२०१४ मध्ये कुठलंही युद्ध न करता रशियानं युक्रेनचा एक भाग गिळंकृत केला होता..

मागचे काही महिने संपूर्ण जगाचं लक्ष रशिया-युक्रेन या दोन देशांकडे लागलं होतं. गुरुवारची सकाळ रशिया-युक्रेन युद्धाच्या बातमीनं झाली. रशियानं यापूर्वी देखील युक्रेनकडून एक भाग काढून घेतला होता. मात्र त्यावेळी युक्रेननं बघ्याची भूमिका घेतली होती असं सांगण्यात येतं. त्यावेळी पासूनच रशियाचा युक्रेनवर डोळा होता.

८ वर्षानंतर रशियानं युक्रेनवर थेट हल्ला करून मनसुबे खरे करून दाखवले आहेत. त्याचवेळी यावर जागतिक संघटनेनं आक्षेप घेतला असता, तर कदाचित आजची परिस्थिती वेगळी असती. त्यावेळेस काय काय घडलं होतं, हे पाहू.

अगोदर युक्रेनच्या राष्ट्रपतींना बेदखल केलं

२०१४ मध्ये रशियाने युक्रेनचे राष्ट्रपती विक्टर यानुकोविच यांना सत्तेतून बेदखल करण्यात आलं. त्यानंतर क्रिमिया हे बेट हिसकावून घेतलं होतं. रशियन समर्थकांनी क्रिमियाच्या सैनिकी ठिकाणावर आपलं बस्तान बसवलं होतं.

मार्च २०१४ मध्ये रशियानं युक्रेनचं क्रिमिया आपल्या ताब्यात घेतलं. याला सर्वात सोपं आक्रमण असंही म्हणण्यात आलं होतं. त्याचं कारण म्हणजे कुठल्याही लढ्याशिवाय हा प्रदेश रशियाकडे आला होता.

पण क्रिमिया युक्रेनकडे गेलं कसं? तर १९५४ मध्ये रशियानं गिफ्ट म्हणून क्रिमिया युक्रेनला दिला होता

रशिया, युक्रेन हे तेव्हा सोव्हियत संघाचा भाग होते. १९५४ मध्ये सोव्हियत संघाचे सर्वेसर्वा होते निकिता क्रुश्चेव्ह. त्यांनी हा प्रदेश गिफ्ट म्हणून युक्रेनला दिला होता.

तर १९९१ मध्ये सोव्हियत संघाचे विघटन होऊन रशिया आणि युक्रेन वेगळं झालं. तेव्हापासूनच या दोन देशांमध्ये क्रिमियावरून वाद सुरु झाला होता. इतिहास असं सांगतो की, कैथरीन द ग्रेट यांच्या कार्यकाळात म्हणजेच १७८३ मध्ये क्रिमिया रशियाला मिळाला होता.

कैथरीन द ग्रेट या रशियन साम्राज्याच्या महाराणी होत्या.

सोव्हियत संघाच्या विघटनानंतर १९९१ मध्ये युक्रेनने आपल्या स्वातंत्र्याची घोषणा केली होती. तसेच मे २००२ पासून युक्रेनने नाटो (NATO) मध्ये सामील होण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. याला रशियाचा विरोध केला होता.

युक्रेन मध्ये २०१० साली विक्टर यानुकोविच हे राष्ट्रपती झाले. असं सांगण्यात येतं की, विक्टर यानुकोविच हे अगोदर रशियाचे समर्थक होते.

२०१३ मध्ये विक्टर यानुकोविच युरोपियन युनियन सोबत करार करणार होते. त्यातून युक्रेनला १५ अरब डॉलरचे आर्थिक पॅकेज मिळणार होते. मात्र याला युक्रेनमधल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवत रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे विक्टर यानुकोविच यांना करारातून माघार घ्यावी लागली होती. तसंच राष्ट्रपतींना देश सोडून जावं लागलं होतं.

२२ फेब्रुवारी २०१४ मध्ये विक्टर यानुकोविच यांनी युक्रेन सोडलं. युक्रेनमध्ये युरोपियन युनियनचे समर्थक सत्तेवर आल्यानंतर रशियाने क्रिमियावर आक्रमण केलं. २७ फेब्रुवारी २०१४ रोजी, सैन्याचा गणवेश घातलेल्या बंदूकधाऱ्यांनी क्रिमिया सरकारवर हल्ला केला. त्यांना कुठलाही विरोध झाला नाही. तसेच रशियाने ते आपले सैनिक नसल्याचे सांगितले होते.

क्रिमिया आपल्या ताब्यात घेतल्यानंतर १६ मार्च २०१४ रोजी तेथे सार्वमत घेण्यात आले होते. त्यातील ९७ टक्के मत आपल्या बाजूला असल्याचा दावा रशियाने केला होता. त्यानंतर रशियाने क्रिमिया हा भाग आपला असल्याचे जगाला सांगितले.

क्रिमियावर केलेल्या हल्ल्यानंतर रशियावरही अनेक निर्बंध लादण्यात आले होते. पण पुतिन म्हणाले होते की, क्रिमियामध्ये रशियाचा कोणताही हस्तक्षेप झाला नाही कारण आता इतिहासात कधी गोळी झाडून कुणाला ठार मारल्याशिवाय आजवर हस्तक्षेप करता आला नाही. इथे तर एकही गोळी चालविण्यात आली नाही.

तसेच २००८ मध्ये रशियाने जॉर्जिया सुद्धा अशाच प्रकारे गिळंकृत केला होता.

आता जागतिक संघटना रशिया विरोधात उभे राहत असल्याचे चित्र आहे. मात्र मागच्या वेळीच रशियाला आवर घातला गेला असता, तर कदाचित आजची परिस्थिती वेगळी राहिली असती.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.