कधी काळी गावाची सरपंचकी गाजवलेल्या या माणसावर आज मजुरीची वेळ आलीय.

ओ, सरपंच नमस्कार….

असं रस्त्यानं जाणाऱ्या माणसानं हात वर करुन म्हंटल की गावच्या सरपंचाची कॉलर ताईट झालीच म्हणून समजायचं. गावातील पहिला नागरिक म्हणून त्याला हा मान मिळणं साहजिक आहे. पण या काळातील त्याचा रुबाब बाकी बघण्यासारखा असतोय.

का नसणार आणि रुबाब. शेवटी गावकी-भावकीच राजकारण करुन तो त्या पदावर पोहचलेला असतोय. त्यानंतर गावातील माणसं पुढं – मागं फिरू लागतात. एकूणच काय तर हौशे, गवसे, नवसे अशा सगळ्यांचीच सरपंचकी गाजती.

पण दसरा संपल्यावर आपट्याच्या पानांना आणि झेंडूच्या फुलांना महत्व असतयं. तो दिवस संपला की उरतो तो फक्त पालापाचोळा. आणि हेच वास्तव असतं. राजकारणात देखील सत्तेचं दिवस सरलं की असचं भयाण वास्तव अनेकांच्या वाट्याला येतं. पण ५ वर्षानंतर सरपंच पदाची टर्म संपल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न उभा राहतो.

सध्या ग्रामपंचाय निवडणूकीच्या निमीत्ताने अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधलं आहे. गावगाड्याचा कारभार हाती घ्यायच्या स्वप्न बघत राजकारणाचा अनुभव असलेले, नसलेले असे हौशे, गवसे राजकारणी तयार होतात.

पण निवडणूकीला उभं राहण्यापुर्वी आणि निवडून येण्यापुर्वी त्यांनी पाच वर्षानंतरचा विचार करायला पाहिजे. पोटापाण्याची काय सोय याचा मार्ग तयार ठेवायला पाहिजे. आणि नसेल केला तर हा लेख वाचायला पाहिजे.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कोकणगाव येथील माजी सरपंच असलेले शिवाजी छबु पोटींदे यांची.

१९९८ ते २००३ अशी ५ वर्ष सरपंचकी गाजवली. पण तेच शिवाजीराव आज गावातल्या पेट्रोल पंपावर ८ हजार रुपये महिना असं मजुरीवर जात आहेत.

सरपंच पद गेल्यावर अशी वेळ का आली ते शिवाजीराव पोटींदे यांनी ‘बोल भिडू’ शी बोलताना सगळा प्रवास सांगितलं, तो त्यांच्याच शब्दात…

कोकणगावातच जन्म १९६६ सालचा. घरची परिस्थिती म्हणजे अठरा विश्व दारिद्र्य. त्यामुळे जरा मोठं झाल्यावर वडिलांनी शाळेत घातलं पण पोटापाण्यासाठी बाहेरच काम करण्यात दिवस घालवावा लागायचा. त्यातुनच शाळेची गोडी कमी झाली, आणि तिसरीतनं शाळा सोडून दिली.

त्यानंतर कुठ कोणाच्या शेतात रोजंदारीवर कामाला जा, सालगडी म्हणून कामाला जा, कोणाच्या घरी कामाला जा असा कार्यक्रम सुरु झाला. २ रुपये रोजची हाजरी मिळायची. ५ वर्ष हे काम केल्यावर जरा समाज यायला सुरुवात झाली. मग जरा मोठी उडी मारायची म्हंटल.

त्यासाठी कमी वयातच ३० हजार रुपये कर्ज काढून मळणी यंत्र विकत घेतलं.

या मळणी यंत्रावर चांगला जम बसला, तसं दिवस बदलू लागलं, पोटं पाणी चांगलं चालू लागलं. २ वर्ष चांगलं पैसे कमावल. पण त्यानंतर गावात हार्वेस्टींग मशीन आलं, त्यातनं शेतकऱ्याचा गहू २ तासात मळून घरी जायचा.

झालं! गणित बिघडलं. परत रिव्हर्स यायला चालू झालो. त्यामुळे तो धंदा बंद पडला. यानंतर म्हशीचा व्यवसाय चालू केला. रोज ओझर टाऊनशिपला दूध घालायचं असा उद्योग चालू केला. हा जवळपास १० वर्ष चालला.

१९९९० साली घरच्यांनी दोनाचे चार हात केले. लग्न झाल्यानंतर जबाबदारी वाढली. १९९३ मध्ये मुलगी झाली. खर्च दुप्पट वाढला. त्यामुळे ओझर टाऊनशिपचा उद्योग बंद झाल्यावर परत जुन्या दिवसासारखी मोल मजुरी चालू केली. पैसे पुरत नव्हते, मग बायकोला देखील सोबत न्यायला चालू केलं.

कसातरी संसाराचा गाडा ओढत चालू होत. अशातच १९९७ मध्ये कोकणगावची निवडणूक लागली. सरपंच पदाची जागा राखीव कोट्यासाठी आरक्षित पडली. गावातल्यानी १०-१२ दिवस उमेदवार शोधला पण कोणीच घावला नाही. मग मिटिंगमध्ये कोणीतरी असंच माझं नाव पुढं केलं.

पॅनेलची माणसं घर शोधत आले.

निवडणुकीला उभं राहायची गळ घातली. मोठं मोठं सांगितलं, हे करायला भेटत, ते करायला भेटत, आमदार- खासदारांसोबत फिरायला मिळत, नाव होत गावात. तुम्ही नक्की निवडून येणार आम्ही हाय ना… असं सगळं सांगितल्यावर मला पण हे पटायला लागलं. सरपंच म्हणून घ्यायला हरखून गेलो.

