ओरिसाचे आदिवासी ते गोविंदा कनेक्शन : अवतार सिनेमाचे असे आहेत १० भन्नाट किस्से

अवतार नावाचा हॉलिवूड पिक्चर बघितलाय का तुम्ही ?

या ‘अवतार’ने सगळ्या जगाला वेड लावलं होतं. यात एक वेगळीच दुनिया दाखवली होती. त्यात ना धड माणसं होती. ना धड भुतं ना धड एलियन्स. थोडेसे माणसांसारखे दिसणारे पण निळ्या रंगाचे शेपूट असलेले उंचच उंच लोकं. आपण इमॅजिनदेखील करू शकलो नसतो या लेव्हलचं अ‍ॅनिमेशन अवतार मध्ये दाखवलं होतं. आता भारी गोष्ट म्हणजे तब्बल १३ वर्षानंतर अवतारचा सिक्वेल येतोय.

त्याचं नाव अवतार : द वे ऑफ वॉटर असं आहे. 

जो १६० भाषांमध्ये डब होणार असून जगभरात १६ डिसेंबर २०२२ रिलीज केला जाईल. याचे प्रोड्युसर जॉन लँडौ आहेत तर जेम्स कॅमेरॉन हे डायरेक्टर आहेत.

इतकंच नाही तर अवताराचे अजून पार्टस येणार आहेत, त्यापैकी २०२४ मध्ये अवतार ३ येणार, २०२६ मध्ये अवतार ४ येणार आणि २०२८ मध्ये अवतार ५ येणार आहे.

तुम्ही अवताराचे फॅन असाल तर तुम्हाला अवतार आणि अवतार २ बद्दलचे असे १० फॅक्टस माहितीच हवेत…

फॅक्ट नंबर- १

अवताराचे डायरेक्टर जेम्स कॅमेरॉन हा माणूसच कामासाठी चिवट म्हणून ओळखला जातो….

जेम्स कॅमेरॉन हे तेच आहेत ज्यांनी टायटॅनिक, टर्मिनेटर, एलियन बनवला. यातल्या टायटॅनिकने काय यश कमवलं हे वेगळं सांगायची गरज नाही. 

आता अवतारचं बोलायचं तर जेम्स कॅमेरॉन १९९४ पासूनच या अवतारच्या प्रोजेक्टवर काम करत होते. त्यांचा प्लॅन असाच होता की, १९९७ मध्ये टायटॅनिक रिलीज झाल्यानंतर १९९९ मध्ये अवतार रिलीज करायचा. पण त्यांना ज्याप्रकारे अवतार मध्ये स्पेशल इफेक्टस हवे होते, ते प्रत्यक्षात आणण्यासाठीची टेक्नॉलॉजी तेंव्हा एव्हीलेबल नव्हती. 

यामुळे त्यांना हा प्रोजेक्ट नाईलाजाने काही काळासाठी बाजूला ठेवावा लागला होता. १९९४ ते २००१ पर्यंत ते फक्त स्क्रिप्ट वर काम करत होते. आणि अखेर २००५ मध्ये या पिक्चरचं शूटिंग सुरु झालं अन २००९ मध्ये हा पिक्चर रिलीज झाला.

फॅक्ट नंबर -२

अवतार सलग १० वर्ष सर्वात जास्त कमाई करणारा पिक्चर होता. 

अवतार डिसेंबर २००९ मध्ये रिलीज झाला. त्यानंतर २०१९ मध्ये ऍव्हेंजर्स : एंड गेम’ रिलीज झाला. ऍव्हेंजर्स येईपर्यंत म्हणजेच २००९ ते २०१९ या दरम्यान अवतारचं सर्वाधिक कमाई करणारा पिक्चर होता.  

अवतार बनवण्यासाठी २३८ मिलियन डॉलर म्हणजेच १७७६ कोटींचा खर्च आला होता…तर या पिक्चरने २.७९ बिलियन डॉलर्सची म्हणजेच २० हजार ९०० कोटी रुपयांची कमाई केली होती. जगातली सगळ्यात जास्त कमाई करणारा हा पिक्चर ठरला होता. त्याने टायटॅनिकचंही रेकॉर्ड मोडलं होतं. आता येणारा अवतार -२ देखील घासून कमाई करणार यात शंका नाही.

