इम्रान खान म्हणतोय, तालिबानी पाकिस्तानला कश्मीर मिळवून देणार आहेत.

हल्ली पाकिस्तानला खूपच आनंद होतोय. का तर त्यांना काश्मीर मिळणार आहे म्हणे. आणि कोण देणार त्यांना हे काश्मीर तर तालिबानी…

हे पाकिस्तानात बसलेले राजकारणी नेहमीच काही ना काही  बरळत असतात. अख्या जगाला जेव्हा तालिबानचा निषेध करावासा वाटतो. तर दुसरीकडे पाकिस्तान मात्र तालिबान्यांच्या अफगाणिस्तानातल्या एन्ट्रीने खुश झालंय. खरं तर सगळ्याच जगाला हे आधीच माहित होत. पण पाकिस्तानने हे उघड उघड मान्य केलं नव्हतं. मात्र आता सरळ सरळ नॅशनल टेलिव्हिजन वर हे पाकिस्तानी मुलाखती देत सुटलेत.

इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या एका नेत्याने टीव्हीवर सांगितले की,

तालिबान पाकिस्तानला काश्मीर जिंकण्यासाठी मदत करेल.

यावर, पाकिस्तानी टीव्ही अँकरने या नेत्याला मध्येच अडवत विचारलं, की कशाच्या जोरावर ते हे स्वप्न बघतायत ? तुम्हाला हे स्वप्न कोणी दाखवलं ?

तर नीलम इर्शाद शेख या नेत्याने पाकिस्तानी वृत्तवाहिनीवरील डिबेट शो मध्ये भाग घेतला होता. त्या कार्यक्रमादरम्यान तो म्हणाला,

तालिबानी म्हणतायत की आम्ही तुमच्यासोबत आहोत. आणि इंशाअल्लाह आम्ही तुमच्यासोबत येऊ आणि तुम्हाला काश्मीरवर विजय मिळवून देऊ.

अँकरने मध्येच टोकलं आणि विचारलं की, कशाच्या जोरावर तुम्ही हे म्हणताय ? तर नेता इर्शाद म्हणतो की,

तुम्हाला दिसत नाही का पाकिस्तान आणि इम्रान खान यांना तालिबान कडून किती आदर मिळत आहे ते.

तो पुढं म्हणतोय,

भारताने आमच्या भागाचे जे तुकडे केले आहेत, इंशाअल्लाह ते तुकडे परत आम्ही आमच्या देशाला जोडू. आमच्या सैन्याकडे ताकद आहे, आमच्या सरकारकडे सत्ता आहे. तालिबान आम्हाला पाठिंबा देत आहे, कारण त्यांच्यावर अत्याचार झाले तेव्हा पाकिस्तानने त्यांना पाठिंबा दिला.

बुधवारीच पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद अहमद यांनी अफगाणिस्तानमध्ये तालिबानने घेतलेला  ताबा हा पाकिस्तानचा विजय आणि भारताचा पराभव असल्याचे म्हंटले आहे. पण, मागचा भारत पाक युद्धाचा इतिहास पाहता, भारताबरोबर अनेकदा थेट युद्धात पाकिस्तान हरला आहे.  दहशतवादाच्या प्रॉक्सी वॉरमध्येही भारताने पाकिस्तानची दैना दैना केली.

दरम्यान, आता या पाकिस्तानी नेत्यांना वाटत की, आपण अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करून भारतात दहशतवाद वाढवू शकू. पण हा काही खाऊ आहे का ? कुणी पण यावे टिकली मारुन जावे, असं या पाकिस्तानला वाटलं तरी सध्या तरी तशी काही चिन्ह नाहीत.

पण दहशतवादासारख्या छुप्या कारवाया करण्याचा पाकिस्तानचा उद्देश असेल तर भारताला आपली रणनीती ठरवावीच लागेल. कारण पाकिस्तानी नेत्यांची वक्तव्य जरी गांभीर्यानं घेण्याची गरज नसली तरी, अफगाणिस्तानातला तालिबान्यांचा वावर भारतासाठी काळजी करण्यासारखं आहे.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.