टू व्हीलरवर ट्रिप्सी फिरायला परवानगी देऊ, युपीच्या निवडणुकीत नवीन आश्वासन आलंय.

हॉस्टेलला असताना एक ठरलेला सीन असायचा. पहिली तर कुणाची गाडी भेटायची वणवण आणि भेटली तर मग त्यात तीन जणांत मागे कोण बसणार यांवरून मग पुन्हा भांडण. कारण पण तसंच असायचं. स्कुटी किंवा बाइकवर जो मागे बसणार असायचा त्याला प्रत्येक सिग्नलला उतरून काही अंतर पुढे चालत येईला लागायचं. पण हा प्लॅन ही नेहमीच चालायचा नाही.

बऱ्याच वेळा पोलीस अशा ठिकाणी उभे असतात की जोपर्यंत ते आपल्या पुढे प्रकट होत नाहीत तोपर्यंत ते दिसत पण नाहीत.  मग पोलिसांनी पकडलं तर कितीही गया वया केली तरी ४००-५००ची पावती फाडावीच लागते. यामुळेच मग बटर चिकन खायला निघालेलो आम्ही शेवटी मग वडापाव खाऊनच परतायचो. तुमच्यापैकी अनेक जणांना हा अनुभव आला असेल. बॅचलर्स लोकांचा तर टू व्हीलरवर ट्रिप्सी हा एकदम जिव्हाळ्याचा प्रश्न.

किती सरकारे आली नी गेली पण कोणी तरुणाईच्या या ‘ज्वलंत’ मुद्याला हात घातला नाही. मात्र शेवटी एका नेत्याने हा विषय हाताळायचं ठरवलंय.

उत्तर प्रदेशमध्ये लोकांना बाइक किंवा स्कुटीवरून ट्रिप्सी फिरण्याची परवानगी दिली जाऊ शकते.

असं म्हणणं आहे सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांचे. ओम प्रकाश राजभर यांनी म्हटले आहे की २०२२ च्या यूपी विधानसभा निवडणुकीनंतर जर त्यांचे युतीचे सरकार बनले तर यूपीमध्ये तीन लोकांना बाइकवर फिरण्याची परवानगी दिली जाईल. त्यामुळॆ यूपीमध्ये ट्रिप्सी फिरणाऱ्यांकडून कोणताही फाइन पोलीसांना घेता येणार नाही.

आपल्या आश्वासनामागचं लॉजिक पण ओमप्रकाश राजभर यांनी दिलं आहे. “एका ट्रेनच्या डब्यात ७० लोकांची जागा असते.तरीही 300 लोक त्यात जातात. मात्र त्यावर कोणतेही चलन नाही. जीपमध्ये ९जणांची जागा असताना देखील त्यामध्ये २०-२५जण बसतात तरीही त्यावर चालान नाही. मग दुचाकीवर बसलेल्या तीन जणांना चालान का? वाद झाला की २ पोलीस एका व्यक्तीला दुचाकीवर घेऊन येतात. ते तीन असताना चालान का तयार होत नाही? यामुळे आमचे सरकार आल्यास दुचाकीवरून तीन जण फिरणाऱ्यांना मोकळे करू किंवा ट्रेन आणि जीपचेही चलन करू.”

आता राजभर भाऊंनी निवडणुकीच्या तोंडावर ही घोषणा केली खरी पण टू व्हिलर वरून ट्रिप्सी फिरून देणं हे राज्य सरकारच्या हातात आहे का ?

मोटार व्हेईकल कायदा, १९८८ चे कलम १२८ (१) सांगते की बाईकवर फक्त दोन लोक प्रवास करू शकतात. हा केंद्रीय कायदा आहे. त्यामुळं कायद्याच्या विरुद्ध जाणाऱ्या सुधारणा राज्य करू शकत नाही.

तसेच अपघातांच्या बाबतीत ट्रिपल रायडर्सना विम्याचा लाभ देण्यास कोर्टानेही नकार दिला आहे. त्यामुळं ओमप्रकाश राजभर यांना नुसती उत्तरप्रदेशातच नाही तर तर केंद्रात पण आपली सत्ता आणावी लागेल.  त्यामुळं एवढी लोकप्रिय घोषणा करूनही ती सत्यात येण्याची शक्यता धूसर आहे.

पण फक्त बॅचलर्स लोकांनचाच हा प्रश्न आहे असं नाही अनेकदा ३-४ जणांचं कुटुंबही टू व्हिलरवर फिरत असतंय. त्यामुळं या ट्रिप्सी ना फिरून देण्याचा नियमावर तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला कंमेंट करून जरूर सांगा. 

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.