लोकशाही पद्धतीने होणाऱ्या युवक काँग्रेसच्या निवडणुकीत सर्वसामान्य घरातील मुलं उतरली आहेत

एखादा पक्ष कितपत मजबूत आहे तो किती खोल तळागाळात रुजलाय हे त्या पक्षाच्या युवा संघटनेवरून कळतं. आंदोलने असोत, रस्त्यावरची लढाई असो किंवा निवडणुकीचा प्रचार. प्रत्येक ठिकाणी हेच तरुण कार्यकर्ते आघाडीवर असतात. या तरुण कार्यकर्त्यांच्या जीवावर पक्ष उभा असतो हे कोणी नाकारू शकणार नाही.

१३६ वर्षांचा इतिहास असणाऱ्या काँग्रेस बद्दल सुद्धा हे खरं आहे. आजवर काँग्रेसने जितकी आंदोलने केली, निवडणुका जिंकल्या, ब्रिटिश सत्तेशी लढा दिला तो युवा कार्यकर्त्यांच्या जोरावरच. त्यांची युवक काँग्रेस ही संघटना कार्यकर्त्यांचा कारखाना मानली जाते. शरद पवारांपासून ते पी चिदंबरम, ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत देशातले कित्येक दिग्गज नेते याच संघटनेमधून तयार झाले.

आजही युवक काँग्रेस संघटना पक्षाचा आवाज बनून राहिली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी देखील युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आमदारकी जिंकून आपली ताकद दाखवून दिली होती.

काँग्रेस हा कितीही लोकशाहीवादी पक्ष असला तरी त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप होत आलाय. अगदी दिल्लीपासून गल्ली पर्यंत अनेक प्रस्थापित नेते आपल्या पोराबाळांना संधी देत असतात. कमी अधिक प्रमाणात हे चित्र सर्वच पक्षात दिसून येतं. मात्र काँग्रेसचं वेगळेपण हे की त्यांच्या या युवा संघटनेमध्ये लोकशाही पद्धतीने निवडणुका होतात. नेत्यांच्या मुलांबरोबरच सर्वसामान्य कार्यकर्ते देखील यात भाग घेतात.

विशेष म्हणजे ज्या राहुल गांधींना घराणेशाहीचे सर्वात मोठे प्रोडक्ट म्हणून ओळखले जाते त्या राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून या निवडणुका घेण्यास सुरुवात झाली.

त्यांच्याच प्रोत्साहनामुळे अनेक सर्वसामान्य तरुण तरुणी या निवडणुकीत भाग घेतात. युवक काँग्रेसचे सध्याचे अध्यक्ष बीव्ही श्रीनिवासदेखील याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. राजकीय पार्श्वभूमी नसलेला मध्यमवर्गीय तरुण राष्ट्रीय स्तरावरचा नेता बनतो याला पक्षातील लोकशाही जबाबदार आहे असं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.

महाराष्ट्रात देखील या निवडणुका होतात. सध्या १२ डिसेंबर २०२१ पर्यंत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षापासून ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षापर्यंत निवडणूक होत आहे.

हा निवडणुकीचा कार्यक्रम २७ ऑक्टोबर पासून सुरू झाला आहे. अर्ज भरण्यासाठी १ नोव्हेंबरची डेडलाईन देण्यात आली होती. उमेदवारी अर्ज प्रक्रियेसाठी सदस्य २७ ते ३५ वयोगटात असणे आवश्यक असून तो भारताचा नागरिक असला पाहिजे. तसेच इतर कोणत्याही राजकीय संघटनेचा सदस्य असता कामा नये या अटी घालण्यात आल्या होत्या.

युवक काँग्रेसची ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या धर्तीवर घेण्यात येते.

विधानसभा मतदारसंघासाठी २४ सदस्यांची कमिटी, जिल्हा कार्यकारिणीसाठी २४, राज्य कमिटीसाठी ६ तर राज्य सरचिटणीस कमिटीसाठी २८ सदस्य यांच्यासाठी निवडणुक घेतली जाते. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी फक्त काँग्रेस सदस्यच नाही तर सर्वसामान्य व्यक्ती देखील मतदान करू शकतात.

प्रथमच या मतदानासाठी संघटनेने विथ आयवायसी नावाचे अँड्रॉइड ऍप डेव्हलप करण्यात आले आहे. या ऍप मध्ये तुम्ही आपले नाव रजिस्टर करून चार जागांसाठी मतदान करू शकता. १२ नोव्हेंबर ते १२ डिसेंबरदरम्यान या ऍपवर सभासद नोंदणी सुरु होती.

एका सभासदाला चार मतांचा अधिकार आहे. पहिलं मत प्रदेशाध्यक्ष पदासाठी असेल त्यानंतर प्रदेश सरचिटणीसपदासाठी असेल तर तिसरं मत जिल्हाध्यक्ष पदासाठी आणि ४ थ मत विधानसभा अध्यक्ष पदासाठी अशी चार मते देण्याचा अधिकार राहील यासाठी १८ ते ३५ वयोगटाची मर्यादा आहे.

अध्यक्षपदासाठी २३ नामांकन असून, यात नितीन राऊत यांचे चिरंजीव कुणाल राऊत यांच्या सोबतच सातारा जिल्ह्यातील शिवराज मोरे, तन्वीर सिद्दीकी विद्रोही अशा राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या कार्यकर्त्यांनी देखील आपला अर्ज दाखल केला आहे. विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी अर्ज दाखल केला होता मात्र तो बाद ठरवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. 

आज काँग्रेस आपल्या इतिहासातील सर्वात संकटमय कालखंडातून जात आहे. पक्षाला पूर्णवेळचा अध्यक्ष नाही. त्याच्यासाठी होणाऱ्या निवडणुका कोरोनामुळे प्रलंबित राहिल्या आहेत. मात्र युवक संघटनेच्या निवडणुका लोकशाही पद्धतीने घेऊन काँग्रेस आपली संघटना मजबूत करण्याच्या मागे लागली आहे हे नक्की. घराणेशाहीचे आरोप होत असलेल्या या पक्षात या युवक काँग्रेसच्या निवडणुका कौतुकास्पद पाऊल मानलं जात आहे.

हे हि वाच भिडू :

English Summary: No matter how democratic the Congress is, it has been accused of dynasticism. Even from Delhi to the streets, many established leaders are giving opportunities to their children. More or less this picture is seen in all parties. But the difference of Congress is that elections are held in a democratic manner in their youth organization. Along with the leaders’ children, ordinary activists also take part in it.

 

Web Title: in the democratically held youth congress elections youth from ordinary households are fighting elections

Leave A Reply

Your email address will not be published.