ॲपल, सॅमसंग, वन प्लसचा कंटाळा आला असेल तर Nothing 1 पर्याय तुमच्या समोर आहे

नथिंग.. सोशल मिडीयावर चर्चेत असणारा नवा मोबाईल. सोशल मिडीयावर स्क्रोल करताना तुमच्या नजरेखालून हा फोन शंभर टक्के गेला असणार आहे..

पाठीमागे असणारे लाईट्स, आयफोन सारखा लूक.. म्हणजेच नथिंग मोबाईल. हा फोन इतका चर्चेत येण्याच कारण काय आहे? आणि नेमकं हा व्हायरल का होतोय.

तर नथिंग ही कंपनी आहे ब्रिटनची. या कंपनीचा हा पहिलाच फोन आहे. या फोनच नाव आहे नथिंग वन. आणि फोनची चर्चा होण्याचं कारण आहे याचा लूक..

म्हणजे झालय अस की लोक आत्ता नवनव्या फोनला कंटाळले आहेत. म्हणजे जरा कुठेतरी कॅमेरा वेगळा दिला, प्रोसेसर वाढवला आणि नवं नावं दिलं की झाला नवा मोबाईल लॉन्च. आत्ता अगोदरच्या काळात कसं होतं तर नोकियाचा 6233, नोकियाचा N91, नोकियाचा 6600 तसाच आपला सॅमसंग कॉर्बी नाहीतर सोनीचा वॉकमन् सिरीज हे सगळे फोन कसे एकमेकांपासून लूकला पुर्णपणे वेगळे असायचे.

पण टचस्क्रीन आल्यानंतर यामध्ये विशेष असे काहीच प्रयोग झाले नाही. आत्ता नथिंग या नव्या कंपनीने हीच गोष्ट परफेक्ट हेरली आणि मार्केटमध्ये आणला नथिंग वन हा फोन..

एकतर या फोनचं बॅकपॅनल पुर्णपणे ट्रान्स्फरन्ट आहे. त्यामुळे फोन लगेच लक्ष वेधून घेतोय. त्यामुळेच मार्केटिंगला जोर न लावताही या फोनची चर्चा सुरू आहे. पण फक्त इतकीच गोष्ट आहे का? तर नाही. फोनचा कॅमेरा, परफॉरर्मन्स देखील बजेटच्या मानाने भारी आहे..

सर्वाधिक चर्चा होतीये ती नथिंग वनच्या बॅक पॅनेलची

बॅक ट्रान्सपरन्ट असलेला पहिला फोन असल्याचा दावा कंपनी तर्फे करण्यात येत आहे. यामुळे फोनमधील पार्ट दिसतात. नथिंग फोन लॉन्च होणार अशी चर्चा जेव्हा बाजारात सुरू झाली तेव्हा सर्वाधिक सर्च केलं गेलं ते फोनच्या बॅक पॅनल मधील लाइटिंग. नथिंग फोनच्या बॅक साईडला ग्लीफ लाइटिंग दिली आहे. त्यात एलइडी लाईट बसविण्यात आले आहेत. 

नोटिफिकेशन, फोन आला, गाणे लावल्यावर युनिक पॅटर्नमध्ये लाईट लागणार आहेत. यामुळे हा फोन सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या फोनपेक्षा वेगळा ठरतो. टेक्निकली बघायला गेलं तर फोनच्या मागच्या बाजूला लाईट बसवणं अवघड समजलं जातं. मात्र कंपनीने हे काम चांगल्या प्रकारे केलं आहे. 

या फोनच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचं झालं तर… 

नथिंग वन फोनचा डिसप्ले ६.५५ इंच आहे. यामुळे फोन वापरणाऱ्याला फुल डिसप्ले व्हुवचा अनुभव मिळणार आहे. फोनचं रेजोल्युशन १,०८० x २,४०० pixel आहे. डिस्प्ले आणि बॅकचा कवर ग्लास गोरिलाचा आहे. यामुळे फोन जरी खाली पडला तरीही तो फुटण्याची शक्यता कमी आहे. Qualcomm Snapdragon 778G+ SoC चं प्रोसेसर असणार आहे.  

फोनमध्ये ड्युअल स्टिरिओ स्पीकर आहेत. त्यामुळे फोनचा आवाज आणि क्वालिटी चांगली आहे. तसंच फोनमध्ये तीन मायक्रोफोन असणार आहेत. 

हा फोनला 4 जी बरोबर 5 जीची कनेक्टीव्हीटी असणार आहे. चार्जींगसाठी सी टाईप पोर्टचा वापर केला आहे. तसंच फेस अनलॉक बरोबर फिंगर प्रिंट सेंसर दिले आहेत. तर बॅटरीची क्षमता ४ हजार ५०० एमएएचची आहे. इंटरनेट, कॅमेरा जरी दिवसभर वापरला तरीही बॅटरी दिवसभर पुरणार आहे.

