७ महिन्यांत ८ कॅप्टन, द्रविड गुरुजींच्या काळात कॅप्टन्सीचा विषय तेवढा गंडलाय…

२००० च्या काळातली ऑस्ट्रेलियन टीम आठवते का ? हेडन, गिलख्रिस्ट, वॉर्न, सायमंड्स, ब्रेट ली असली डेंजर कार्यकर्ते असलेली ही टीम. पण या टीमची खरी ताकद होती, त्यांच्या म्होरक्यात, रिकी पॉन्टिंगमध्ये. कुठल्याही टीमसाठी कॅप्टन किती महत्त्वाचा असतो, हे आधी कपिल देवनं १९८३ मध्ये दाखवलं होतं आणि २००० च्या दशकात रिकी पॉन्टिंगनं.

भारतासाठी ही परंपरा पुढं चालवली, सौरव गांगुली आणि महेंद्रसिंह धोनीनं. मॅच फिक्सिंगच्या राड्यातून टीमला बाहेर काढत दादानं नव्या पोरांसकट टीम इंडिया उभी केली. पुढं धोनीकडे टीम तर आली, पण हळूहळू मोठे प्लेअर्स रिटायर होत गेले. साहजिकच धोनीनं अनेक यंगस्टर्सला चान्स देऊन पुन्हा एकदा टीम बांधली.

मग नंबर आला विराट कोहलीचा, एका बाजूला धोनी डोक्यावर बर्फ ठेऊन काम करायचा, तर दुसऱ्या बाजूला विराट म्हणजे आग होता. त्याच्या नेतृत्वात भारतानं ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात धूळ चारुन दाखवली. आयसीसी ट्रॉफी मिळाली नसली, तरी कोहलीनं फिटनेसपासून ॲग्रेशनपर्यंत टीम इंडियाचं रूप बदललं होतं.

त्यानंतर अचानक कोहलीनं टी२० आणि टेस्ट टीमचं नेतृत्व सोडलं, त्याच्याजागी रोहित शर्माची भारताचा कॅप्टन म्हणून निवड झाली. थोडक्यात काय, तर रोहितनं सलग कॅप्टन्सी करणं अपेक्षित होतं. मात्र २०२२ च्या या ७ महिन्यांत भारताला ८ कॅप्टन मिळालेत.

२०२२ च्या सुरुवातीला भारतानं साऊथ आफ्रिकेविरुद्ध टेस्ट मॅचेस खेळल्या, त्यावेळी विराट कोहली भारताचा कॅप्टन होता. ही सिरीज संपल्या संपल्या कोहलीनं टेस्ट क्रिकेटच्या कॅप्टन्सीचा राजीनामा दिला.

त्यानंतर भारताचीच आफ्रिकेविरुद्ध वनडे सिरीज झाली, रोहित शर्मा दुखापतीमुळं बाहेर असल्यानं केएल राहुलनं भारताचं नेतृत्व केलं. ही सिरीज भारतानं ३-० अशी गमावली.

नंतर वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर आला, वेस्ट इंडिजला भारतानं एकही मॅच जिंकू दिली नाही आणि श्रीलंकेविरुद्धही सारखीच परिस्तिथी होती. या दोन्ही सिरीजसाठी भारताचा कॅप्टन रोहित शर्मा होता.

भारताला २०२२ मधला चौथा कॅप्टन मिळाला साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या टी२० सिरीजमध्ये, तो म्हणजे रिषभ पंत. या सिरीजमध्ये पंतची बॅट फेल गेली, मात्र सिरीज बरोबरीत सोडवण्यात त्याला यश आलं.

पाचवा कॅप्टन होता हार्दिक पंड्या. आयर्लंडला गेलेल्या भारतीय टीममध्ये अनेक सिनियर्सना विश्रांती देण्यात आली आणि कॅप्टन बनला पंड्या. आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचं विजेतेपदापर्यंत नेतृत्व करत पंड्यानं आपण कॅप्टन्सी करू शकतो हे दाखवून दिलं होतं. त्याच जोरावर त्यानं भारताचं नेतृत्वही मिळवलं. आयर्लंड विरुद्धच्या सिरीजमध्ये त्यानं भारताला २-० असा विजय मिळवून दिला.

सहावा कॅप्टन झाला जसप्रीत बुमराह. २०२१ च्या इंग्लंड टूरमधली बाकी असलेली एक टेस्ट मॅच २०२२ मध्ये झाली. नियोजनानुसार रोहित शर्मा भारताचं नेतृत्व करणार होता, मात्र मॅचच्या काही दिवस आधीच त्याला कोविड झाला आणि कार्यक्रम गंडला. अशावेळी बुमराहवर जबाबदारी देण्यात आली आणि कपिल देवनंतर अनेक वर्षांनी भारताला फास्ट बॉलर कॅप्टन म्हणून मिळाला. पण भारतानं ही टेस्ट गमावली.

सातवा कॅप्टन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नसला, तरी वॉर्मअप मॅचेसमध्ये होता. तो म्हणजे दिनेश कार्तिक. आयपीएल २०२२ नंतर डीकेनं झपाट्यानं प्रगती करत भारतीय संघात स्थान मिळवलं. त्याच्यावरही थेट कॅप्टन्सीची जबाबदारी देण्यात आली.

