काँग्रेसच्या गृहमंत्र्यांना वाटत होतं, “बाळासाहेबांनी खंडणी घेऊन शिखांचं संरक्षण केलंय “

ऐंशीच्या दशकातील गोष्ट आहे. पंजाबमध्ये खलिस्तानवादी अतिरेक्यांनी वातावरण पेटवले होते. अमृतसर मधल्या सुवर्णमंदिरात लपून तिथून या कारवाया चालवल्या जायच्या. अखेर त्यांना आवर घालण्यासाठी सुवर्णमंदिरावर लष्करी कारवाई करावी लागली. यात भिंद्रनवाले पासून अनेक खलिस्तानवादी अतिरेकी मारले गेले.

पण सुवर्णमंदिरात लष्कर घुसवल्यामुळे शीख समाज दुखावला गेला. यातूनच जागोजागी हिंसक प्रतिक्रिया उमटली. भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी हत्या केली. यासाठी अख्ख्या शीख समाजाला जबाबदार ठरवून त्यांच्या विरुद्ध दंगल पसरवण्यात आली.

देशभर आगडोंब उसळला. दिल्लीमध्ये तर प्रचंड प्रमाणात शीखांचे शिरकाण करण्यात आले. पंजाबमध्ये सर्वत्र जाळपोळ सुरु होती. आपल्या व्यवसायानिम्मित देशाच्या कानाकोपऱ्यात राहायला गेलेल्या शीख कुटुंबामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.

याचे पडसाद मुंबईमध्ये सुद्धा पडले. दिल्ली खालोखाल मुंबईमध्ये शीख समाज स्थलांतरीत झाला आहे. तिथे सुद्धा दिल्लीप्रमाणे दंगल पसरेल या भीतीने अनेक शीख बांधव आपली घरे, मालमत्ता कवडीमोल भावात विकून परत पंजाबला जाण्याची तयारी करू लागले. कधीही काहीही होऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

एक ठिणगी सुद्धा अख्खं शहर पेटवण्यासाठी बास होती आणि असाच प्रयत्न ही झाला.

एकदा काय झालं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाकडे एक पंजाबमधून बिल्ला नावाचा इसम आला. त्याने बाळासाहेबांच्याकडे कान भरले की पंजाब मध्ये शीख समाज व हिंदू समाज यांच्यात खूप मोठा तणाव निर्माण झाला असून तिथल्या हिंदुंवर प्रचंड अत्याचार होत आहेत. स्त्रियांवर बलात्कार होत आहेत.

बाळासाहेबांच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत पोहचली. पण त्यांना ठाऊक होते की रागाच्या भरात केलेली प्रतिक्रिया देणे बरोबर नाही. त्यांनी मुंबईमधल्या पंजाबी असोशिएश्नचे अध्यक्ष कुलवंतसिंह कोहली यांना भेटायला शिवसेना भवनावर बोलवलं. कुलवंतसिंह आपल्या असोशिएशनच्या इतर सदस्यांना घेऊन भेटायला गेले.

तिथे गेल्यावर त्यांना दिसले की उंचपुरे भगव्या वस्त्रातले बाळासाहेब आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये सिगार ओढत बसले आहेत. त्यांनी या मंडळीना बिल्लाने केलेले आरोप सांगितले. सगळी शहानिशा करण्यासाठी बिल्लालाच तिथे बोलावून घेतले.

‘‘बिल्लाजी, अब आप बताइये, जो आपने हमें बताया था।’’

पण तेवढ्या सगळ्यांना बघून बिल्लाची भाषा बदलली. आपण सगळे पंजाबी भाईभाई आहोत कशी आपल्यात एकी पाहिजे वगैरे भाषण त्याने सुरु केले. साहेबांन कळेना याला काय झालं,

“वो सब छोडो. बस जो मुझे कहा था वही बात कहिये.”

पण बिल्ला काही त्यावर काही बोलेचना झाला. अखेर कुलवंतसिंह यांनी त्या बिल्लाची मानगूट पकडली. खोटारडेपणा करून शिखांच्या बद्दल गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केल्या बद्दल त्याला शिव्या घातल्या. बिल्लाची बोलतीच बंद झाली होती. 

