इलाईराजा ‘कला क्षेत्रातून’ राज्यसभेवर नियुक्त होणारे ‘पहिले दलित खासदार’ ठरलेत..

भारतात संसदीय शासनप्रणाली आहे. संसदेत दोन सभागृहे आहेत, पहिली लोकसभा आणि दुसरी राज्यसभा. यातल्या राज्यसभेला संसदेचं वरिष्ठ सभागृह म्हणतात. भारतीय राज्यघटनेच्या कलम ८० नुसार राज्यसभेत सर्वाधिक २५० सदस्य निश्चित करण्यात आले आहेत. यापैकी १२ सदस्य हे राष्ट्रपतींनी स्वत: नामनिर्देशित केलेले असतात. 

हे आता सांगण्याचं कारण म्हणजे नुकतंच राज्यसभेसाठी चार नवीन सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रपती नियुक्त या सदस्यांच्या यादीत ज्येष्ठ खेळाडू पी. टी. उषा, संगीतकार इलाईराजा, सामाजिक कार्यकर्ते वीरेंद्र हेगडे आणि पटकथा लेखक आणि दिग्दर्शक व्ही. विजयेंद्र प्रसाद यांची वर्णी लागली आहे. यातील एका नावाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे, ते म्हणजे… 

संगीतकार इलाईराजा

इलाईराजा हे मूळचे तामिळनाडूचे. संगीत जगतातील ते एक प्रसिद्ध चेहरा असून गेल्या ५ दशकांपासून संगीत क्षेत्रात योगदान देत आहेत. या कारकीर्दीत त्यांनी १००० हून अधिक चित्रपटांसाठी ७००० हून जास्त गाणी तयार केली आहेत. तर प्रत्यक्ष सादरीकरणाबाबत सांगायचं झाल्यास जगभरात २०,००० हून जास्त मैफिली गाजवल्या आहेत.

त्यांचं हे योगदान बघता २०१० मध्ये त्यांना भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण आणि २०१८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. याव्यतिरिक्त त्यांना पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

अशा इलाईराजा यांना राज्यसभेवर उमेदवारी मिळाल्याची बातमी कळताच सगळ्या माध्यमातून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे. मात्र इतर नावांच्या तुलनेत इलाईराजा यांचं नाव सगळ्यात जास्त चर्चिल्या जाणं आणि त्याला इतकं महत्वाचं मानण्याचं कारण आहे, इलाईराजा यांच्या नियुक्तीने राज्यसभेचा आजवरचा इतिहास बदलला जाणं. 

कोणता इतिहास? तर राज्यसभेवर दलित कलाकाराची निवड होणं. 

राष्ट्रपती जेव्हा १२ सदस्यांची नेमणूक करत असतात त्यासाठी अट असते की, ते उमेदवार कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रातील असावे. भारताचं नाव लौकिक करणाऱ्या या क्षेत्रातील चेहऱ्यांनाही देशाच्या राजकारणात सहभाग मिळावा आणि त्यांनी त्या-त्या क्षेत्राचं नेतृत्व करावं असा यामागचा उद्देश असतो.

यातीलच कला या निकषाअंतर्गत इलाईराजा यांना निवडण्यात आलं आहे आणि या क्षेत्रात निवड होणारे ते पहिले ‘दलित’ आर्टिस्ट आहेत.

या एका ‘दलित आर्टिस्ट’ शब्दाने राज्यसभेचा आजवरचा इतिहास मोडला आहे आणि सोबतच नवीन इतिहास देखील लिहायला सुरुवात केलीये… 

द फेडरल या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, लोकसभेत २५.४% एससी/एसटी खासदार आहेत पण राज्यसभेत हे प्रमाण केवळ ९ टक्के इतकं आहे.

राज्यसभेच्या आकडेवारीनुसार, १९५२ मध्ये राज्यसभेची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत जवळपास १३९ सदस्य राष्ट्रपतींद्वारे नामनिर्देशित करण्यात आले आहेत. प्रॅक्सिस इन्स्टिट्यूट फॉर पार्टिसिपेटरी प्रॅक्टिसेसचे रिसर्च अँड कॅपॅसिटी बिल्डिंगचे संचालक प्रदीप नारायणन यांचा सप्टेंबर २०२० मध्ये एक लेख प्रकाशित झाला होता. ज्यात लिहिलं होतं की…

या सर्व राष्ट्रपती नियुक्त सदस्यांपैकी केवळ ४ सदस्य हे शेड्युल कास्ट आणि फक्त १ सदस्य शेड्युल ट्राइब समाजातील होते. 

