देशाचे वांदे होऊ नयेत म्हणून पाकिस्ताननं, अमेरिका आणि चीन या दोन्ही दगडांवर पाय ठेवलाय

अगदी काही दिवसांपूर्वी अमेरिकेने पाकिस्तानला त्यांच्या लढाऊ विमानसाठी भरीव मदत केली होती पण याचा काही फायदा झालेला दिसत नाहीये. कारण पाकिस्तानचे पंतप्रधान आता दोन दिवसाच्या चीन दौऱ्यावर ती आलेले आहेत. पाकिस्तानमध्ये राजकीय आघाडीवर गोंधळ उडालेला असताना तो सोडून शेहबाझ शरीफ या २ दिवसीय दौऱ्यावर आलेत.

राजकीय गोंधळाच्या परिस्थिती त्यात महत्त्वाकांक्षी लष्करी जनरल अशी परिस्थिती असलेल्या देशांतील राजकीय नेते क्वचितच परदेश दौऱ्यावर जातात. आणि पाकिस्तान पंतप्रधान यांनी हा दौरा केलाय म्हणजे त्याला तितकं  महत्वाचं कारणसुद्धा असणार आहे.

शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनचे अध्यक्ष म्हणून विराजमान झाल्यानंतर प्रथमच कोण्या देशाच्या नेत्याने चीनचा दौरा केलेला आहे.

पंतप्रधान झाल्यानंतर शरीफ यांची ही पहिलीच चीन भेट आहे. यासोबतच त्यांचे सरकार आणि पाकिस्तानी लष्कर अमेरिकेशी संबंध सुधारण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहेत. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या काळात मोठ्या प्रमाणात अमेरिकाविरोधी प्रचार झाला आणि इम्रान यांनी जो बायडेन प्रशासनाला त्यांच्या खाली खेचण्यासाठी जबाबदार धरल्याने त्यांच्या या भूमिकेचा फटका अमेरिका पाकिस्तानच्या संबंधांना बसला आहे.

रशिया युक्रेन युद्धानंतर जगातील अनेक देशांचे  संदर्भ बदललेले आहेत.

पाकिस्तानला अमेरिका आणि चीन या दोघांच्या दरम्यान मैत्री जोपासताना तारेवरची कसरत करावी लागते आहे. त्याच कारण अमेरिका पाकिस्तानला फार पूर्वीपासून शस्त्रास्त्रांचा पुरवठा करते.  अफगाणिस्तान युद्ध असो किंवा भारत विरोध भूमिका असो ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानवर टीका केली होती. त्यानंतर पाकिस्तान चीनच्या जवळ जात राहिला आणि चीनने सुद्धा पाकिस्तानला अमेरिकेची गरज भासू दिली नाही.

अमेरिकेत अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात रशिया नंतर चीन त्यांचा सर्वात मोठा शत्रू आणि स्पर्धक असल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानला चीन कडून आर्थिक मदत होण्याची मोठी अपेक्षा आहे. China-Pakistan Economic Corridor (CPEC) यामध्ये पाकिस्तान दिसतो खरा परंतु पण हा प्रोजेक्ट चीनच्या जास्त फायद्याचा आहे. पाकिस्तानचे जे काही उद्देश आहेत ते यातून पूर्ण होत नाहीत हीसुद्धा वस्तुस्थिती आहे.

पाकिस्तान सध्या अभूतपूर्व अशा आर्थिक संकटातून जात आहे आणि अशा वेळेस त्याला चीनकडून बेलआऊट पॅकेज मिळेल अशी मोठी अपेक्षा आहे. ज्यामुळे पाकिस्तानला घेतलेल्या कर्जाची परतफेड करणं आणि त्यांची आयातीची गरज पूर्ण करणं शक्य होणार आहे.

चीनला सुद्धा पाकिस्तान मधील विद्यमान सरकार उलथवून टाकण्यात कोणतेही स्वारस्य नाही. उलट चीनला असं वाटतं की, शरीफ हे पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्याने IMF कडून कर्ज परतफेड करण्यासाठी बेल आउट पॅकेज मिळाले आहे.

China-Pakistan Economic Corridor (CPEC) हा प्रकल्प पूर्णत्वास गेला तो विद्यमान पंतप्रधान यांचे भाऊ नवाज शरीफ यांच्या कार्यकाळात २०१३ ते २०१६ दरम्यान. $ 42Bn या प्रकल्पाची किंमत आता $ 67Bn इतकी झाली आहे.

चीनमध्ये सुद्धा सध्या आर्थिक आघाडीवर ती सर्व काही आलबेल नाही.

चीनची अर्थव्यवस्था ही निर्यातीवर अवलंबून आहे. सध्या अमेरिका आणि युरोप या दोन्ही ठिकाणी मंदी, महागाई यांचा विळखा वाढल्यानं चीनच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा याचा परिणाम झाला आहे. पर्यायाने चीन जवळ त्यांचे जे काही प्रोजेक्टस आहे त्यांच्यासाठी फार कमी निधी शिल्लक राहता दिसतोय.

श्रीलंके मध्ये मोठ्या प्रमाणात चीनने गुंतवणूक केलेली असूनही श्रीलंकेची आर्थिक परिस्थितीआणीबाणी सदृश्य होऊनसुद्धा चीनला त्यांना मदत करता आली नाही. नेपाळच्या बाबतीतीसुद्धा अशीच परिस्थिती होऊ शकते.

सध्याच्या अवघड आर्थिक परिस्थितीमध्ये पाकिस्तानला चीनच्या या CPEC प्रोजेक्टची नितांत गरज आहे आणि या प्रोजेक्टच्या रूपाने येणाऱ्या गुंतवणुकीची सुद्धा. चीनने केलेल्या करारानुसार एचीने पाकिस्तानमध्ये बंदरे विकसित करणं अपेक्षित होतं. यासोबतच वेगवेगळ्या पायाभूत सुविधांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे अपेक्षित होते. वीज आणि पाणी यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांमध्येसुद्धा गुंतवणुकीचा ओघ आटलेला दिसतोय. याची पाकिस्तानला मोठी चिंता.

पाकिस्तान पासून अमेरिका दुरावलेला आहे आणि चीन कडून मदत मिळण्याची अपेक्षा दुरावत चाललेली आहे. या पार्श्वभूमीवरती विद्यमान पाकिस्तान पंतप्रधानांनी चीनचा हा दौरा काढलेला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांच्यासमोर सध्या अमेरिकेचे मनधरणी करणे, चीनला परत एकदा पाकिस्तानमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित करणं किंवा गळ घालणं, आणि जो काही संभाव्य लष्करी उठाव किंवा लष्कराचा हस्तक्षेप पाकिस्तानी सरकारमध्ये वाढलेला आहे. त्याच्यावरती नियंत्रण मिळवणे या सर्वच गोष्टी एकाच वेळेस कराव्या लागणार आहेत. अन्यथा पाकिस्तान श्रीलंकेच्या मार्गावर अगदी पद्धतशीरपणे जाईल आणि त्यांच्यासमोर सध्या दुसरा कोणताच पर्याय नाही आहे.

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.