भारताच्या वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या वनडे मॅचेससाठी रोहितला विश्रांती देण्यात आली आणि आता शिखर धवन भारताचं नेतृत्व करेल.

ही एवढी टाइमलाईन उलगडून सांगितली याचं कारण म्हणजे, या सततच्या कॅप्टन बदलामुळं होणारे परिणाम महत्त्वाचे आहेत…

जवळपास तीन महिन्यांवर टी-२० वर्ल्डकप आलाय. त्यात भारताकडं अजूनतरी पक्की टीम नाही. रोहित शर्मा वर्ल्डकपमध्ये भारताचं नेतृत्व करेल हे नक्की असलं, तरी टीममध्ये नक्की असणार कोण हे ठरलेलं नाही.

कॅप्टन आणि टीम नक्की असणं किती महत्त्वाचं असतं, याचं उदाहरण म्हणजे इंग्लंडची टीम. २०१५ च्या वर्ल्डकपमध्ये ग्रुप स्टेजमधून बाहेर पडलेल्या इंग्लंडनं २०१९ चा वर्ल्डकप जिंकून दाखवला होता.

इंग्लंडचा वर्ल्डकप हिरो बेन स्टोक्स आपल्या पुस्तकात याबद्दल लिहितो, “त्या चार वर्षांत आम्ही टीम बांधली होती. कोणता प्लेअर कोणत्या जागी खेळणार इथपासून कोणता प्लेअर कुठे फिल्डिंगला उभा राहणार हे सुद्धा आम्ही ठरवलं होतं. त्याच स्ट्रॅटेजीनुसार सुपर ओव्हरचा शेवटचा बॉल जेसन रॉयच्या हातात आला आणि आम्ही तो रनआऊट करु शकलो.”

ज्याप्रकारे इंग्लंडनं छोट्या छोट्या गोष्टींचं प्लॅनिंग केलं होतं, अगदी तसंच करणं भारताला शक्य होतं. जगातला सर्वात श्रीमंत बोर्ड असलेल्या बीसीसीआयकडे ना सोयींची कमी आहे ना प्लेअर्सची. बरं ताकद तर इतकी आहे की, स्वतःला हवं तसं वेळापत्रकही लावता येतंय. मात्र अजूनही बीसीसीआय कॅप्टन आणि प्लेअर्सच्या संगीतखुर्चीमध्येच अडकून राहिलीये.

या सगळ्याचं खापर राहुल द्रविडवरच का फुटतंय ?

द्रविडनं सगळी सूत्रं हाती घेतल्यावर भारताची एकसंध टीम फारशी दिसली नाही. व्यस्त वेळापत्रकामुळं भारताच्या दोन टीम्स खेळवण्यात आल्या. मात्र असं नसलं तरी अनेकदा मुख्य प्लेअर्सना विश्रांती देण्यात आली.

इंग्लंडमध्ये राहिलेल्या टेस्टसाठी विराट कोहलीला नेतृत्व देण्याचा पर्याय समोर असताना, बुमराहवर जास्तीचा लोड देण्यात आला. टी२० आणि वनडे वर्ल्डकप तोंडावर असताना भारताची टीम एकसंध नसल्यामुळं, प्रत्येकाला आपली जबाबदारी फिक्स न कळल्यामुळं द्रविड गुरुजींवर खापर फुटतंय.

या आधी असं काय झालं होतं का..?

तर १९५८-५९ मध्ये भारतीय क्रिकेटला अंतर्गत राजकारणाचा फटका बसला होता. वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या ५ मॅचेसच्या टेस्ट सिरीजमध्ये भारतानं पाच वेगवेगळे कॅप्टन्स खेळवले. एक वेळ तर अशी होती की, पहिल्या तीन मॅचेस बीसीसीआय विरुद्ध झालेल्या वादामुळं बाहेर असलेल्या विनू मंकड यांच्याकडे नेतृत्व देण्यात आलं. याचा परिणाम म्हणजे भारताची टीम इतकी गंडली होती की, विंडीकडून ३-० आणि इंग्लंड दौऱ्यावर ५-० अशी मात खावी लागलेली. या राड्यात अनेक चांगल्या प्लेअर्सनं राजीनामेही दिले होते.

कार्तिक आणि कोहली वगळले तर, टीम इंडियामध्ये नेतृत्त्वासाठी ६ दावेदार उभे आहेत. साहजिकच पुढं जाऊन याचा फटका टीम इंडियाला बसू शकतो. हे नेतृत्व काही प्रमाणात सकारात्मक परिणाम करणारं असलं.

 तरी जेव्हा हार्दिक पंड्याचा ‘मेरे टाईम मे मेरा सुननेका, वो क्या बोल रहा है…’ वाला ऑडिओ तेव्हा व्हायरल झाला, या कॅप्टन्सीच्या नकारात्मक परिणामांची झलकही दिसली होतीच.

एक कॅप्टन असतोय, तेव्हा प्लेअर्सला जबाबदारीही समजते आणि कुणाला संधी मिळणार आणि कुणाला नाही तेही, तसं नसतं तर फॉर्मात असलेला दीपक हुडा फक्त कोहलीला जागा मिळावी म्हणून बाहेर बसला नसता, असंही बोललं जातंय…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.