कागदपत्र तपासली, परिस्थिती नसताना पण अर्ज भरला, जे लोक शोधत घरी आली होती त्यांनीच प्रचाराला मदत केली. गावातल्यानी निवडणून दिलं.

त्यावर्षी आमच्या पॅनलच्या ६ जागा आणि पुढच्या पॅनलच्या ३ जागा निवडून आल्या आणि गावचा सरपंच म्हणून विराजमान झालो.

आता सरपंच झालोय म्हणल्यावर गावात कोणी मजुरीवर ठेवायला तयार नाही, नाइलाजास्तव सालगडी म्हणून काम सोडावं लागलं. जो तो सरपंच म्हणून हाक मारू लागला. गावातील माणसं कामासाठी पुढं – मागं फिरायला लागली. कधी बरं हाय का? असं न विचारलेली माणसं पण घरी यायला लागली, विचारपूस करू लागली.

मानपान मिळत होता पण दुसरीकडं पोटापाण्याचा प्रश्न होताच. गावाच्या बाहेर कुठं कामाला जायचं तर गावात आणि पंचायतीमध्येच ३-४ वाजायचे. उपाशी पोटी घरी जायच. काय असलं ते जेवायचं. तोवर दिवस संपून जायचा.

अखंड ५ वर्ष हे असच चाललं. घरी आलं कि बायको ओरडायची.

घरची भाकरी खायची गावच काम करायची.

तीच पण बरोबरच होत. पंचायतीच्या कामातून मला कुठं कामाला जाताच यायचं नाही, त्यामुळं किरणांच्या खर्चापासून, मुलगीच्या शिक्षणाचा खर्च असं सगळं घरातलं तिनंच बघितलं. मला १ नवा पैसे घरी देता आला नाही.

पोटापाण्याकडनं मला पण ५ वर्ष तिनंच सांभाळलं. सरपंच म्हणून घेताना माझ्या घराची अवस्था लयच खराब असायची.

शिक्षण कमी त्यामुळे पंचायतीच्या हिशोबातील घोळ घालायचे छक्के-पंजे जमायचे नाहीत, आणि मुळातच माझा त्यो स्वभावच नव्हता. त्यामुळं घोळ घालून पैसा कमवायचा म्हणलं तरी जमलं नाही.

सरपंच असताना गावात काम केली का तर विरोधक पण सांगतील केली म्हणून. स्मशानभूमीचा काम केलं, शाळेचं काम केलं, रस्त्याची काम केली, गावात हापश्या बसवल्या.

२००२-०३ च्या आसपास सरपंच पदाची टर्म संपली आणि दुसरी दिवशी पासून ५ वर्ष पुढं – माग करणारी मंडळी गायब झाली. ज्यांनी गोड बोलून काम काढून घेतलं ती पण विचारायची बंद झाली. परत आता पोटापाण्याचा प्रश्न समोर आला. त्यावर्षींच दुसरी मुलगी झाली.

परत मोलमजुरीला सुरुवात केली. जुनं दिवस परत चालू झालं. त्यावेळी अगदी २० रुपय रोजानं असं पण काम केलेलं आठवतंय. ४-५ वर्ष अशी काम केल्यावर गावातल्याच पेट्रोल पंपावर काम मिळाल.

२०१० मध्ये मोठीची १२ वी झाली कि तीच लग्न लावून दिलं. माझ्याकडे १ रुपया नव्हता पण पाव्हण्या रावळ्यांकडून उसनं-पासन करून ३ लाख रुपये खर्च केला. तो परत ३ वर्ष हप्त्यान फेडत होतो.

ते हप्ते फिटतेत तोवर २-३ वर्षांपूर्वी परत पंचायत समिती सदस्य म्हणून उभं करायचं चालू होत, तसा विषय पण मांडला, पण बायकोनं कोपरापासून हात जोडलं आणि घराकडं बघायला सांगितलं. आणि तरीपण जर उभं राहायचं असलं तर निफाडलाच खोली घ्या, तिकडंच राहा आणि तिकडंच खावा-प्या असं सांगितलं.

धाकट्या मुलगीच पण मागच्या वर्षी १० वी झाल्यावर लग्न उरकून दिल, तिच्यासाठी गाईवर कर्ज काढलं, आणि पैसा उभा केला होता. आता बायकोच पैसे घरखर्चाला वापरायचं आणि माझ्या पैशातून ते हप्ते फेडायचं अशी कंडिशन चालू आहे.

आज १० वर्ष पंपावर काम केल्यावर ८ हजार रुपये महिना हजारी झालीय. त्यातनच हप्ते फेडायचं.

गावातच पंप असल्यामुळे जो तो पंपावर आल्यावर माजी सरपंच म्हणून हाक मारून जातो. तुम्ही इकडं कसं काय असं विचारून जातो.

पण ५ वर्षात एक कळालेल कि पोटाला मानपान नाही तर भाकर तुकड्याची गरज असतीय.

आता माझं वय आहे ५४. पण या वयात देखील २४ तासाची ड्युटी असती. आणि त्यानंतर समोरचा जर नाही सोडायला आला तर पुढं आणखी २४ तास पण होती.

तेव्हा फक्त गावचा मान राखायला गेलो, नाव लागलं पण संघर्ष अजून पण चालूच आहे. त्यामुळे पैसा असला तरच गावगुंडांच्या राजकारणात पडायचं. नाही तर त्या वाट्यालाच जायचं नाही.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.