !
२०११ मधील ख्रिश्चन महिला असिया बिबीला लाहोर उच्च न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली, तिचा गुन्हा काय ? ईशनिंदा !
२०११ मध्ये पंजाबचे माजी गव्हर्नर सलमान तसिर यांना त्यांच्याच सुरक्षारक्षकाने गोळ्या झाडल्या. त्यांचा गुन्हा काय ? ईशनिंदा !
२०१७ मध्ये पाकिस्तानातील विद्यापीठात एका विद्यार्थ्याची जमावाने हत्या केली, त्या विद्यार्थ्याचा गुन्हा काय होता? ईशनिंदा !
या ईशनिंदाचा अन या जुन्या घटनेचा उल्लेख यासाठी की, भारतात सद्या भाजप नेत्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत अपमानास्पद बोलल्या आहेत जो आखाती देशात, इस्लाम धर्मीय देशांमध्ये गंभीर गुन्हा मनाला जातोय. त्यामुळे अनेक आखाती देशांनी भारतावर विशेषकरून भाजपवर टिका करायला सुरूवात केली आहे.
नुपूर शर्मा यांनी केलेलं वक्तव्य हे इस्लाम धर्मीय देशांत ईशनिंदेचा गुन्हा आहे ज्याची शिक्षा म्हणजे मृत्युदंड आहे.
ईशनिंदा कायदा काय आहे आणि कोणत्या देशांनी तो स्वीकारला आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो.
जगातील अनेक इस्लामिक देशांमध्ये धर्माशी निगडित ईशनिंदा कायदा करण्यात आला आहे. जिथे हा कायदा अत्यंत कठोरपणे पाळला जातो.
थोडक्यात ईशनिंदा म्हणजे ईश्वर ची निंदा करणे, देवतेचा अपमान करणे, पवित्र वस्तूंचा अपमान करणे, धर्माचा अवमान करणे.
एखाद्या व्यक्तीने जाणूनबुजून प्रार्थनास्थळाचे नुकसान केले, धार्मिक कार्यात अडथळा आणला, अपमान केला किंवा धार्मिक भावना दुखावल्या तर तो ईशनिंदेच्या कक्षेत येतो. जगातील अनेक देशांमध्ये ईशनिंदाबाबत कायदेही आहेत. या देशांमध्ये ईशनिंदा करण्यासाठी निश्चित अशी शिक्षेची तरतूद आहे.
ईशनिंदा कायदा म्हणजे नेमकं काय ?
इस्लाम किंवा पैगंबर मुहम्मद यांच्या विरोधात काहीही बोलल्यास किंवा कृत्य केल्यास मृत्यूदंडाची तरतूद आहे, असे ईशनिंदा कायद्यात म्हटले आहे. फाशीची शिक्षा न दिल्यास आरोपीला दंडासह जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. अशीही माहिती मिळतेय कि, या कायद्याचा पाया ब्रिटिश राजवटीत घातला गेला.
रिसर्च फर्म प्यूच्या अहवालानुसार, जगातील २६ टक्के देशांमध्ये असेच ईशनिंदेची कायदे आणि धोरणे आहेत, ज्यामध्ये धर्माचा अपमान केल्यास शिक्षेची तरतूद आहे. यापैकी ७० टक्के मुस्लिम देश आहेत.
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, अनेक मुस्लिमबहुल देशांमध्ये दंडासह शिक्षेची तरतूद आहे, परंतु सौदी अरेबिया, इराण आणि पाकिस्तानमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते.
म्हणजेच चुकूनही जर एखाद्याचा धर्माबाबतचा दृष्टिकोन नकारात्मक असेल आणि तो दृष्टिकोन जगासमोर आला असेल तर त्याला मृत्युदंड हा अटळ असतो. या कायद्याच्या धर्मांधपणात ना महिला सुटल्यात ना बालके वाचलीत. हा कायदा एवढा क्रूरपणे अंमलात आणला जातो त्यामुळे साहजिकच आहे या ईशनिंदा कायद्याबाबत जगभरातून निदर्शने होत असतात.
