‘रेहम खान’ या एका पुस्तकानं पाकिस्तानातलं राजकारण धोक्यात येणार.

रेहम खान. या नावाने सध्या पाकिस्तानी राजकारणात खळबळ उडवून दिलीये. रेहम खान या पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि राजकीय नेते इम्रान खान यांच्या माजी पत्नी आहेत.

२०१५ साली त्यांचा आणि इम्रान खान यांचा घटस्फोट झालाय. शिवाय त्यांनी बीबीसीच्या पत्रकार म्हणून देखील काम पाहिलेलं आहे. त्याव्यतिरिक्त पाकिस्तामधील अनेक टीव्ही चॅनेल्समध्ये देखील त्यांनी पत्रकार म्हणून काम केलेलं आहे. २०१५ साली त्या निओ टीव्हीवर ‘तब्दिली’ नावाचा एक कार्यक्रम होस्ट करत असत, ज्याला पाकिस्तानी जनतेची चांगली पसंती मिळाली होती. विशेष म्हणजे ‘तब्दिली’ अर्थात बदल ही  इम्रान खानच्या ‘तेहरिक-ए-इन्साफ’ची राजकीय घोषणा देखील आहे.

रेहम खान यांचं आत्मचरित्र ‘रेहम खान’ या नावाने येऊ घातलंय, जे इंटरनेटवर लिक झालंय.

या पुस्तकात त्यांनी केलेल्या खळबळजनक दाव्यांमुळे सध्या त्या पाकिस्तानमध्ये चर्चेत आहेत. पुस्तकात त्यांनी इम्रान खान यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत. इम्रान खान शिवाय यांच्याशिवाय पुस्तकात पाकिस्तानचा माजी कर्णधार वसिम अक्रमसह इतरांवर देखील अशाच स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत.

इम्रान खानवर आरोप करताना आपला माजी पती ‘सादिक’ आणि ‘अमीन’ अर्थात प्रामाणिक आणि सदाचरणी नसल्याचं त्यांनी म्हंटलय. इमानने आपलं तिसरं लग्न दोन महिने लपवून ठेवल्याच्या गोष्टीचा दाखला त्यांनी यासाठी दिला. या प्रकरणात इम्रानने पाकिस्तानी घटनेच्या ६२ व्या आणि ६३ व्या कलमाचं उल्लंघन केल्याचं त्या म्हणतात. यासाठी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून खुलासा मागवावा अशी मागणी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्या. साकिब निसार यांच्याकडे केली आहे.

तसेच ‘तहरिक-ए-इन्साफ’च्या माध्यम समन्वयक अनिला ख्वाजा यांच्याशी इम्रान खान यांचे अनैतिक संबंध असल्याचा दावा रेहम यांनी केलाय.

reham khan 1
बीबीसीसाठी शो सादर करताना रेहम खान

 

वसिम अक्रमवर करण्यात आलेला आरोप तर अजूनच गंभीर आहे. वसिम आक्रमने आपल्या सेक्शुअल फँटसीज पूर्ण करण्यासाठी आपल्या  दिवंगत पत्नीला स्वतःसमोर एका कृष्णवर्णीय व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडलं, असा दावा रेहम यांनी केलाय.

अक्रम बाबतीतली माहिती समोर आल्यानंतर लगेलच रेहम खान यांना कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली आहे. वसिम अक्रम व्यतिरिक्त इतर ३ जणांनी ही नोटीस पाठवली आहे. पुस्तकातील मजकूर हा अश्लील, खोटारडा आणि बदनामीकारक असल्याचा दावा नोटिशीत करण्यात आला आहे. सैयद झुल्फिकार बुखारी या लंडनस्थित उद्योगपतीवर देखील इम्रान खानच्या दुष्कृत्यातील साथीदार असल्याचा आरोप रेहम खान यांनी पुस्तकातून केलाय.

येत्या जुलै मध्ये पाकिस्तानात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुस्तकातल्या त्यांच्या दाव्यांमुळे पाकिस्तानी पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत असणाऱ्या इम्रान खान यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

या पुस्तकात करण्यात आलेल्या आरोपांचं खंडन करताना  निवडणुकीच्या तोंडावर इम्रान खान आणि त्यांच्या ‘तेहरिक-ए-इन्साफ’ या पक्षाची बदनामी करण्यासाठी विरोधकांनी रचलेला हा कट आहे अस इम्रान खान यांच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आलंय. ‘तेहरिक-ए-इन्साफ’च्या अनेक नेत्यांनी ट्वीटरवरून या प्रकरणाला विरोधकांचं षडयंत्र जाहीर केलंय.

 

Leave A Reply

Your email address will not be published.