बेळगावात पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय भाजपच्या पथ्यावर पडला.

बेळगाव म्हंटल की, सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो तो सीमाप्रश्न. अन सीमाप्रश्नाचे नाव घेतल कि आठवण येते ती १०७ हुतात्मांची आठवण येते. सलग ६० वर्ष बेळगाव आणि सीमाप्रश्न हा संपूर्ण देशात चर्चेत आहे.

आज बेळगाव चर्चेत आहे ते महापालिका निवडणुकीच्या निकालामुळे. 

तर राजकीय पटलावर दीर्घकाळ परिणाम करणारा बेळगाव महापालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. या निकालात भाजपनं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं. एकहाती सत्ता काबिज करत बेळगाव महापालिकेवर कमळ फुलवलं.

भाजपनं महाराष्ट्र एकीकरण समितीचा धुव्वा उडवत सत्ता काबीज केली आहे. या निवडणुकीत भाजपनं ३५, काँग्रेसनं १०, अपक्ष ८, महाराष्ट्र एकीकरण समिती ४ आणि एम आय एम १ असे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपाला जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल देत सत्ता सोपवली आहे.

पण आजच हे यश मिळवण्यासाठी भाजपला स्थानिक पातळीवर  असणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीचं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी जंगजंग पछाडावं लागलं होत. 

पार्श्वभूमी 

याआधी बेळगाव महापालिका निवडणूक ही कायम भाषिक अस्मितेच्या मुद्यावर लढवली गेली. बेळगाव महापालिकेची स्थापना १९७६ साली झाली. पण तब्बल ८ वर्ष इथलं कामकाज प्रशासकाने सांभाळलं. पुढे १९८४ पासून इथं निवडणूक लढवली गेली. तेव्हापासून चार वेळेचा अपवाद सोडला तर बेळगाव महापालिका ही कायम मराठी भाषिकांच्या हातात राहिली आहे.

या निकालाआधी मराठी भाषिकांच्या मुद्द्यावर निवडणूक लढविणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीचे ३२ सदस्य आधीच्या सभागृहात होते. कन्नड उर्दू गटाचे ३६ सदस्य होते.

महापालिका निवडणूक चिन्हांवर का लढवली ? 

महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रचार हा कायमच स्थानिक पातळीवरील मुद्द्यांवर होत असतो. आपण देखील रस्ते, पाणी, वीज, कचरा या अशांच मुद्द्यांवर आजपर्यंत निवडणूका झालेल्या बघितल्या. पण बेळगावात कायम कन्नड उर्दू गटाविरुद्ध मराठी अशीच लढ़त व्हायची.

पण भाजपने पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्धार केलं होता कारण मराठी भाषिकांच वाढत प्राबल्य…

खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे बेळगाव लोकसभेची पोटनिवडणूक लागली होती. यात अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी या ४,३६,८६८ इतक्या मतांनी निवडून आल्या. पण या निवडणुकीत लक्षवेधी मतं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळके यांना पडली. शेळके यांना १,२४,६४८ इतकी मतं पडली. 

बेळगावातला मराठी भाषिक हा कडव्या हिंदुत्वासाठी झगडणारा वर्ग म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रात समावेश व्हावा म्हणून सीमाभागातील लोक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करत असतात. आणि त्यांनाच शह बसावा म्हणून कदाचित,

यावेळी भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आदेश दिला की, यावेळी पक्षाच्या चिन्हावर निवडणूका लढवा.

हैद्राबादच्या महानगरपालिका निवडणुकीवेळी देखील अमित शाह यांनी अशीच आक्रमक भूमिका घेतली होती व त्याचा तिथे फायदा होताना दिसला. 

त्यामुळे भाजपने बेळगाव महानगरपालिका निवडणूकीमध्ये भाजपचे कर्नाटक प्रदेश अध्यक्ष नालिनकुमार कटील, मंत्री ईश्वरप्पा, मंत्री गोविंद करजोळ यांना बेळगावाच्या प्रचारात उतरायला सांगितलं.

झालं…भाजपने तयारी सुरु केली नंतर काँग्रेसनेही महापालिका निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.

यात भाजपने सर्व ५८ जागांवर उमेदवार उभे केले. तर कॉंग्रेस ४९, आम आदमी पार्टी २४, एमआयएम ६, शिवसेना ४ जनता दल सेक्युलर १२ आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने २३ जागावर आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते.

पण बेळगावात कमळ फुललं कसं ? हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावर.. 

कर्नाटक मंत्रिमंडळातील चार मंत्री बेळगाव जिल्ह्यातील आहेत. विधानपरिषद सदस्य, खासदार अशी तगडी फळी बेळगावात आहे. आजवर हिंदुत्वाच्या मुद्यावर इथला मराठी वर्ग पण भाजपला मतदान करत आला आहे. एकुणच मराठी मताचं धृवीकरण, जातीचं समीकरण या मुद्यांमुळे भाजपला ही निवडणूक जिंकणं सोप्प झालं.

आणि आज निकाल तुमच्यासमोर आहे. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.