कोणत्याही मॉलमध्ये गेलात तर तिथे या ५ ट्रिक्स वापरलेल्या असतात, त्यामुळे खर्च वाढतो

मॉल, सुपरमार्केट मध्ये  खरेदी करण्यासाठी घरातून निघताना तुमची एक लिस्ट तयार असते. त्यात रोज लागणाऱ्या वस्तू असतात. मात्र जेव्हा तुम्ही मॉल मध्ये खरेदी करायला जाता तेव्हा लिस्ट सोडून बाकीच्याच वस्तू खरेदी करता.

गरजेपेक्षा अधिक वस्तू आपल्या शॉपिंग कार्टमध्ये आलेल्या असतात. तेव्हा घरी आल्यावर समजतं की लिस्टमधल्या पेक्षा जास्त वस्तू आपण खरेदी केल्या आहेत. यामुळे आपला खर्च वाढतो. हे फक्त तुमच्याच बाबतीत घडतं असं नाही तर मॉल, सुपरमार्केटमध्ये खरेदी करणाऱ्या सगळ्यांबरोबर घडतं. 

ग्राहकांनी गरजेपेक्षा अधिक वस्तूंची खरेदी करावी यासाठी मॉलवाल्यांकडून ५ ट्रिक्स वापरल्या जातात. यात बिग बाजार, डी मार्ट, इजीडे, सेंट्रलसारख्या सर्वच मॉल आणि सुपरमार्केटचा समावेश असतो. 

१) दररोजच्या वापरातल्या वस्तू सगळ्यात शेवटी ठेवण्यात येतात

आपल्याला भुरळ पाडायला सुरुवात होते ते मॉलमध्ये एन्ट्री केल्यापासून. सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत लागणाऱ्या गरजेच्या वस्तू या मॉलच्या शेवटच्या भागात ठेवण्यात येतात. जसं की टूथपेस्ट, साबण, किचनमध्ये लागणारे पदार्थ हे सगळं शेवटी असतं. त्यापूर्वी वेफर्स, चॉकलेट, जंकफूड, बिस्कीट,  सॉफ्ट ड्रिंक सारख्या वस्तू पुढे ठेवण्यात येतात. ज्या वस्तू आपण खरेदी करायला जात नाही त्या वस्तू समोर ठेवल्या जातात. 

२) BUY 2 GET 1 FREE

दोन मॅगीची पाकिटे घेतली तर त्यावर एक पॅकेट फ्री अशी पाटी सर्वच मॉल्समध्ये पाहायला मिळते. फक्त मॅगीच नाही तर इतर वस्तूंवरही आपल्याला ऑफर देण्यात येते. अशावेळी आपल्याला वस्तूंची गरज नाही पण एक वस्तू फ्री मिळतिये म्हणून आपण ती खरेदी करत असतो. या वस्तू घेतल्यामुळे आपला आर्थिक फायदा होत नाही. उलट एक जास्तीची वस्तू घरातली जागा घेते.

३) एकमेकासोबत लागणाऱ्या वस्तू जाणून बुजून लांब ठेवल्या जातात

याचं उदाहरण सांगायला गेलं तर ब्रेड एका ठिकाणी आणि बटर दुसऱ्या कॉर्नरमध्ये ठेवण्यात येतं. म्हणजे ब्रेड घेतल्यानंतर तुम्हाला मधल्या सगळ्या वस्तू क्रॉस करून पुढे जावं लागतं. यावेळी ग्राहकांच्या नजरेला दुसऱ्या वस्तू पडतात. मग काय बटर बरोबरच आपण दुसऱ्या गोष्टी खरेदी करतो. आपल्या लिस्टमध्ये यांचा समावेश नसतो. ही ट्रिक वापरून ग्राहकांच्या माथी इतर वस्तू मारल्या जातात.

४) शॉपिंग कार्टची मोठी साईज

आपण जर कमी वस्तू घेतल्या तर शॉपिंग कार्ट रिकामं राहिल्या सारखं वाटतं. कमी सामान काउंटरवर घेऊन गेल्यावर आजूबाजूच्या लोकांच्या शॉपिंग कार्टमधलं सामान पाहून आपण खूप कमी खरेदी केल्याचा गिल्ट मनात येतो. त्यामुळे आपण जास्तीचं सामान सुद्धा खरेदी करतो. दिवसेंदिवस या शॉपिंग कार्टची साईज वाढत चालली आहे.  

५) काउंटर जवळ हाय मार्जिन मिळवून देणाऱ्या वस्तू असतात 

लागणाऱ्या वस्तू शॉपिंग कार्टमध्ये घेऊन तुम्ही जेव्हा काउंटर जवळ जाता तेव्हा मोठी लाईन असते. विकेंडच्या दिवशी तर विचारूच नका. त्यावेळी लाईनच्या शेजारी चॉकलेट, लहान मुलांची खेळणी, परफ्युमसारखं सामान आजूबाजूला ठेवलेलं असतं. आपण विचार करतो की, चला ही वस्तू घेऊन टाकूया. अशा प्रकारे मॉल वाल्यांचा जास्त फायदा करून देणारी वस्तू आपण नकळत घेतो. 

याच बरोबर अजूनही लहानसहान ट्रिक वापरून मॉलवाले पैसे कमवतात 

मोठे मॉल, सुपरमार्केट यांमध्ये घड्याळं नसतात. त्यामुळे तुम्ही इथं किती वेळ फिरत आहात हे लक्षात येत नाही. एन्ट्री आणि एक्झिट ही वेगवेगळी ठेवण्यामागे पण लॉजिक असतं. आत येताना आणि जाताना अधिक वस्तू दिसायला हव्यात यासाठी ही आयडिया लावली जाते. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.