खरंचं अपना भिडू जग्गू दादा सोनी चॅनेलचा मालक आहे का?

आता जमाना नेटफ्लिक्स अँड चिल आहे. पण एक काळ होता जेव्हा आपल्या घरातल्या ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर फक्त दूरदर्शन लागायचा. त्यावर लागणाऱ्या महाभारत रामायण सिरीयल वेड लावलं.  चित्रहार,छायागीत, हम लोग वगैरे सिरीयल, भारताचे क्रिकेट सामने घरबसल्या टीव्हीवर दिसू लागले.

बघता बघता नव्वदचं  उजाडलं. डॉ.मनमोहन सिंग यांनी जागतिकीकरण लागू केलं आणि देश ब्लॅक अँड व्हाईटचा कलर झाला. इतकंच नाही तर दूरदर्शनबरोबर काही खाजगी चॅनेल देखील दिसू लागले. यात प्रमुख  झी आणि सोनी.

सुरवातीला जीनी, डेनिस वगैरे इंग्लिश सिरीयलच हिंदी डबिंग करून भारतात एंट्री केलेल्या सोनीने कौन बनेगा करोडपती, सीआयडी, इंडियन आयडॉल, बिग बॉस अशा इतिहास घडवलेल्या शोज बनवून भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये क्रांती घडवली. आज इतक्या वर्षांनंतरही सोनी भारतातल्या आघाडीच्या टीव्ही चॅनेल पैकी आहे.

पण या चॅनेल बद्दल आपण नेहमी एक गोष्ट ऐकतो कि सोनी चा मालक आपला जग्गू दादा आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी आपल्या हिरोगिरी मधून रिटायर झालेला जॅकी श्रॉफ खरंच सोनी चॅनेलचा मालक आहे का हा प्रश्न अनेकांनी भिडू ला विचारला. त्या साठी आधी सोनीचा इतिहास बघायला पाहिजे.

आपल्या सगळ्यांना माहित आहे सोनी हि जपानची जगभरात गाजलेली इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे.    टेक्निकली सगळ्यात बेस्ट आयटम हा सोनी कंपनीचा असतो. गणपती उत्सवात किंवा घरात वाजवल्या जाणाऱ्या साउंड सिस्टीममध्ये सोनी कंपनी हि टॉपला असते. २०१७ च्या ग्लोबल फॉर्च्युन लिस्टमध्ये १०५ वा क्रमांक या कंपनीला मिळाला होता. सोनी मोबाईल, सोनी पिक्चर्स, सोनी फायनान्स सर्व्हिसेस अशा अनेक कॅटेगिरीमध्ये सोनी कंपनी विभागली गेली आहे.

मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा भारत सरकारने खुले आर्थिक धोरण स्वीकारले तेव्हा अनेक टीव्ही चॅनेल भारतात येण्यासाठी प्रयत्नशील होते. जपानच्या सोनीने मात्र इथे येण्यापूर्वी भारतात जम बसवायसाठी इथल्या एन्टरटेनमेन्ट इंडस्ट्रीचा अभ्यास असणाऱ्या कंपनीशी टायप करायचं ठरवलं.

हि कंपनी होती ऍटलास इक्विफिन. या कंपनीचे तीन मालक होते. जयकिशन कुकुभाई श्रॉफ उर्फ आपला जॅकी, सुदेश ऐय्यर, रमेश मारू. स्टाईलिश जॅकी दादा तेव्हा  इंडस्ट्रीचा सुपरस्टार होता. लॉन्ग टर्मचा विचार करून त्याला आपले पैसे अशा कुठल्या तरी कंपनीत गुंतवायचे होते. जॅकीची बायको आयेशाने पुढाकार घेतला आणि सोनी बरोबर त्यांचा करार झाला. ज्यावेळी सोनी कंपनी भारतात लॉन्चही झाली नव्हती तेव्हा जॅकी श्रॉफ आणि त्याच्या पत्नीने १०% SHARES या कंपनीत गुंतवले होते.

सोनी लॉन्च करण्यापासून ते या चॅनेलला भारतात फेमस करण्यात जॅकी श्रॉफ भिडूचा मोठा वाटा आहे.

रिटायरमेंट प्लॅन म्हणून भिडूने यात पैसे गुंतवले आणि बघता बघता कंपनी मोठी होत गेली. आयेशा श्रॉफने या चॅनेलसाठी विशेष मेहनत घेतली होती असं म्हणतात. जवळपास १५ वर्षे जॅकी श्रॉफ आणि त्याची बायको सोनी कंपनीच्या मालकांमध्ये होते.

मात्र जस जसे चॅनेल मोठे झाले तसे शेअर होल्डर्समधील वाद वाढत गेले. ऍटलासमधल्या भागधारकांचं देखील एकमेक्नाशी पटायचं बंद झालं. सोनी एन्टरटेनमेन्ट टेलिव्हिजन उर्फ सेटने अनेक चॅनल लॉन्च केले होते, अब्जावधींची उलाढाल होत होती. जपानच्या कंपनीला देखील हे भारतीय मालक जड वाटू लागले होते.

अखेर साधारण २०१२ सालच्या दरम्यान जग्गू दादा करोडोंचे शेअर्स विकून सोनी मधून बाहेर पडला.

आज भारतीय फिल्म इंडस्ट्रीमध्ये अनेक हिरो आहेत जे आपल्या वयाच्या प्राईम टाइममध्ये बक्कळ पैसे कमावतात मात्र रिटायरमेंट नंतर आपलं चैनीतलं आयुष्य आपला बडेजावपण कसा सांभाळायचा हे त्यांना देखील माहित नसतं. मावशीचा लाडका भिडू जग्गू मात्र या सगळ्यात शाना कबुतर निघाला. म्हणूनच आज तो सोनीचा मालक नाही तरी देखील चर्चा होत असतात.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.