चंद्रपूरचं अख्खं घर पृथ्वीने गिळलं नाही तर माणसाने गिळलं म्हणावं लागेल..हे वाचा समजून जाईल

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुसच्या कोळसा खाणीजवळ असलेलं घर अचानक जमिनीत गडप झालं आणि त्या ठिकाणी तब्बल ७०-१०० फूट खोल खड्डा पडला. घर अचानक जमिनीत गायब झाल्यामुळे सगळीकडेच आश्चर्य व्यक्त केलं जात असलं तरीही स्थानिक लोकांसाठी ही आश्चर्याची गोष्ट नाहीय तर चिंतेची गोष्ट आहे. अक्खं घरच पृथ्वीने गिळंगृत केल्यामुळे या परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय.

पण हा प्रकार नक्की काय आहे ? अक्खं घरच कसं काय जमीनीत गाडलं जाऊ शकते ?

चंद्रपूर जिल्ह्यात घुग्गुस शहरातील अमराई वार्डात ही घटना घडलीय. कारण या घुग्गुस शहराला लागूनच कोळसा खान आहे. तसेच घर जमिनीत गेल्याची घटना ज्या वार्डात घडली तो अमराई वार्ड खाणीपासून फक्त २५० ते ३०० मीटर अंतरावर आहे. त्यामुळे खाणीत झालेल्या खोदकामामुळे हा खड्डा पडला आणि त्या खड्ड्यात घर जमिनीत गडप झालं.

अशी माहिती मिळतेय की, ही घटना घडण्याच्या आधी घर हलायला लागलं होतं त्यामुळे संपूर्ण परिवार वेळीच घरातून बाहेर पडला त्यामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. पण या घराच्या जमिनीत गडप होण्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील खाणपट्ट्याच्या समस्या आहेत हे समजून घ्यायलाच हवं.

या समस्यांमागचं सर्वात मोठं कारण म्हणजे विदर्भात असलेल्या कोळसा खाणी.

सर्व कोळसा खाणींपैकी सर्वाधिक कोळसा खाणी एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण २८ कोळसा खाणी आहेत. चंद्रपूर  जिल्ह्यातील भद्रावती, चंद्रपूर आणि राजुरा या भागांमध्ये कोळशाच्या खाणी मोठ्या संख्येने आहेत. तर यासोबतच लाइमस्टोनच्या खाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत.

या सगळ्या खाणपट्ट्यांमध्ये भद्रावती शहराजवळची वर्धा कोल व्हॅली सगळ्यात मोठी आहे. ही कोल व्हॅली चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वर्धा नदीमध्ये आहे. ही कोल व्हॅली वर्धा नदीच्या पात्रात जवळपास ५० किमी लांब पसरली आहे. त्यामुळे चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात वर्धा नदीच्या दोन्ही काठांवर कोळशाच्या मोठं-मोठ्या खाणी आहेत. 

नुकतीच २६ ऑगस्ट रोजी जमिनीमध्ये घर गडप होण्याची घटना याच वर्धा कोल व्हॅलीच्या काठावर असलेल्या घुग्गुस शहरात घडली आहे. 

या घटनेमुळे केवळ वर्धा कोल व्हॅलीतच समस्या आहेत असं नाही. तर वर्धा कोल व्हॅलीसोबत जवळपास सगळ्याच कोळसा खाणीजवळच्या भागात समस्या आहेत. 

चंद्रपूर, बल्लारशाह, राजुरा, घुग्गुस, भद्रावती, गडचांदूर हे सगळे शहर कोळसा खाणींच्या जवळच आहेत.

हे शहर कोळसा खाणींच्या जवळ वसवण्यात आलेले नाहीत तर या शहरांच्या जवळच कोळशांच्या खाणी तयार करण्यात आलेल्या आहेत ही लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे.

या कोळशाच्या खाणींमध्ये खोदकाम करतांना ३०० ते ५०० मीटरपर्यंत उभं खोल खोदकाम केलं जातं. हे खोदकाम करतांना अनेकदा दारूगोळ्याच्या साहाय्याने ब्लास्ट केले जातात. या ब्लास्ट करण्यामुळे खाणीच्या आजूबाजूच्या जमिनीला धक्के बसतात. अर्थातच त्यामुळे आजूबाजूला असलेल्या गावांमधील घरांना तडे जातात.

