१९८३ मध्ये सुरु झालेली इम्रान खान-सिद्धूची मैत्री आज राजकारणात शिव्या खायला लावतीय…

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे नवज्योत सिंग सिद्धू यांचे चांगेल मित्र आहेत. पाकिस्तानचे सैन्यप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशी देखील सिद्धू यांचे संबंध आहेत.

असा दावा करत कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांना पंजाबचे मुख्यमंत्री करण्यास विरोध केला होता. त्याआधी देखील सिद्धू यांना इम्रान खान यांच्या शपथविधीला उपस्थित राहिल्यानंतर आणि जनरल कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतल्यानंतर संपूर्ण देशभरातून सिद्धू यांना टीका सहन करावी लागली होती.

त्यानंतर काँग्रेसचेच नेते दिग्विजय सिंग यांनी देखील सिद्धू यांच्यावर टीका केली होती. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी देखील सिद्धू यांच्यावर टीका केली होती. मात्र तरीही सिद्धू या भेटीचे आणि इम्रान खान यांच्या मैत्रीचे समर्थन करत राहिले. 

एकूणच काय तर सिद्धू यांच्या स्वतःच्या काँग्रेस पक्षासह अगदी विरोधी पक्ष देखील इम्रान खान-सिद्धू यांच्या मैत्रीला शिव्या घालत असतो. सिद्धू यांना देशद्रोही अशी उपमा देत असतो. मात्र तरीही सिद्धू या मैत्रीचं समर्थन करत असतात.

त्यामुळेच प्रश्न पडणे साहजिक आहे कि, नेमकी या मैत्रीची सुरुवात कधी आणि कशी झाली?

नवज्योतसिंग सिद्धू यांनीच या मैत्रीच्या सुरुवातीबाबत अगदी सविस्तर सांगितले आहे. सिद्धू सांगतात,

मी इम्रान खानबद्दल पाकिस्तानला जाण्याच्या आधी बरंच ऐकले होते. भेटीच्या आधी तो मला ग्रीक गॉड प्रमाणे वाटायचा. पण भेटल्यानंतर तो मला देखण्या पुरुषापेक्षा कोणीतरी जास्त वाटला. तो अत्यंत पवित्र मनाचा होता. 

ते १९८३ च साल होतं. फरिदाबादच्या मैदानावर मॅच सुरु होती. त्यावेळी सिद्धू क्रिकेटमध्ये अगदी नवीन नवीन खेळाडू होता. तर इम्रान खानचं करिअर मात्र त्यावेळी अगदी पीक वर होते. त्या मॅच मध्ये इम्रान खान सिद्धूला पहिलाच बॉल टाकताना घसरून पडले. तर पुढचा बॉल सिद्धू यांच्या पोटावर जाऊन आदळला.

सिद्धूला बॉल लागलेला पाहून इम्रान खानने जवळ येऊन म्हणाले,

सरदार साहाब एव्हरिथींग इज ओके?

त्यावर सिद्धू यांनी येस असं उत्तर दिलं. सिद्धू सांगतात त्यानंतर इम्रानने मला बाउन्सर टाकला नाही. संध्याकाळी देखील इम्रानने माझ्याबद्दल चौकशी केली. इथूनच सिद्धू आणि इम्रान खान यांच्या मैत्रीची सुरुवात झाली.

त्यानंतर १९८६ मध्ये सिद्धू पाकिस्तानला गेल्यानंतर इम्रान खानसोबत त्यांची वैयक्तिक ओळख झाली आणि स्पेशल बॉण्ड देखील तयार झाला.

सिद्धू सांगतो,

मला त्यावेळी खरंच इम्रानच्या एकदम पवित्र मनाचा अनुभव आला होता. तो लोकांना माझ्यावर विश्वास ठेवा असं सांगत नाही तर तो स्वतः लोकांवर विश्वास ठेवतो. त्याने वासिम आक्रम, वकार युनूस यांच्यासारख्या खेळाडूंना घडवलं आहे. त्यांच्याकडे खेळण्यासाठी बूट पण नव्हते, अशा त्यांच्या पडत्या काळात त्यांना मदत केली आहे.

त्यानंतरच्या काळात देखील क्रिकेटमध्ये सिद्धू आणि इम्रान खान यांची मैत्री कायम राहिली. क्रिकेटमध्ये इम्रान खानने सिद्धूला ४ वेळा आउट केले. मात्र कोणताही वैरभाव न बाळगता दोघांनी मैत्री जपली.

त्यानंतर १९९६ साली इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला त्यांना पाकिस्तानच्या  नॅशनल असेम्ब्लीच्या निवडणुका जिंकता आल्या नाहीत. मात्र २००२ साली त्यांनी पहिल्यांदा निवडणुका जिंकल्या. पुढच्या काळात सिद्धू यांनी देखील भारताच्या राजकारणात प्रवेश केला. २००४ साली अमृतसरमधून ते खासदार झाले. 

कदाचित या राजकारणामुळे देखील दोघांमधील मैदानावरची मैत्री पुढे मैदान सोडल्यानंतर सुद्धा कायम टिकून राहिली. जेव्हा इम्रान खान पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेणार होते तेव्हा त्यांनी भारतातील त्यांच्या क्रिकेटमधील अनेक मित्रांना निमंत्रण दिले होते. मात्र केवळ नवज्योतसिंग सिद्धूच सहभागी झाले. याच भेटीत त्यांनी बजावा यांची घेतलेली गळाभेटीची बरीच चर्चा झाली.

२०१९ मध्ये कारतपूर कॉरिडॉरच्या वेळी देखील इम्रान खान यांनी सिद्धू यांनाच पहिला पास दिला होता. त्यावेळी हमारा सिद्धू किधर है… असा सिद्धू यांना गर्दीत शोधत येणारा इम्रान खान यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.

एकूणच काय तर या दोन्ही खेळाडू आणि राजकारण्यांनी आपली मैत्री मैदानात आणि मैदानाच्या बाहेर देखील जपली आहे. त्यावर किती हि टीका झाली, कितीही देशद्रोही म्हणून टीका झाली तरी ते त्या टीकांना उत्तर देत बसत नाहीत.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.