हा सगळा प्रकार बघून बाळासाहेबांची खात्री पटली की हा सगळा मुंबई पेटवण्याचा डाव होता. त्यांनी पंजाबी असोशिएशनच्या कुलवंतसिंह वगैरे सदस्यांना शीख समाजाला मुंबईत कोणताही धोका नाही व निश्चिंत व्हा असे सांगितले. बिल्लाचा योग्य आदरसत्काराचा प्रसाद देऊन त्याची रवानगी पहिल्या ट्रेनने पंजाबला केली.

पण मुंबईसोडून जाणाऱ्या शीखबांधवांचे प्रमाण अजून कमी झाले नव्हते. अखेर एक दिवस प्रमोद महाजन कुलवंतसिंह यांच्याकडे आले, त्यांनी सर्वपक्षीय सभा बोलवत असल्याचे त्यांना सांगितले व तिथे मुंबईमधील सर्व शीख बंधू भगिनींना घेऊन येण्याची विनंती केली.

षण्मुखानंद सभागृहात ही सभा पार पडली. याची प्रस्तावना प्रमोद महाजन यांनी केली. त्यांनी केलेल्या भावनिक आवाहनामुळे तिथे जमलेला प्रत्येकजण हेलावून गेला. बाळासाहेब ठाकरे या सभेला उपस्थित राहू शकले नाहीत पण त्यांच्यावतीने प्रमोद नवलकर यांनी  संदेश दिला,

“प्रत्येक शीख बांधवाला मी शिवसैनिकच समजतो. आणि शिवसैनिकाला जर काही इजा झाली तर शिवसेना कशी वागते हे सर्वाना माहितीच आहे.”

आजारी असूनही या सभेला हजर असणाऱ्या वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या नात्याने अखेरीस जाहीर केलं

“यानंतर एकाही शीख कुटुंबानं मुंबई किंवा महाराष्ट्र भीतीनं सोडला तर ते माझं वैयक्तिक आणि सरकारचं अपयश असेल असं मी मानेन.’’

या सभेने अपेक्षित परिणाम केला. पूर्ण देशभर शिखांवर हल्ले झाले पण मुंबईत याचा लवलेशही दिसली नाही. शीखबांधव सुरक्षितपणे राहू शकले. मुंबई शांतचं राहिली.

हा किस्सा कुलवंतसिंह कोहली यांनी एके ठिकाणी लिहून ठेवला आहे. पुढे एकदा ते दिल्लीला गेले होते तेव्हाचे गृहमंत्री बुटासिंग हे त्यांना म्हणाले,

‘अच्छा किया आपने उन्हे को साडेचार कोटी दे दिये. इसी वजह से मुंबई मै अपना सिख समाज टिक सका!”

कुलवंतसिंह यांना धक्का बसला. गुप्तहेर खात्याने बुटासिंगना रिपोर्ट दिला होता की पंजाबी असोशीएशनने खंडणी देऊन शीख समाजाचे रक्षण केले होते. पण खरोखर असे काही घडले नव्हते हे कुलवंतसिंह यांनी त्यांना पटवून दिलं. जेव्हा त्यांनी ही घटना बाळासाहेबाना सांगितली तेव्हा ते खूप हसले.

यानंतर कधीही या दोघांची भेट व्हायची तेव्हा बाळासाहेब गमतीमध्ये त्यांना म्हणायचे,

“कुलवंतजी मेरे साडे चार करोड कहां है?”

बाळासाहेबांच्या अशा या दिलखुलासपणामुळे फक्त मराठी माणूसचं नव्हे तर मुंबईमधला प्रत्येक समाजाचा माणूस त्यांच्यावर प्रेम करायचा.

शीख समाजाने शिवसेनाप्रमुखांवरचं प्रेम कधीही कमी होऊ दिल नाही. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर मुंबईमधल्या गुरुद्वाऱ्यामध्ये त्यांच्या सन्मानासाठी २४ तास लंगर ठेवला गेला होता व अंत्यदर्शनासाठी बाहेर गावाहून आलेल्या शिवसैनिकांची राहण्याची सोय देखील केली होती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.