ISRO चा शास्त्रज्ञ ते UPSC… असा प्रवास तोही व्हीलचेअरवरून..

“तुमचं ध्येय निश्चित असेल तर यश मिळतंच मिळतं”, हे असे सुविचार वाचायला अन ऐकायला बरे वाटतात पण प्रत्यक्ष आयुष्यात असं यश मिळवण्यात काय लेव्हलचं कष्ट लागते ते ती मेहनत करणाऱ्यांनाच माहित..तशी याची खूप उदाहरणे दिसून येतात.

त्याचंच एक उदाहरण म्हणजे कार्तिक कंसल नावाचा मुलगा. काही लोकांना यश सहजासहजी मिळत नाही तसंच काहीसं कार्तिकच्याही आयुष्यात घडलं.

तो ८ वर्षांचा असतांना त्याला ‘मस्क्युलर डिस्ट्रॉफी’ हा आजार झाला. या आजारात शरीराचे अवयव हळूहळू काम करायचे बंद करतात. त्यामुळे व्हीलचेअरशिवाय ऑप्शनच नसतो. हाच व्हीलचेअरचा ऑप्शन वयाच्या ८ व्या वर्षापासून कार्तिकच्या आयुष्यात आला. मात्र त्या व्हीलचेअर ला आपली कमजोर बाजू न बनवता त्यालाच आपली ताकद बनवत प्रवास सुरु झाला.

आणि थेट IIT गाठलं. त्यानंतर मग ISRO..इथवरच तो थांबला नाही तर त्याने थेट UPSC गाठली आणि UPSC टॉपर बनला. 

कार्तिकने २०२१ च्या UPSC परीक्षेमध्ये २७१ रँक मिळवली आहे.

अलीकडेच UPSC चा निकाल लागला अन अनेक स्ट्रगल स्टोऱ्या अन सक्सेस स्टोऱ्या आल्या असतील. पण कार्तिकची स्टोरी जरा वेगळी आहे.

तर कार्तिक कंसल हा मूळचा उत्तराखंडमधील रुरकीचा रहिवासी आहे. इथेच त्याने शालेय शिक्षण पूर्ण केले. कार्तिक सुरुवातीपासूनच अभ्यासात अतिशय गुणवान विद्यार्थी होता. आयआयटी रुरकीमधून शिक्षण घेऊन २५ वर्षीय कार्तिक कंसलने एकदा नव्हे तर ३ वेळेस UPSC परीक्षा दिली.

२०१९ मध्ये, त्याने ऑल-इंडिया ८१३ रँक मिळवली. यामुळे त्याला या क्षेत्रात चांगली पोस्ट मिळाली, परंतु त्याला प्रशासकीय भूमिकेची इच्छा होती.

त्याने अभियांत्रिकीमधील पदवीधर अभियोग्यता चाचणी (GATE) आणि केंद्रीय सार्वजनिक आयोग अभियांत्रिकी सेवा (IES) सारख्या अनेक स्पर्धात्मक परीक्षा पास केल्या.

परंतु IES च्या नियुक्तीदरम्यान त्याचे अपंगत्व अडथळा ठरले होते, तो सांगतो कि, “मी अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या पूर्वपरीक्षेत चांगली कामगिरी केली होती, परंतु जेव्हा मेन्सची लिस्ट लागली तेव्हा मला कळले की माझ्या अपंगत्वाच्या स्थितीमुळे मी कोणत्याही पदासाठी पात्र नाही. माझ्यासाठी ती फेज फार वाईट होती. मानसिकदृष्ट्या जरी मी तयार होतो, परंतु मी माझ्या शारीरिक स्थितीबद्दल काय करू शकतो? माझे संपूर्ण जग उध्वस्त झाले होते,” अशी भावना कार्तिकने माध्यमांना बोलतांना व्यक्त केली.

आता कार्तिकला आलेल्या अनुभवातून हेच धोरण बदलण्याच्या उद्देशाने कार्तिकने UPSC ची तयारी सुरू केली आणि अधिकारी बनून अपंग व्यक्तींसाठीचा संघर्ष सुलभ व्हावा यासाठी ते प्रयत्न करणार आहेत तसेच त्याबाबतच्या धोरणात बदल घडवणार आहेत.

IES द्वारे जरी तो सिलेक्ट झाला नसला तरी कार्तिकने इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून स्थान मिळवले. आयआयटी रुरकीमधून शिक्षण घेऊन २५ वर्षीय कार्तिक कंसल अपंग असूनही इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोमध्ये श्रीहरिकोटा येथे शास्त्रज्ञ म्हणून लागला.

त्यांचे कुटुंबीय सांगतात की, इस्रोच्या माध्यमातून देशाला नवीन उंचीवर नेण्याचे कार्तिकचे स्वप्न आहे.

२०१८ मध्ये ते इस्रो मध्ये लागला होता, इस्रोमध्ये काम करायला सुरुवात केली आणि सोबतच UPSC चं स्वप्न ते बाळगून होता. त्याने यूपीएससीची तयारीही सुरू ठेवली. मात्र अभ्यास आणि नोकरी दोन्ही एकत्र सांभाळणे मोठं दिव्य होतं. रोजची ९ तासांची ड्युटी संपवून रात्रभर अभ्यास करत. आणि सुट्टीच्या दिवशी अभ्यासासाठी तो जास्तीत जास्त वेळ देत असत.

२०२० मध्ये त्याला ८१३ वा रँक मिळाला होता. तेंव्हा त्याला टपाल खाते मिळाले होते, पण त्यावेळी तो रुजू झाला नव्हता. त्याच्या वडिलांनी सांगितले की, कार्तिकने आणखी मोठी पोस्ट मिळवावी.

ते पुन्हा मेहनतीने तयारीला लागले आणि २०२१ च्या परीक्षेत त्यांनी २७१ वी रँक मिळवली. 

त्याला असलेला आजार म्हणजे मस्कुलर डिस्ट्रॉफीसाठी त्याला ग्रासलं असलं तरीही योग आणि थेरपीने स्वतःला बरे करण्याचा प्रयत्न केला आणि यशाचं शिखर गाठलं. तो त्याच्या विजयाचे श्रेय त्याच्या कुटुंबाला देतो, ज्यांनी इतक्या वर्षांत अथक पाठिंबा दिला.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.