बुक झालेली कॅब रद्द झाल्यावर आधी आपल्याला पश्चाताप व्हायचा, आता कंपन्यांवर कारवाई होणार आहे

सकाळी सकाळी जोरदार पाऊस, आणि त्यात ऑफिसला जाण्यासाठी झालेला उशीर अशा परिस्थितीत बाइक घेऊन ऑफिसला जाणं म्हणजे मोठं दिव्य. मग आपण पटकन मोबाईल उघडून उबर किंवा ओला बुक करतो.

कॅब बुक केल्यानंतर कुठे जाणार असं विचारण्यासाठी म्हणून चालक तुम्हाला फोन करतो आणि आपलं ठिकाण कळताच काही वेळानं ‘Your Ride is Cancelled by Driver’ असा मेसेज तुमच्या मोबाईलवर येऊन धडकतो. सहसा जवळच्या अंतराच्या राईडची माहिती मिळताच चालक राईड नाकारत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे.

तर काहीवेळा “कॅश देणार असाल तर बसा नाहीतर राईड कॅन्सल करा” असं ड्रायव्हर कडून सांगण्यात येतं. धो धो पाऊस, प्रचंड ट्रॅफिक आणि त्यात ऑफिसला जायला झालेला उशीर या गोष्टींमुळे आधीच चीड चीड होत असते आणि त्यात कॅब चालकांचं हे नाटक. असा अनुभव थोड्याफार फरकाने सगळ्यांनीच घेतला असेल.

सध्या ग्राहकांना कॅब चालकांकडून होणर्‍या वेगवेगळ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय.. 

साधारणपणे पारंपरिक रिक्षा चालकांकडून होणारी जास्त भाड्याची मागणी, मीटर प्रमाणे न घेऊन जाता अव्वाच्यासव्वा भाडे आकारणी, लांबचं भाडं नाकारणे अशा रिक्षा चालकांच्या मनमानीला वैतागलेले प्रवासी चांगली सेवा मिळण्याच्या अपेक्षेने या ओला, उबर कडे वळाले खरे पण त्यांची अजूनही या त्रासातून सुटका झालेली नाहीये.

बर्‍याचदा ग्राहकांकडे कॅश पैसे नसतील तर राईड कॅन्सल करायला सांगणं, उन्हाळ्यात प्रवास करताना ग्राहकांनी सांगून सुद्धा एसी चालू न करणं, ड्रायव्हिंग करताना सातत्याने फोनवर बोलणं, बुकिंग नंतर यायला उशीर करणं किंवा अचानक राईड कॅन्सल करणं, प्रवाशांना इच्छित स्थळी न सोडता आपल्या सोयीने मुख्य रस्त्यावर उतरायला भाग पाडणं, रात्री बेरात्री बुक झालेली राईड अचानक कॅन्सल करणं तसेच पॅसेंजरकडून राईड कॅन्सल करायला भाग पाडणं अशा वेगवेगळ्या तक्रारी प्रवाशांकडून दररोज येत असतात.

यावरच आता केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण लवकरच कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने हा आदेश जारी करताना नक्की काय सांगितलंय बघूया ..

  • ओला उबर कॅब चालकांना इथून पुढे अशी मनमानी करता येणार नाही, कारण विनाकारण कॅब रद्द केल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. 
  • कॅब चालकांच्या मनमानीविरोधात आता सरकारने कठोर पावलं उचलायला सुरुवात केलीये.
  • नुकताच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने कॅब कंपन्यांविरुद्धच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हा आदेश जारी केलाय. 
  • ग्राहकांना असा अनुभव आला तर त्यांनी ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे तक्रार करण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय.  

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने या कंपन्यांच्या मनमानी कारभाराला वेळीच आवर घालण्यासाठी आणि नागरिकांच्या तक्रारींची योग्य दाखल घेण्यासाठी केंद्रीय ग्राहक सरक्षण प्राधिकरणाने कंपन्यांना १० मे २०२२ रोजी या विषयी बैठक घेतली होती. या बैठकीत असं जाहीर करण्यात आलंय की..