फॅक्ट नंबर – ३

या पिक्चरमध्ये दाखवलेले निळ्या रंगाचे लोकं. जेम्स कॅमेरॉन यांच्यासाठी अवतार हा फक्त एक पिक्चर नव्हता तर त्यांच्या आईचं स्वप्न होतं. म्हणजे लिटरली स्वप्नच होतं. जेम्स असं सांगतात कि त्यांच्या आईला एक स्वप्न पडलं ज्यात त्या १२ फूट उंच आणि पूर्णपणे निळ्या रंगाच्या बनल्या होत्या.

हीच आयडिया जेम्स यांनी उचलली अन पिक्चरमध्ये निळ्या रंगाचे लोकं दाखवले. याशिवाय जेम्सला टर्मिनेटर हा पिक्चर बनविण्याची प्रेरणा देखील त्यांना पडलेल्या एका स्वप्नामुळेच मिळाली होती. 

आता असंही सांगितलं जातं की, जेम्सने हिंदू देवी-देवताना ज्याप्रमाणे निळ्या रंगात दाखवलं जातं ते त्यांनी पाहिलं आणि त्यांनी अवतारमध्ये निळ्या रंगाचे लोकं दाखवले. 

फॅक्ट नंबर -४

अवतारची स्टोरी….अवतार रिलीज झाला तेंव्हा अशी चर्चा होती की, जेम्सने भारतीय पौराणिक कथांपासून प्रेरित होऊन अवताराची स्टोरी लिहिली.  तसेच भगवान विष्णूंच्या १० अवतारांपासून प्रेरित होऊन त्यांनी पिक्चरचं नाव ‘अवतार’ ठेवलं.

याशिवाय अशीही चर्चा होती की, मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांच्या ‘व्हिएतनाम कॉलनी’ या पिक्चरची स्टोरी अवतारच्या स्टोरीशी मिळती जुळती आहे. पण या सगळ्या चर्चांवर जेम्स स्वतः सांगतात त्यांनी ‘पोकहॉंटस’ या अ‍ॅनिमेटेड पिक्चरपासून प्रेरणा घेऊन अवताराची स्टोरी लिहिली होती. 

अवतार रिलीज झाला तेंव्हा ७ फिल्म डिरेक्टर्सने जेम्सवर आरोप केलेला कि तुम्ही आमची स्टोरी चोरली. मग जेम्सने कोर्टात ५० पानांचं स्पष्टीकरण देऊन या पिक्चरच्या स्टोरीची आयडिया कशी आली सांगतात आणि केस जिंकतात.

फॅक्ट नंबर -५

या पिक्चरचं शूटिंग. हे शूटिंग सुरु व्हायच्या आधी सगळ्या टीमला जेम्स यांनी जंगलामध्ये वास्तव्य करायला लावलं, हवाई जंगलच्या ट्रिप करवल्या होत्या, जेणॆरून ते पिक्चरच्या थीमसोबत कनेक्ट होतील आणि चांगली ऍक्टिंग करतील 

आता हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, संपूर्ण पिक्चरचं शूटिंग हे एका स्टुडिओमध्ये झालं होतं.  ग्रीन इफेक्ट, CGI, VFX च्या व्युज्युअल इफेक्टसच्या आधारेच या पिक्चरचं शूटिंग झालेलं. अवतारचा एकही सिन आऊटडोर शूट झालेला नाहीये.

यातली एक डॉ. सारखी स्मोक करतांना दाखवली गेली पण ते देखील CGI इफेक्टने दाखवलं गेलं प्रत्यक्षात ती स्मोक करतच नव्हती.

अवतार १ मध्ये पंडोरा ग्रहावरील दुनिया दाखवली तर अवतार २ मध्ये पाण्याच्या खालची दुनिया दाखवली जाणार आहे. मात्र ते देखील शूट स्टुडिओमध्येच झालं असून त्यातले बरेच सीन्स अंडरवॉटर शूट केलं. हि पहिला पिक्चर होता जो पूर्णपणे डिजिटली शूट केला गेलाय. 

फॅक्ट नंबर -६

अ‍ॅनिमेशन – अवतार पिक्चरची स्टोरी,दर्जेदार ऍक्टिंग आणि योग्य असं दिग्दर्शन याशिवाय सर्वात जमेची बाजू ठरली ती म्हणजे अवतारमध्ये दाखवलेलं अ‍ॅनिमेशन. याच अ‍ॅनिमेशनद्वारे पहिल्या अवतारमध्ये पृथ्वीबाहेरच्या एका काल्पनिक पँडोरा ग्रहावरील जीवन, त्यातील दऱ्या-खोऱ्या, नद्या, सावल्या हे इतकं भव्यदिव्यं स्वरुपात दाखवण्यात आलं आहे. अवतारने थ्रीडी अ‍ॅनिमेशनपटांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला.

