आयआयएमच्या प्राध्यापकांनी पंतप्रधानांना पत्र लिहून मौन सोडण्याची मागणी केलीये…

कित्येक शाळांमध्ये ‘अब्राहम लिंकनने मुख्याध्यापकांना लिहिलेले पत्र’ अशी मोठी फ्रेम मुख्याध्यापकांच्या ऑफिसबाहेर लावलेली असते. तसं कधी आपल्या घरच्यांनी शाळामास्तरांना पत्र लिहिलं नाही आणि जेव्हा शाळामास्तरांनी आपल्या घरच्यांना पत्र लिहिलं तेव्हा घरचं वातावरणच बदलून गेलं. सध्या देशात अशाच एका पत्राची चर्चा सुरु आहे आणि ज्याचा विषय अत्यंत गंभीर आहे.

हे पत्र लिहिलंय भारताच्या प्रतिष्ठीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या (आयआयएम) प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी तेही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना.

पंतप्रधानांच्या कार्यालयाला पाठवण्यात आलेल्या या पत्रावर १८३ जणांच्या सह्या आहेत. ज्यात आयआयएम बंगळुरूच्या १३, तर आयआयएम अहमदाबादच्या तीन प्राध्यापकांचा समावेश आहे.

हे पत्र लिहिण्यामागचं कारण काय?

प्राध्यापकांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, ‘मौन बाळगणं हा पर्याय आता उपलब्धच नाहीये. जर द्वेषाचा आवाज मोठा असेल, तर तर्कांचा आवाज त्याहून मोठा असावा हे अधोरेखित करणं हे पत्र लिहिण्यामागचं मुख्य उद्दिष्ट आहे.’ बंगळुरूचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मियांचं धर्म परिवर्तन करण्याबाबत केलेलं भाषण, देशाच्या विविध भागात चर्चवर झालेले हल्ले आणि हरिद्वार धर्मसंसदेत झालेली भाषणं या गोष्टींचा या पत्रात संदर्भ देण्यात आला आहे.

या पत्रात काय लिहिलं आहे?

‘आदरणीय पंतप्रधान, देशाच्या बहुसांस्कृतिक एकतेचा आदर करणाऱ्या आपल्या सर्वांसाठी देशात वाढलेल्या असहिष्णूतेबाबत तुम्ही बाळगलेलं मौन निराशाजनक आहे. तुमच्या मौनामुळं द्वेषाच्या आवाजांना बळ मिळतं आणि आपल्या देशाची एकता आणि अखंडता धोक्यात येते. ज्या शक्ती देशात फूट पाडू इच्छितात त्यांना तुमचं मौन उद्युक्त करतं.’

‘देशाचं संविधान आपल्याला कोणत्याही भीती किंवा लाजेशिवाय आपल्या धर्माचं श्रद्धेनं आचरण करण्याचा हक्क देतं. पण सध्या मात्र देशात भीतीचं वातावरण आहे. चर्चसकट देशातली प्रार्थनास्थळं उध्वस्त केली जात आहेत, आपल्या मुस्लिम बंधू भगिनींविरोधात शस्त्र उगारण्याबाबत सांगण्यात येतंय. या सगळ्या गोष्टी कोणत्याही भीतीशिवाय होत आहेत.’

‘तुमचं नेतृत्व देशातल्या नागरिकांचं मन द्वेष भडकावण्याऱ्या लोकांपासून दूर ठेवण्यात मदत करेल असा आमचा विश्वास आहे. समाज एकतर नवनवी संशोधनं, क्रिएटिव्हीटी, आयडीयाज आणि प्रगती करण्यावर लक्ष केंद्रित करु शकतो किंवा समाज स्वतःमध्ये फूट पाडू शकतो. आम्हाला असा भारत देश घडवायचा आहे जो सगळ्या जगासाठी सर्वसमावेशकता आणि विविधतेचा आदर्श असेल. तुम्ही योग्य निवड करण्यात देशाचं नेतृत्व कराल अशी आम्ही आशा करतो.’

आयआयएम अहमदाबाद आणि आयआयएम बंगळुरूमध्ये महत्त्वाचे विषय शिकवणाऱ्या प्राध्यापकांनी या पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. पत्राचा मसुदा तयार करण्याचं काम आयआयएम बंगळुरुच्या पाच प्राध्यापकांनी केलं आहे. यात प्रतीक राज (असिस्टंट प्रोफेसर ऑफ स्ट्रॅटेजी), दीपक मालघन (असोसिएट प्रोफेसर, पब्लिक पॉलिसी व प्रसिद्ध पर्यावरणीय अर्थशास्त्रज्ञ), हेमा स्वामिनाथन (असोसिएट प्रोफेसर, पब्लिक पॉलिसी), दलहिया मानी (असोसिएट प्रोफेसर, आंत्रप्रेन्युअरशिप) आणि राजलक्ष्मी मूर्थी (असोसिएट प्रोफेसर, डिसिजन सायन्सेस) यांचा समावेश होता.

आता या पत्रावर पंतप्रधानांकडून काही प्रतिक्रिया येणार की नाही, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.