इलेक्ट्रिक स्कुटर घ्यायचा विचार करताय तर हे ५ पर्याय चांगले आहेत

नुकताच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक झाल्या. त्यामुळे पून्हा एकदा महागाईला जोर येणार हे फिक्स. आता महागाई वाढणार म्हंटल्यावर याचा सगळ्यात आधी फटका बसणार तो पेट्रोल आणि डिझेलला. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून पेट्रोल- डिझेलच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. 

लोकांनी पेट्रोल – डिझेल वाढायच्या आधीच पेट्रोल पंपावर रांगा लावायला सुरुवात केलीये. कारण या पेट्रोलियम पदार्थांच्या किमती कधी वाढतील यांचा नेम नाही, त्यामुळं आपली फ्युलची टाकी आधीचं फुल केलेली बरी… 

आता गेल्या काही वर्षांपासून पेट्रोल – डिझेलच्या किमती वाढतच आहेत, याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला तर बसतोयचं, पण त्यासोबत गाड्या बनवणाऱ्या कंपन्यांना सुद्धा बसतोय. कारण महागड्या गाडीत महागडं इंधन टाकण्यापेक्षा ती गाडीचं नको असा विचार मंडळी करायला लागलीत. पण या सगळ्यात इलेक्ट्रिक गाड्या बनवणाऱ्या कंपन्या मात्र फुल फॉर्ममध्ये आहेत. 

गेल्या ७-८ वर्षांची आकडेवारी जर पहिली तर इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलीये. एका रिपोर्टनुसार भारतात २०२१ साली ३,२९,१९० इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झालीये. यामुळं या कंपन्यांनी सुद्धा काही वर्षांमध्येच जबरदस्त प्रॉफिट मिळवलंय. यामागचं कारण म्हणजे लोकांमध्ये प्रदूषणाबाबत वाढती जागरूकता तर आहे , पण त्यापेक्षा मोठा प्रश्न पैशांचा आहे भिडू… 

अशात जाणून घेऊ भारतातल्या टॉप ५ इलेक्ट्रिक गाड्या बनवणाऱ्या कंपन्या. यांनी काही वर्षातच इलेक्ट्रिक गाड्यांचं मोठं मार्केट खाल्लंय.

एथर एनर्जी 

२०१३ मध्ये आयआयटी ग्रॅज्युएट झालेली २ पोरं तरुण मेहता आणि स्वप्नील जैन या मित्रांनी मिळू बंगळुरू ही कंपनी सुरु केली. या पोरांचं असं काही डोक्यात नव्हतं कि, इलेक्ट्रिक गाडीचं तयार करायची. त्यांना इलेक्ट्रिक वाहनांमध्ये वापरली जाणारी इफिशिएंट लिथियम-आयन बॅटरी बनवयाची होती. पण नंतर या इंटरेस्टपायी त्यांनी गाडीवरचं फोकस करायला सुरुवात केली. २ -४ ठिकाणांवरून फंडिंग गोळा करून त्यांनी या इलेक्ट्रिक गाड्यांवर काम करायला सुरुवात केली.

कित्यके वर्षांच्या प्रयत्नानंतर एथर ४५० आणि ४५० X या दोन गाड्या तयार झाल्या. असं म्हणतात या दोन्ही गाड्या एका चार्जिंगमध्ये ७० ते ८० किलोमीटर आरामात चालतात. या गाड्यांच्या चार्जिंगसाठी कंपनी चार्जिंग डॉटसुद्धा देते. गाडी फुल चार्ज व्हायला जवळपास ९० मिनिट घेत असते.

महत्वाची गोष्ट म्हणजे एथर कंपनीचं एक ॲपसुद्धा आहे. जे आपला चार्जिंग स्टेटस किती आहे हे समजायला मदत करत. कंपनीने भारतातल्या २४ शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी आपले  २०० पेक्षा जास्त चार्जिंग डॉट, एथर ग्रीड सुद्धा लावले आहेत. आज इलेक्ट्री वाहनांमध्ये एथर कंपनीच्या गाड्यांची सगळ्यात जास्त विक्री होते.

युलू

अमित गुप्ता, आरके मिश्रा, नवीन दचूरी, हेमंत गुप्ता या चौघा दोस्तांनी मिळून २०१७ मध्ये बंगळुरू इथं युलू हा स्टार्टअप सुरु केला. आपल्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी सगळ्यात आधी ‘युलू मूव्ह’ ही इलेक्ट्रिक सायकल लॉन्च केली. आणि त्यांनतर २०१९ मध्ये ‘युलू मिरॅकल’ ही इलेक्ट्रिक स्कुटर लॉन्च केली. कंपनीचे हे दोन्ही प्रोडक्ट शहरी भागांना फोकस करूनच डिजाईन केले होते. जे एकदा चार्ज केल्यावर ७० किलोमीटर पर्यंत चालू शकत होते.  

