उत्तराखंडमध्ये संध्याकाळ झाली कि, कार्यकर्ते प्रचार सोडून पळून का जातात?

देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका आहेत. ज्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यात. अश्यात मोठं-मोठ्या नेतेमंडळींपासून उमेदवार ते कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येक जण प्रचाराला लागलाय. उमेदवारांची कार्यालय खचाखच भरलेली आहेत, पक्षाचे झेंडे, पॅम्प्लेट सगळ्यांचीच जोरदार तयारी सुरुये. आपला उमेदवार निवडून यावा म्हणून सगळेच कार्यकर्ते कंबर कसून कामाला लागलेत.

नेतेमंडळी सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांची सगळी सोय करतायेत. अगदी खाण्या पिण्यापासून, राहण्यापर्यंत, कामाचा नुसता पिट्ट्या पाडलाय. रात्रंदिवस हे कार्यकर्त्ये प्रचार करतायेत. पण भिडू हे सगळं चित्र युपी, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधलं. म्हणजे उत्तराखंड सोडलं तर बाकीच्या राज्यांमध्ये हीच परिस्थिती आहे.

आता तुम्ही म्हणाल का उत्तराखंडमध्ये काय प्रचार होत नाही का? होतो ना, पण फक्त दिवसाचं कारण संध्याकाळ झाली कि, कार्यकर्त्ये प्रचार सोडून पळ काढतात, थेट आपल्या घरी.

का?… तसं पाहिलं तर कारण फार स्पष्ट आहे. कारण उत्तराखंड म्हंटल कि डोंगराळ भाग. उत्तराखंडच्या एकूण भूभागापैकी ७१.०५ टक्के वनक्षेत्र आहे.  त्यामुळं या भागात बिबट्या, वाघ, बिबट्या, हत्ती, अस्वल यांचा वावर असतोच. या प्राण्यांच्या हल्ल्यांच्या कित्येक घटना सतत समोर येत असतात, त्यामुळे कार्यकर्तेसुद्धा या प्राण्यांच्या संध्याकाळ झाली कि, घरी पळून जातात. 

पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे बिबट्या आणि वाघ लोकवस्तीच्या परिसरात घिरट्या घालतात. पौरी, अल्मोडा, बागेश्वर, चंपावत, रुद्रप्रयाग, उत्तरकाशी, चमोली, पिथौरागढ, नैनिताल जिल्ह्यांमधल्या  दुर्गम भागात हिंसक प्राण्यांच्या दहशतीमुळे सूर्य मावळला कि घराबाहेर पडणे कठीण होत. संध्याकाळच्या वेळी गावात स्मशान शांतता असते.

काही दिवसांपूर्वीच चंपावत जिल्हा मुख्यालयापासून १० किमी अंतरावर असलेल्या चंपावत रेंजमधील रिखवाडी जंगलात एक महिला चारा आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी बिबट्याने २६ वर्षीय चंद्रा नावाच्या महिलेला जंगलात ओढून नेले आणि तिची हत्या केली. अश्या कित्येक घटना आहेत.

उत्तराखंडमध्ये ८० टक्क्यांहून अधिक वन्यजीवांचे हल्ले बिबट्याचे आहेत. यासोबतच चमोली, रुद्रप्रयाग, उत्तरकाशी, पिथौरागढ इथल्या अनेक भागात अस्वलांचे सुद्धा हल्ले वाढतायेत. हे वन्यजीव फक्त आक्रमणचं करत नाहीत तर शेती सुद्धा नष्ट करतायेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक शेतीकडे पाठ फिरवत आहेत. वन्यप्राण्यांच्या भीतीने काही गावांमधून स्थलांतराचा वेग वाढलाय.

काही डोंगराळ भागात हत्तीही उमेदवारांना सुद्धा पळवलेलं पाहायला मिळालंय. काही दिवसांपूर्वीच कालाधुंगीचे बसपाचे उमेदवार सुंदरलाल आर्य हे डोअर-टु-डोअर प्रचार करत होते. त्यांचं निवडणूक चिन्ह सुद्धा हत्ती आहे. आपल्या या निवडणूक चिन्हासोबत सुंदरलाल कोटबागच्या दिशेने मत मागण्यासाठी गेले होते, तेव्हा हत्तींचा कळप रस्त्यावरच उभा होता.

आता प्रचाराच्या त्या गाड्या आणि त्यात हत्तीचं चित्र म्हंटल्यावर या हत्तींचा मूड बिघडला. नेता आणि त्यांचे समर्थक गाडी वळवून परतल्यावर हत्ती ताफ्यामागे धावू लागले. मात्र, थोड्या वेळाने ते जंगलाच्या दिशेने निघाले. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे, जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

आता आधीच वाढत्या कोरोना प्रकरणामुळे निर्बंध आहेत, त्यात या प्राण्यांच्या भीतीमुळे निवडणूक प्रचारावर परिणाम होतोय. त्यात  नेतेमंडळींच्या डोअर-टू डोअर कॅम्पेनमुळे सगळंच गणित अवघड होऊन बसलंय. नेतेमंडळींना धावपळ करत आणि अर्ध्यावर प्रचार सोडून फिरावं लागतंय. 

पण महत्वाची गोष्ट या जंगली प्राण्यांच्या हल्ल्याने कित्येक लोकांचे मृत्यू झालेत. मात्र कुठल्याही पक्षाने किंवा नेत्याने हा मुद्दा बनवला नाही. किंवा आजपर्यंत त्यावर ठोस उपाय शोधला नाहीये. इथल्या बहुतेक लोकांची सुद्धा हीच मागणी आहे कि, नेतेमंडळींनी या प्राण्यांच्या हल्ल्यांवर काहीतरी उपाय शोधून काढायला हवा, आम्ही बऱ्याचदा तशी मागणी सुद्धा करतो पण आश्वासनांशिवाय दुसरं काहीच मिळत नाही. 

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.