शिवसेनेत संजय राऊत यांच महत्व कसं वाढत चाललं आहे…?

२४ ऑक्टोंबर २०१९ चा दिवस,

सगळा पिक्चर कसा ठरल्याप्रमाणे पार पडलेला. राज्यातल्या निवडणूकांचे निकाल लागलेले. भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेत आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला विश्वास दाखवल्याची ही भावना होती. “पुन्हा एकदा देवेंद्र” ची घोषणा देण्यात आली आणि अगदी आनंदात हा जल्लोष साजरा करण्यात येत होता…

पण दूसरीकडे काहीतरी वेगळं शिजत होतं.

सेना आणि भाजप युतीतून लढले होते. तोपर्यन्त ही युती अभ्येद्य असल्याचा सार्वत्रिक समज होता. शरद पवारांनी या निकालानंतर पत्रकार परिषद घेवून राष्ट्रवादी विरोधात राहिल हे स्पष्ट केलं होतं. कॉंग्रेस नेहमीप्रमाणे वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत होता.

पण….

दूसरीकडे खिचडीला फोडणी देण्याचं काम चालू होतं. हे काम करण्याची जबाबादारी शिवसेनेच्या प्रमुख १२ नेत्यांपैकी एकाकडेच देण्यात आली. जो माणूस बाळासाहेब, उद्धव ते आदित्य अशी सांगड घालून आपलं स्वत:च अस्तित्व सिद्ध करत होता त्याच्याकडे ही जबाबदारी होती..

झालेलं अस की शरद पवार आपली पत्रकार परिषद संपवून थेट पुण्याला निघाले होते. या प्रवासात त्यांची गाडी पनवेलच्या मॅकडोनॉल्डसमोर थांबली. तिथे हा माणूस शरद पवारांच्या गाडीत येवून बसला, 

या माणसाचं नाव संजय राऊत..

शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात बोलणी सुरू झाली. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे असतील. कॉंग्रेस व राष्ट्रवादीने पाठिंबा द्यावा अशी ऑफर पवारांपुढे ठेवण्यात आली.

याच घटनेनंतर महाविकास आघाडीचा प्लॅन साकारण्यात आला. पुढचं राजकारण तर तुम्हाला माहितच असेल पण या सर्व गोष्टीत संजय राऊत हे नाव गाजलं. राऊतांच नाव गाजतय याहून महत्वाच आहे ते म्हणजे या माणसाचं शिवसेनेतलं स्थान किती वाढतय…

संजय राऊतांच शिवसेनेतलं स्थान वाढत चाललं आहे का..?

एक काळ होता जेव्हा कोणीही उठून स्वत:च्या नावापुढे शिवसेना नेते म्हणून जोडू लागला. यावर उपाय म्हणून बाळासाहेबांनी “शिवसेना नेते” हे पदच निर्माण करुन टाकलं. ती माणसं सोडून कोणालाही शिवसेना नेते हे पद लावता येणार नाही अशी ती संकल्पना.

आज शिवसेने नेतेपदी एकूण १२ नेते असल्याचं सांगितलं जातं.

यामध्ये मनोहर जोशी, सुधीर जोशी, अँड लिलाधर डाके, मंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते, खासदार संजय राऊत, रामदास कदम, मंत्री एकनाथ शिंदे, अनंत गीते, गजानन किर्तीकर, आनंदराव अडसुळ, चंद्रकांत खैरे अशा नेत्यांचा समावेश होतो.

पण महाविकास आघाडी साकारण्यापासून ते अगदी आजच्या दिल्लीच्या आंदोलकांना भेट देवून पाठिंबा देण्यापर्यन्तची जबाबदारी एकाच व्यक्तीकडे दिली जाते ते म्हणजे संजय राऊत. 

संजय राऊतांच शिवसेनेतलं स्थान वाढत आहे का हे पाहण्यासाठी प्रमुख पाच मुद्दे आपणाला पहावे लागतील.

 

१) महाविकास आघाडीची स्थापना. 

वर जे उदाहरण दिलं त्यातून संजय राऊत हेच महाविकास आघाडीच्या महाभारतातले संजय होते हे स्पष्टच आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यापासून ते महाविकास आघाडी टिकवून ठेवण्यापर्यन्तची त्यांची भूमिका महत्वाची राहिलेली आहे. शिवसेनेमार्फत इतर दोन्ही पक्षांसोबत संवाद साधण्याची वेळ येते तेव्हा संजय राऊतच पहिल्या क्रमांकावर असतात.

२) कंगना ते अर्णब सर्वांना शिंगावर घेण्याची किमया. 

सुशांतसिंह राजपूत प्रकरणानंतर बॉलिवूड आणि महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. ड्रग्स प्रकरण ते अर्णबच्या टिका इथपर्यन्त प्रत्येक गोष्टींवर व्यक्त होण्याची जबाबदारी एकट्या संजय राऊत यांच्याकडे आली होती.