ईशनिंदा कायदे कोणत्या परिस्थितीत वापरले जातात?
- धर्म आणि धार्मिक गटांची बदनामी झाली असेल तर,
- धर्म आणि त्याच्या अनुयायांची बदनामी केली तर,
- धर्म आणि त्याच्या अनुयायांच्या धार्मिक भावना दुखावल्या तर,
- धर्माचा अवमान/निंदा केली तर,
ईश्वरनिंदेच्या चर्चेत ईश्वरावर टीका करण्यात आणि निंदा करण्यात फरक असतो का ?
धर्मावर आणि संस्कृतीवर टीका आणि निंदा यात फरक आहे. टीका ही भाषण किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अंतर्गत येते. जिथे लोकं त्या धर्माविरुद्ध वाईट शब्द न वापरता तर्क आणि तर्कशुद्धतेच्या आधारे एखाद्या धर्मावर टीका करू शकतात. मात्र निंदा म्हणजे, एखादा असा शब्द वापरायचा किंवा कृती करायची ज्याद्वारे धर्माची बदनामी होईल.
ईशनिंदा कायद्यावर काय आक्षेप आहे?
या कायद्याशी संबंधित वाद पाकिस्तानच्या उदाहरणावरून समजून घेऊया, पाकिस्तानात धार्मिक अल्पसंख्याकांचा छळ करण्यासाठी या कायद्याचा वापर केला जातो असा आरोप होतो.
पाकिस्तानात एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ४ टक्के लोकसंख्या ही ख्रिश्चन आहेत. ख्रिश्चनांचा एक गट म्हणतो की लोक ईश्वरनिंदा कायद्याचा हवाला देऊन वैयक्तिक सूड उगवला जातो. या कायद्याच्या नावाखाली त्यांच्यावर अत्याचार केला जातो.. बऱ्याचदा असं होतं कि, अनेकांवर ईशनिंदेचे खोटे आरोपही येतात.
मानवाधिकार संघटना आणि संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या ठरावांद्वारे ईशनिंदाचा वारंवार निषेध करण्यात आला आहे. आता काहींच्या अशाही टीका आहेत कि, या कायद्याचा दुरुपयोग वैयक्तिक वादासाठी केला जातोय.
तर काही राज्ये ईशनिंदा कायद्याचे लोकांच्या धार्मिक श्रद्धांचे “संरक्षण” म्हणून समर्थन करतात.
पाकिस्तान, इराण, सौदी अरेबिया, मलेशिया, इजिप्त आणि इंडोनेशियामध्ये ईशनिंदा कायद्याची कडक अंमलबजावणी केली जाते.
सौदी अरब देशातील बघायचं तर,
सौदी अरेबियामध्ये इस्लामिक कायदा शरिया लागू आहे. सौदी अरेबियामध्ये लागू केलेल्या शरिया कायद्यानुसार, ईशनिंदा करणाऱ्या लोकांना ‘मुर्तद’ म्हणजेच अल्लाह ला न मानणारे म्हणून घोषित केले जाते आणि त्याबद्दलची शिक्षा म्हणजेच मृत्यूदंड दिला जातो.
२०१४ मध्ये, दहशतवादाचा सामना करण्यासाठी सौदी अरेबियामध्ये एक नवीन कायदा लागू करण्यात आला होता, ज्या कायद्याअंतर्गत असं स्पष्टपणे नमूद केले आहे की, कोणत्याही स्वरूपात नास्तिकतेचा प्रसार करणे आणि ज्या आधारे हा देश स्थापन झाला आहे त्या इस्लामच्या मूलभूत तत्त्वांवर प्रश्न उपस्थित करणे हे कायद्याने गुन्हा असल्याचे जाहीर केले आहे.
इराण देशातील बघूया,
२०१२ मध्ये, इराणमध्ये नव्याने लागू करण्यात आलेल्या दंड संहितेत ईशनिंदा एक नवीन कलम जोडण्यात आले आहे. या नवीन कलमांतर्गत धर्म न मानणाऱ्या आणि धर्माचा अपमान करणाऱ्यांना फाशीची शिक्षा निश्चित करण्यात आली आहे.
