एका डाकूला माझ्या बॉलिंगची किंमत कळली पण निवड समिती मला ओळखू शकली नाही.

एकेकाळी भारताकडे इतका जबरदस्त स्पिनर्सचा ताफा होता कि भले भले प्रतिस्पर्धी भारताच्या नादी लागत नसायचे. पण बऱ्याच जणांचं स्वप्न असतं कि देशाचं प्रतिनिधित्व करून मॅच जिंकून द्यावी. देशाचं नाव जगभरात पोहचावं पण असं काही घडणं काहींच्या नशिबात नसतं. यातले सगळ्यात दुर्दैवी खेळाडू म्हणजे राजिंदर गोयल. हे नाव पण आपल्याला माहिती नसेल पण या खेळाडूने आपल्या बॉलिंगच्या जोरावर संघात स्थान मिळवायचा प्रयत्न केला खरा पण संधी मिळाली नाही.

माजी डावखुरा फिरकी गोलंदाज राजिंदर गोयल हे स्पिन बॉलिंगमधले बादशहा होते. ते एकमेव क्रिकेटर असे होते कि रणजी करंडक स्पर्धेत सगळ्यात जास्त विकेट घेण्याचा त्यांचा विक्रम आहे. ६३७ रणजी विकेट आणि रणजी क्रिकेटच्या प्रत्येक सिजनला २५ विकेट घेण्याचा पराक्रम त्यांनी तब्बल १५ वेळेस केला होता.

ज्यावेळी टीममध्ये बिशन सिंग बेदी, दिलीप दोषी यांसारखे तगडे खेळाडू होते तेव्हा राजिंदर गोयल यांना संधी मिळाली खरी पण ऐन वेळी त्यांना राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना परत कधीच भारताकडून खेळायचं भाग्य मिळालं नाही. याचा पूर्ण दोष त्यांनी त्यावेळच्या निवड समितीवर थोपवला होता.

ज्यावेळी त्यांनी ६०० विकेट पूर्ण केल्या त्यावेळी त्यांनी खुलासा केला होता कि भारतीय निवड समितीला माझा खेळ ओळखता आला नाही, त्यांच्यामुळे मला भारताकडून खेळता आलं नाही पण एका दरोडेखोराने माझ्या खेळाचं कौतुक केलं यातच मी समाधानी आहे. मग नक्की काय प्रकरण आहे हे डाकूचं तर जाणून घेऊया.

एका दरोडेखोराने एके दिवशी राजिंदर गोयल यांच्या घरी एक पत्र पाठवलं. त्यावेळी राजिंदर गोयल हे क्रिकेटच्या मॅचमध्ये व्यस्त असल्याने घरी नव्हते. या पत्रामुळे राजिंदर सिंग यांच्या घरचे प्रचंड घाबरले. या पत्राचा मजकूर पुढीलप्रमाणे होता.

” प्रिय राजिंदर आपको रणजी ट्रॉफी में ६०० से अधिक विकेट लेने कि ख़ुशी में बधाई स्वीकृत हो.

हम आपके बहुत प्रशंसक होकर ये पत्र व्यवहार कर रहे हे.

और भविष्य कि कामना करते हे कि ईश्वर आपको दिन प्रति दिन सफलता दिलवाये…..

हे पत्र ८ एप्रिल १९८५ रोजी मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेरच्या मध्यवर्ती कारागृहातून डाकू भुरासिंग यादव यांच्याकडून राजीव गोयल यांना पाठवण्यात आले होते.

या दरोडेखोराच्या अभिनंदनपर पत्राने राजिंदर गोयल यांच्या घरच्यांची झोप उडाली होती. गोयल सांगतात कि, त्यावेळी कोणतीही कुरियर सेवा नव्हती आणि मी सामना खेळण्यासाठी दिल्लीला गेलो होतो आणि हे पत्र पोस्टमध्ये मिळाल्यावर माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य घाबरले होते.

आता त्या दरोडेखोराला घराचा पत्ता माहिती झाला होता आणि तो आपल्याकडून पैशाची मागणी करेल या विचाराने गोयल यांचे कुटुंब चिंतेत होते. राजीव गोयल यांना त्या दरोडेखोराचं पत्र मिळालं तेव्हा काळजी वाटण्याऐवजी त्यांना आनंद झाला. त्यांनी त्यांच्या जवळच्या मित्रांना आणि चाहत्यांना त्या दरोडेखोराचं हे पत्र दाखवलं.

राजिंदर गोयल यांनी त्या दरोडेखोराचे आभार मानले आणि चांगलं माणूस म्हणून जगायला सुरवात कर असंही सांगितलं. आणि ते सांगतात कि हाच दरोडेखोर मी ३-४ वर्षांपूर्वी टीव्हीवर पाहिला होता. आता तो जिवंत आहे कि नाही याबद्दल मला माहिती नाही.

तब्बल ३० वर्षांपासून हे पत्र त्यांनी आपल्या संग्रही ठेवले होते आणि ते संघात सिलेक्शन न झाल्याचा राग या पत्रातून निवड समितीवर विनोदी स्वरूपात काढायचे आणि म्हणायचे कि,

एका डाकूला माझ्या बॉलिंगची किंमत कळली पण सिलेक्टर्स लोकांना अजून मला ओळखता आलं नाही.

स्थानिक क्रिकेट आणि रणजी क्रिकेटमध्ये इतकी उत्तम बॉलिंग करून , अनेक नवनवे विक्रम गाठूनसुद्धा टीममध्ये जागा मिळाली नाही यावरून निवडसमितीला लोकांनी चांगलंच धारेवर धरलं होतं. पण राजिंदर गोयल यांच्या नशिबातच नव्हतं भारताकडून क्रिकेट खेळायचं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.