तर ‘कला’ या विभागात आतापर्यंत जवळपास २० जणांना राज्यसभेचे खासदार होण्याची संधी मिळाली आहे. यात रुक्मिणी देवी अरुंदळे, पृथ्वीराज कपूर, हबीब तन्वीर, नर्गिस दत्त, व्ही.सी.गणेशन, एम. एफ. हुसेन, रविशंकर, वैजयंतीमाला बाली, शबाना आझमी, लता मंगेशकर, दारा सिंग, हेमा मालिनी, श्याम बेनेगल, जावेद अख्तर, बी. जयश्री, रेखा, रघुनाथ महापात्रा, रूपा गांगुली, सुरेश गोपी, सोनल मानसिंग यांचा समावेश आहे. 

ज्यामध्ये अकरा जण ब्राह्मण आहेत आणि बाकी इतर जातींचे आहेत पण कोणीही एससी किंवा एसटीचे नाहीत, असं या निवडीतून स्पष्ट होतं.

आता या जवळपास २० नावांमध्ये अजून एक नाव सामील होतंय ते म्हणजे इलाईराजा आणि त्यांची विशेषता म्हणजे ते दलित प्रवर्गातून येतात. म्हणून एक दलित आर्टिस्ट असणं यासंदर्भात त्यांच्याकडून विशेष अपेक्षाही असल्याचं बोललं जातंय.

देशभरातील कलाकारांना प्रोत्साहन देता यावं, त्यांच्यासाठी तरतुदी करता याव्या आणि त्या नेमक्या कोणत्या असाव्या हे जाणून घेण्यासाठी कला क्षेत्रातील दिग्गज आणि नामांकित कलाकारांना राजकारणात प्रवेश दिला जातो. त्यानुसार यंदा दलित समाजातील इलाईराजा यांच्या निवडणुकीने एक गोष्ट स्पष्टपणे सध्या होते, ती म्हणजे… 

देशभरातील दलित कलाकारांना याने प्रोत्साहन मिळणार आहे. 

तसं बघितलं तर कलेला कोणत्याही जाती-धर्माचं बंधन नसतं मात्र भारताच्या समाज व्यवस्थेचा जात-धर्म-प्रवर्ग हा महत्वाचा भाग असल्याने कलाकाराला त्यांचं बंधन आपोपाप लागताना दिसलं आहे. 

भारतात सगळ्या प्रवर्गातील कलाकार आहेत. मात्र यातील केवळ दलित कलाकारांना संघर्ष करावा लागत असतो, हे आजवर दिसून आलं आहे. इलाईराजा स्वतः त्याचं उदाहरण आहे. जेव्हा त्यांनी त्यांच्या करियरची सुरुवात केली होती तेव्हा केवळ दलित असल्याने त्यांना वेळोवेळी कमी लेखल्या गेलं होतं. अशातून तग धरत ते वरती आलेले आहेत. 

मात्र अनेक जण असं करण्यात असमर्थ ठरतात आणि कला मारली जाते. अशा सर्व कलाकरांसाठी आता इलाईराजा यांच्या मार्फत कार्य केलं जाऊ शकतं. 

त्यात भर म्हणजे इलाईराजा लोककलावंत आहेत. राज्यसभेच्या उमेदवारीत पारंपरिक कलाकारांकडे, लोककलावंतांकडे दुर्लक्ष होतं अशी टीका करण्यात येत असते. ती यामुळे काही अंशी दूर होण्याकडे पाऊल मानलं जाऊ शकतं.

शिवाय अनेक वर्षांपासून राज्यसभेत SC आणि ST समाजासाठी आरक्षण देण्यात यावं, त्यांना प्रोत्साहन देण्यात यावं ही मागणी केली जात आहे. कोणत्याही सरकारने आजवर त्याकडे लक्ष दिलं नाही. मात्र आता इलाईराजा यांना वरच्या सभागृहात उमेदवारी देऊन ‘सरकार दलितांना प्रतिनिधित्व देतंय, त्यांचं सबलीकरण करण्याकडे लक्ष देतंय’ अशी धारणा तयार करण्यास सुरुवात केली असल्याचंही बोललं जातंय. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.