आत्ता नंबर लागतो तो कॅमेऱ्याचा नथिंग वन फोनमध्ये कॅमेरावर विशेष लक्ष दिले आहे. आयफोन, वन प्लस, सॅमसंग सारख्या तगड्या कंपन्यांना फाईट द्यायची असेल तर त्यांच्या तोडीचा कॅमेरा असायला हवा. नथिंग वन फोनला एकूण तीन कॅमेरे आहेत.

बॅक साईड 50 मेगा pixel चे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील एका कॅमेराला सोनीचं IMX ७६६ सेन्सर आहे. हा सेन्सर f/1.88 अपर्चर लेन्स सोबत जोडण्यात आले आहे. त्यामुळे फोटो काढतांना तुमचा हात हलला तरीही फोटो स्पष्ट येतो. त्याला इमेज स्टेबलायजेशन म्हटलं जात. 

तर दुसरा 50 मेगा pixel कॅमेरा अल्टा- वाइड अँगल लेन्स असणार आहे. या कॅमेराचा सेन्सर सॅमसंग JN 1 आहे. ११४ डिग्री पर्यंतचा व्ह्यू हा कॅमेरा कवर करतो. जवळून जास्तीत जास्त जागा कवर करण्यासाठी वाइड अँगल कॅमेरा महत्वाचा असतो. मॅक्रो मोडसाठी वेगळा कॅमेरा दिला नाही. हाच कॅमेऱ्यातून मॅक्रो फोटो काढता येणार आहे.      

सेल्फी कॅमेऱ्याशिवाय तर फोन पूर्ण होऊ शकत नाही. नथिंग वनमध्ये कॉलिंग आणि सेल्फीसाठी फ्रंट कॅमेरा 16 मेगा पिक्सलचा दिला आहे. त्याला सुद्धा सोनी कंपनीचं सेन्सर दिलं आहे.

सॅमसंग, वन प्लस, एमआय सारख्या कंपन्यांच्या फोनला  कंटाळ्याचं कारण म्हणजे इनबिल्ट असणारे ॲप्स. नथिंग वनमध्ये  गुगलचे ॲप्स सोडले तर इतर कुठलेही ॲप्स देण्यात आले नाहीत. त्यामुळे डिस्प्ले एकदम क्लीन दिसतो. अँड्रॉइड १२ ही ऑपरेटिंग सिस्टीम देण्यात आली असून पुढचे ३ अपडेट मिळणार आहे. 

पण सगळच चांगल आहे का तर नाही, या फोनवर टिका सुद्धा होतेय…

पहिलं म्हणजे फोनला हेडफोन जॅक देण्यात आलं नाही. यासाठी वेगळे ब्लुटूथ हेडफोन घ्यावे लागणार आहे. तसंच फोनचं वजन १९३ ग्रॅम असल्याने काहीसा जड वाटण्याची शक्यता आहे. एफएम रेडीओ सुद्धा फोनमध्ये नसणार आहे. सध्या मोबाईल कंपन्या तुमच्याकडे चार्जर असणार असं गृहीत धरून चालल्या आहेत.

त्यामुळे फोन सोबत फक्त केबल देण्यात येत आहे. चार्जरसाठी वेगळे पैसे मोजावे लागणार आहे.  तुमच्याकडे हा फोन असेल तर याच्या बॅक पॅनलचे लाईट नक्कीच भाव खाऊन जाणारे आहेत, एवढं मात्र खरं. फोनमध्ये जे पाहिजे ते सगळं यात उपलब्ध आहे. 

स्टोरेज १२८ जीबी आणि ८ जीबी रॅम, स्टोरेज २५६ जीबी आणि ८ जीबी रॅम, स्टोरेज २५६ जीबी आणि १२ जीबी रॅम अशा तीन वॅरियन्टमध्ये हा फोन मिळणार आहे. त्याची किंमत ३२ हजार ९९९ ते ३८ हजार ९९९ रुपये असणार आहे.          

टेक गुरु गिकी रंजित याने नथिंग वनचा रिव्ह्यू करतांना सांगितलं की,

या फोनची बिल्ट क्वालिटी खूप चांगली आहे. स्क्रीन, बॅक पॅनल हे प्रीमियम अनुभव देतं.  स्पीकर क्वालिटीबद्दल बोलायचं तर या रेंजमध्ये असणाऱ्या फोनमध्ये चांगले स्पीकर आहेत. कॉल क्वालिटी आणि नेटवर्क खूप चांगल्या प्रकारे देतं.  कॅमेरा अपेक्षेपेक्षा जास्त चांगला आहे. कमी लाईट असताना सुद्धा फोटो चांगले काढता येतात. फ्रंट कॅमेऱ्यातून काढण्यात आलेले फोटो नैसर्गिक वाटतात.

त्यामुळे ३५ ते ४० हजार रुपये बजेट मधील नवीन फोन घेण्याच्या विचारात असाल तर नथिंग वनचा पर्याय एकदम मस्त आहे अस सांगण्यात येतय. हा फोन जगभरात १२ जुलै रोजी लॉन्च झाला असून २१ जुलैपासून तो फ्लिपकार्ट वर उपलब्ध होणार आहे.   

हे ही वाच भिडू 

   

 

Leave A Reply

Your email address will not be published.