जर कोणत्याही कॅब चालकाने ग्राहकाने बुक केलेली राइड वैध कारणाशिवाय रद्द केली तर अशा परिस्थितीत त्याच्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल.

यासोबतच आता सीसीपीएने ग्राहकांना रोख भाडे म्हणजेच कॅश मोडवर पैसे देण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे, कॅबचे भाडे आता फक्त ऑनलाईन पद्धतीनेच द्यावे लागेल असं या बैठकीत नमूद करण्यात आलंय..

दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये सरकारकडे ग्राहकांकडून ओला, उबेर सारख्या कंपन्यांविरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या. राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनकडून मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२१  ते १ मे २०२२ या एका वर्षाच्या काळात ग्राहकांनी ओला सेवेविरुद्ध २,४८२ तक्रारी तर उबर सेवांच्या  विरोधात ७७० तक्रारी नोंदवल्या गेल्या होत्या.

मार्च महिन्यात पश्चिम बंगाल सरकारने अशा मनमानी करणार्‍या कॅब चालकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते.. 

  • यानुसार जर कोणताही ड्रायव्हर बुकिंग झाल्यानंतर राइड कॅन्सल करीत असेल तसेच ग्राहकांना जास्त पैसे मागत असेल तर त्याला दंड आकारला जाईल.
  • तसेच एकच चालक वारंवार राईड कँसल करत असेल तर राज्य सरकार अशा मनमानी कॅब चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द सुद्धा करेल, असा नियम पश्चिम बंगाल राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी बनवला होता.

ग्राहकांकडून राईड कॅन्सल केली गेली तर ग्राहकांना दंड बसतो.. 

कॅब बुक केल्यानंतर पाच मिनिटांनंतर तुम्ही राईड रद्द केली तर तुम्हाला विशिष्ट रकमेचा दंड बसतो. हा दंड प्रवासाच्या रकमेच्या १० ते २०% पर्यन्त असतो. हा दंड कंपनी आपल्या पुढच्या राईड मधून वसूल करते.

कधी कधी प्रवासात गाडीचा मधेच काही घोटाळा झाला तर चालक आपल्याला दुसरी राईड बुक करायला सांगतात आणि कंपनीकडे तक्रार केली तर कंपनी आपल्याला रीतसर तक्रार नोंदवायला लावते आणि त्या नंतर पूर्ण पैसे रिफंड न देता रिफंडच्या जागी कूपन देऊन आपली बोळवण करतात.

चालकांकडून राईड कॅन्सल केल्या नंतर असाच विशिष्ट दंड चालकांना देखील असतो याच कारणामुळे बहुतेकदा चालक ग्राहकांनाच राईड कॅन्सल करायला भाग पाडतात.

चालकांकडून ग्राहकांशी सतत वाद घातले जातात.. 

कधी कॅश देण्यावरून तर कधी पोहचवायला उशीर लावल्यावरून, ओटीपी सांगायला उशीर केल्यावरून अथवा चुकीचा ओटीपी सांगितला गेल्यामुळे बर्‍याचदा चालक ग्राहकांशी वाद घालताना दिसतात.

चुकीचा ओटीपी सांगितला म्हणून काही दिवसांपूर्वी चेन्नई मध्ये ओला चालक आणि  सॉफ्टवेअर इंजिनियर यांच्यात झालेल्या हाणामारीत इंजिनियरचा मृत्यू झाला होता.

तर अशा गोष्टींमुळे सरकारने ग्राहकांच्या हितासाठी उचललेलं हे पाऊल नक्कीच काही अंशी लोकांच्या फायद्याचं ठरेल असं म्हणायला हरकत नाही..!

हे ही वाच भिडू.. 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.