नवीन संहितेच्या कलम २६० अंतर्गत पैगंबर-ए-इस्लाम किंवा इतर कोणत्याही पैगंबरांची निंदा करणाऱ्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल.
इंडोनेशिया देशात…
जगातील सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियामध्ये सरकारच्या मते, केवळ एका देवावर विश्वास ठेवला जाऊ शकतो. इंडोनेशिया देशाच्या घटनेत १९६९ मध्ये कलम A-१५६ अंतर्गत हा ईशनिंदा कायदा समाविष्ट करण्यात आला.
या कायद्यांतर्गत देशातीळ अधिकृत धर्म इस्लाम, ख्रिश्चन, हिंदू, बौद्ध यांच्याशी फारकत घेणे किंवा या धर्मांचा अपमान करण्याला ईशनिंदा मानले जाते, त्याला जास्तीत जास्त पाच वर्षे कारावासाची शिक्षा होऊ शकते.
मलेशिया मध्ये…
पाकिस्तानच्या दंड संहितेप्रमाणे मलेशियाचा दंड संहिता मुळात ब्रिटिशांनी बनवलेल्या दंड संहितेवर आधारित आहे. दोन्ही देशांतील ईशनिंदेशी संबंधित कायदे खूप समान आहेत.
मलेशियाच्या दंड संहितेच्या कलम २९५, २९८ आणि २९८-अ हे कलम ईशनिंदेशी संबंधित आहेत. या अंतर्गत कोणत्याही धर्माच्या धार्मिक स्थळाचा अपमान करणे, समाजात फूट पाडणे किंवा धर्माच्या आधारे लोकांना भडकवणे, जाणूनबुजून कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावणे हा गुन्हा आहे. यामध्ये जास्तीत जास्त तीन वर्षे कारावास आणि दंड अशी शिक्षा आहे.
तुलनेने पाकिस्तानात हा कायदा कठोरपणे राबवला जातो…
फक्त पाकिस्तानमधील या ईशनिंदेच्या अंमलबजावणीची आकडेवारी पाहिल्यास,
१९९१ मध्ये या ईश्वरनिंदेसाठी मृत्युदंडाची तरतूद करण्यात आली. आत्तापर्यंत जवळपास २,५०० लोकं या कायद्याच्या मृत्युदंडात मारले गेलेत. पाकिस्तानच्या इतिहासात या कायद्याच्या विरोधातील लढाई ही प्रदीर्घ काळाची राहिलीय.
याआधीही अनेकदा या वादग्रस्त ईशनिंदा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र ती मागणी पूर्ण होऊ शकली नाही. धार्मिक अल्पसंख्याक या विरोधात लढा देत आहेत, पण त्यांचा आवाज कुणीही ऐकत नाही. जेंव्हा जेंव्हा अशी परिस्थिती पाकिस्तान सारख्या देशात उद्भवली तेंव्हा तेंव्हा सरकारवर टीका झाली, मात्र तरीही सरकारला हा कायदा रद्द करता आला नाही.
अगदी न्यायालयांना देखील हा कायदा रद्द करण्याची भीती वाटत असते अशी परिस्थिती सद्या पाकिस्तान सारख्या देशात आहे.
यामागचं गंभीर कारण म्हणजे, हा कायदा नाकारल्यास देशात हिंसेला आणि दहशतवादाला प्रोत्साहन मिळू शकते, असे त्या त्या इस्लामी देशांच्या सरकारांनी त्यांच्या स्पष्टीकरणात म्हटले आहे.
हे ही वाच भिडू :
- नुपूर शर्मा काय बोलल्या ज्यामुळे अरब देश नाराज झालेत; असं आहे संपुर्ण प्रकरण
- बिश्नोई समाज : पर्यावरणाला वाचवण्यासाठी हा समाज चक्क माणसांना मारण्यासाठी तयार आहे..?
- हिंदू देवदेवतांचा अपमान करणाऱ्या एम एफ हुसेनला कतारने नं मागता नागरिकत्व दिलं होतं