जेव्हा कंगणा रानावतच्या ऑफिसवर जेसीबी चालवण्यात आला तेव्हा देखील BMC मार्फत कोणी न बोलता संजय राऊत यांनीच भूमिका मांडली. इतकच काय तर कुणाल काम्राच्या शो मध्ये देखील ते खेळण्यातल्या जेसीबी घेवून मुलाखत देताना दिसले. मुंबईच्या या पेज थ्री कल्चरच्या राड्यात देखील सेनेमार्फत संजय राऊतच मैदानात होते.

३) महाविकास आघाडीत समन्वयाची भूमिका. 

मध्यंतरी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करण्यात आले.  या आरोपांमुळे राष्ट्रवादीसोबतच सत्तेत असणारे महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले. अशा वेळी संजय राऊत दूसऱ्याच दिवशी शरद पवारांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले.

वास्तविक धनंजय मुंडेचे प्रकरण हे पक्षाचा अंतर्गत मामला होता व त्यावर पक्षीय पातळीवर कारवाई होईल किंवा नाही अशी शक्यता असताना देखील या प्रकरणात राष्ट्रवादीच्या बाहेरील एकमेव व्यक्ती या प्रकरणात होती ती म्हणजे संजय राऊत.

त्याचप्रमाणे कॉंग्रेसने औरंगाबादच्या नामांतराला विरोध केल्यानंतर शिवसेनेमार्फत भूमिका मांडण्याचं काम संजय राऊत यांनीच केलं. त्यांनीच हा विषय सामोपचाराने घेतल्याचं बोललं जातं.

४) संजय राऊत यांनी प. बंगालमध्ये निवडणूक लढवण्याची घोषणा केली. 

गेल्या महिन्यात जय बांग्ला म्हणतं शिवसेना पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची माहिती खुद्द संजय राऊत यांनी दिली. साधारणं एखादा पक्ष दूसऱ्या राज्यात निवडणूका लढवणार असेल तर त्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष किंवा पक्षप्रमुख देत असतात. मात्र इथे मात्र संजय राऊत अशी माहिती देतात.

पक्षाच्या आगामी धोरणांची माहिती ते एकटेच पत्रकारपरिषदेमध्ये देतात. याला शिवसेनेच्या पक्ष पातळीवर खोडलं देखील जात नाही किंवा त्याचं खंडण देखील केलं जातं नाही. या गोष्टी संजय राऊत यांच वाढलेलं स्थान ठळकपणे अधोरेखित करतात.

५) राज्य सरकारमार्फत संजय राऊत यांची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस.

राज्य सरकारमार्फत पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कारांसाठी शिफारस असणारी यादी पाठवण्यात आली. या यादीत ९८ नावे होती. पैकी एक नाव संजय राऊत यांचे होते. राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. आघाडीचे सरकार आहे अशा वेळी संजय राऊत यांच्या नावाची शिफारस करणं ही गोष्टच शिवसेनचं राजकारण अवघडीत टाकणारी होती.

शिफारस असणाऱ्या या नावांची माहिती उघड झाल्यानंतर त्याप्रमाणे टिका देखील करण्यात आली. तरिही शिवसेनेने रिस्क घेवूनच संजय राऊत यांच्या नावाची पुरस्कारासाठी शिफारस केली.

हे झाले प्रमुख पाच मुद्दे आत्ता बोनस म्हणून शेवटचा सहावा मुद्दा…

काही दिवासंपूर्वी महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन केलं. या आंदोलनामध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सहभागी झाले. खुद्द शरद पवार या व्यासपीठावरून बोलले. इथे शिवसेनेमार्फत आदित्य ठाकरे येणार होते मात्र ते आले नाहीत. यावरून शिवसेनेचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा नसल्याची टिका झाली.

या टिकेनंतर थेट घडामोडी घडल्या त्या आजच्या.

संजय राऊत थेट दिल्लीच्या आंदोलन ठिकाणी भेट देवून राकेश टिकेत यांना पाठिंबा जाहीर करुन आले. देशाच्या राजकारणात मोदी सरकारविरोधात बोलण्यासाठी एकमेव नाव समोर येत ते संजय राऊत यांच. त्याचसोेबत राज्यातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा न देता केंद्रात पाठिंबा देण्याचं राजकारण करण्यात देखील शिवसेनेचे प्रमुख वजीर म्हणून राऊतच काम करत आहेत.

या गोष्टीच सेनेत संजय राऊत यांच प्रस्थ वाढच चालल्याचं स्पष्टपणे सांगतात…

हे ही वाच भिडू 

1 Comment
  1. Mr says

    Sanjay Raut bhadwa naughty chutiya manus aahe

Leave A Reply

Your email address will not be published.