फॅक्ट नंबर – ७ 

या पिक्चरमध्ये जंगली प्राण्यांचे आवाज मात्र खरे दाखवले गेले. त्यातला डायनोसॉरचा आवाज हा ज्युरासिक पार्कमधून घेतला गेला.

फॅक्ट नंबर – ८

अवतार साठी खास एक ‘नावी’ नावाची भाषा नव्याने तयार केली होती. नामांकित भाषा वैज्ञानिक पॉल आर फार्मन यांनी हि भाषा तयार केली. या भाषेसाठी १००० नवीन शब्द तयार केले, त्यासाठी १०६ ग्रामर रुल्स लावले. थोडक्यात सोपेच शब्द घेतले गेले जेणेकरून ऍक्टर्स लोकांना ते प्रॅनाउन्स करायला सोपं जावं. त्यानंतर या भाषेला ऑफिशीयली लॉन्चही करण्यात आलं.

असं पहिल्यांदाच घडलं होतं की, एका पिक्चरसाठी एक भाषा निर्माण केली. याचपासून प्रेरणा घेऊन बाहुबलीमध्ये ‘कल्की’भाषा तयार केली होती.  

फॅक्ट नंबर – ९

आता अवतारचं आणि बॉलिवूड ऍक्टर गोविंदाचं कनेक्शन सांगते. 

‘आप की अदालत’ या कार्यक्रमात गोविंदाने हा खुलासा केला होता की,

जेम्स कॅमरॉन यांनी अवतारसाठी गोविंदाला ऑफर दिली होती. पण त्या शूटिंग साठी ४१० दिवस लागणार होते आणि दिवसभर संपूर्ण शरीराला निळ्या रंगाचं बॉडी पेंट करायला लागणार जे गोविंदाला मान्य नव्हतं अन त्यांनी नकार कळवळा. गोविंदा यांनी हाही दावा केला कि, ‘अवतार’ हे नाव गोविंदानेच सुचवलं. शिवाय पिक्चर सुपरहिट ठरणार, त्याला ७-८ वर्ष लागणार हेही गोविंदा यांनी जेम्स कॅमरॉनला सांगितलं होतं. 

आता हे दावे कितपत खरे आहेत हे फक्त अवतारचे डिरेक्टर जेम्स कॅमेरॉन हेच सांगू शकतील…असो 

फॅक्ट नंबर -१०

अवतार ही काल्पनिक स्टोरी आहे मात्र २०१० च्या दरम्यान भारतातील ओडिसामधील डोंगरिया कोंढ नावाच्या आदिवासी जमातीचं वास्तव होतं.  

अवतारमध्ये दाखवलेल्या पँडोरा ग्रहावरच्या लोकांनी जसा मानवांच्या विरुद्ध लढा दिला त्याचप्रमाणे या ओरिसातील डोंगरिया कोंध जमातीने देखील मोठा संघर्ष केला आहे. कारण त्यांच्या परिसरात ‘वेदांता’चा एक प्रोजेक्ट येणार होता ज्याद्वारे तिथल्या जंगलांमध्ये खाणकाम होणार होतं. 

इथे खाणकाम झालं तर जंगलांचा नाश होईल, ज्याच्यावर आमचं जीवन अवलंबून आहे, तुमची स्टोरी काल्पनिक आहे पण आमची स्टोरी खरी आहे.. त्यामुळे आम्हाला मदत करा म्हणून या आदिवासींनी अवतारचे डिरेक्टर जेम्स कॅमेरॉन यांना आवाहन केलं होतं.

जेम्स कॅमेरॉन यांनी या आदिवास्यांना सपोर्ट केला होता इतकंच नाही तर अवतारच्या काही ऍक्टर्सने अवतारच्या वेशभूषेत ओरिसाच्या या आदिवासींना समर्थन दिलं होतं. 

तर या होत्या अवतार बद्दलच्या १० खास गोष्टी…

आम्हाला ‘अवतार’ बद्दलच्या जितक्या गोष्टी भारी वाटल्यास तितक्या आम्ही तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. आणखी गोष्टी तुम्हाला माहिती असतील तर त्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका म्हणजे झालं..

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.