युलूने आपलं स्वतःचं ॲपसुद्धा लॉंच केलंय, ज्यामुळे ग्राहकांना येण्या- जाण्यासाठी सोपं पडेल. या कंपनीची खासियत अशी कि कंपनी आपली इलेक्ट्रिक सायकल आणि स्कुटर भाड्याने देते. म्हणजे तुम्ही कुठल्याही युलू स्टेशनवरून सायकल किंवा स्कुटर तासावारी भाड्यानं घेऊ शकता आणि हव्या त्या ठिकाणी पोहोचल्यावर आसपासच्या ठिकाणी असणाऱ्या युलू स्टेशनवर पुन्हा पार्क करू शकता.  

कंपनीने आपल्या साध्या  सायकलींसाठी सुद्धा अशीच कन्सेप्ट वापरली होती. यासाठी अनेक शहरांमधल्या प्रशासनासोबत सुद्धा टायअप केलं होते. पुणे महानगर पालिकेनं सुद्धा आपल्या अखत्यारीत या प्रकल्प लागू केला होता. 

प्युअर ईव्ही 

आयआयटी हैद्राबादची गुरु शिष्याची जोडी, म्हणजे  प्रोफेसर डॉ. निशात डोंगरी आणि त्यांचा एक विद्यार्थी रोहित वडेरा यांनी २०१६ साली या कंपनीची सुरुवात केली. कंपनीने आधी इलेक्ट्रॉनिक सायकल, मग स्कुटर आणि गेल्या वर्षीच ETRYST 350 ही इलेक्ट्रिक बाईकसुद्धा लॉन्च केली.

या कंपनीची स्पेशालिटी म्हणजे, त्यांची पोर्टेबल बॅटरी, जी आपण घरात, ऑफिसात,  सार्वजनिक अशा कुठल्याही ठिकाणी 16amp सॉकेटसोबत चार्ज करू शकतो. तसेच बाकीच्या इलेक्ट्रीक कंपन्यांपेक्षा या कंपनीच्या गाड्यांचा स्पीड सुद्धा जास्त आहे. म्हणजे गाडी एकदा फुल चार्ज झाली कि, १२० किलोमीटर पर्यंत चालू शकते.

Batt:RE

जयपूरच्या निश्चल चौधरी यांनी २०१७ मध्ये हे इलेक्ट्रिक गाड्यांचं स्टार्टअप सुरू केलं होत. या स्टार्टअपची हटके स्टोरी म्हणजे कंपनीला आपल्या ई-सायकल आणि ई-स्कूटर्सच्या मदतीनं कार्बन फूटप्रिंट्स आणि ध्वनी प्रदूषण यासारख्या समस्यांवर तोडगा काढायचा होता. जस या कंपनीचा हेतू युनिक होता, तसं या कंपनीच्या गाड्या बाकीच्या कंपन्यांच्या गाड्यांपेक्षा वेगळ्या सुद्धा होत्या. 

म्हणजे कंपनीच्या ‘Batt:RE ONE’ स्कूटरमध्ये LFP बॅटरी जोडण्यात आली, जी कोणीही सहज स्कूटरमधून काढून पुन्हा टाकू शकत होतं. यात अँटी-थेफ्ट अलार्म आणि यूएसबी चार्जर सपोर्ट सुद्धा जोडण्यात आलाय. यासोबतच कंपनीने ‘gps:ie’ स्कूटर देखील लॉन्च केली, जी एक स्मार्ट व्हेईकल असून सिम कार्डला सुद्धा सपोर्ट करू शकत. तसचं जीपीएस ट्रॅकर, डिव्हाईस मॅनेजमेंट, डिव्हाईस स्टेटस अलर्ट आणि सिक्योर पार्किंग सारखी फीचर्स सुद्धा जोडण्यात आलीये. 

एम्पियर व्हेईकल 

आता आतापर्यंत ज्या कोणत्या इलेक्ट्रिक गाड्या आल्यात त्या शहरी लोकांच्या दृष्टीनेचं तयार करण्यात आलेल्या. आर्थिकदृष्ट्या जर विचार केला शहरांपेक्षा ग्रामीण भागातली परिस्थती कमकुवत पण त्यांचयसाठी इलेक्ट्रिक गाड्या तयार कराव्या असा विचार कोणी केला नाही. तेव्हा एम्पियर व्हेईकल समोर आलं.

हेमलता अन्नामलाई यांनी ‘Ampere Vehicles Pvt. Ltd’ या कंपनीची सुरुवात केली. जी शहरी आणि ग्रामीण भागासाठी वेगवेगळी इलेक्ट्रिक वाहनं तयार करते. ज्यात शहरी लोकांसाठी सहा इलेक्ट्रिक स्कूटरचे मॉडेल लॉन्च करण्यासोबत कमी किमतीची आणि बिना धुरावली तीन चाकी सुद्धा आहे. 

कंपनीचं ‘मित्र’ हे ई-वाहन खास कचरा वाहून नेण्यासाठी तयार करण्यात आलंय. जे २५० किलो आणि ४५० किलो अशा दोन प्रकारात येतं. यासोबतच कंपनीचं ‘त्रीसुल’ हे वाहन बड्या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना लक्षात ठेवून तयार करण्यात आलंय. जेणेकरून कंपनीतल्या कंपनीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जण सोपं पडेल. 

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.