यासोबतच खाणीच्या आजूबाजूच्या परिसरातील कोळसा काढण्यासाठी खोल खोदकामाऐवजी भुयार करून खोदकाम केले जाते. त्या भुयारातून कोळसा काढल्यानांतर भुयार बुजवले जावे हा नियम आहे मात्र भुयार बुजवतांना योग्य काळजी घेतली जात नाही.

त्यामुळे जमिनीत खोल खड्डे पडतात. याचप्रकारची घटना काल घुग्गुसमध्ये घडली आहे. 

खाणीतील विस्फोटांमुळे घराला तडे जातात, भूस्खलनामुळे जमिनीत खड्डे पडतात त्यासोबतच हवेतील प्रदूषण, तापमान वाढ आणि भूजलाची समस्या निर्माण झालीय. 

चंद्रपूर जिल्ह्यातील या कोळसा खाणींमुळे खनिजवळच्या सगळ्या शहरामध्ये धुळीचे प्रमाण वाढले आहे. या धुळीमुळे आणि कोळशाच्या उष्ण गुणधर्मामुळे चंद्रपूर शहराचे तापमान झपाट्याने वाढत आहे. उन्हाळ्यात चंद्रपूर जिल्ह्याचे तापमान ४५-४६ अंश सेल्सिअसवर पोहोचते.

चंद्रपूर शहरात असलेल्या औष्णिक वीज प्रकल्पामध्ये जाळल्या जाणाऱ्या कोळशामुळे चंद्रपूर क्षाराचे प्रदूषण प्रचंड वाढलेले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सापडणाऱ्या कोळशात राखेचे प्रमाण जास्त असल्यामुळे प्रदूषणात वाढ होतेय. 

चंद्रपूर जिल्ह्यातील खाणपट्ट्यात राहणाऱ्या लोकांसाठी या विजेची निर्मिती सगळ्यात त्रासदायक आहे.

वाढलेल्या प्रदूषणामुळे चंद्रपूर शहराची गणना जगातील सगळ्यात प्रदूषित शहरांमध्ये केली जातेय. घुग्गुस, चंद्रपूर शहरात हवेत कोळशाच्या धुळीचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये दमा आणि कॅन्सरचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. 

हवेच्या प्रदूषणासोबत खाणीच्या जवळ असलेल्या गावांमध्ये पाण्याचे प्रदूषण सुद्धा होतेय. 

खाणीत होणाऱ्या खोदकामामुळे आजूबाजूच्या जमिनीतील पाण्याचे झरे या खाणींकडे वळतात. त्यामुळे आजूबाजूच्या गावातील पाण्याची पातळी घटते. तसेच खाणींमुळे आजूबाजूच्या परिसरात भूजलात आम्लतेचे प्रमाण वाढत आहे. 

खाणीमध्ये वर्धा नदीच्या पाण्याचा वापर केला जात असल्यामुळे नदीच्या प्रदूषणात सुद्धा वाढ झाली आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक खाणी या जंगलांच्या जवळ आहेत. त्यातील चंद्रपूर शहराजवळच्या खाणी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात येतात. त्यामुळे या खाणींमुळे मोठ्या प्रमाणावर वन्यप्राण्यांचा जीव जातो. तसेच मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होते.

१९७४ पूर्वी देशात असलेल्या असलेल्या कोळसा खाणी खासगी हातात होत्या. त्यांनतर कोळसा खाणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. या राष्ट्रीयीकरणांनंतर भारताच्या पश्चिम भागातील कोळसा खाणींसाठी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड या सरकारी कंपनीची स्थापना झाली. वर्धा कोल व्हॅलीमधील बहुतांश कोळसा खाणी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या मालकीच्या आहेत. 

परंतु १९९१ च्या खाजगीकरणाच्या धोरणामुळे पुन्हा खाजगी कोळसा खाणींची संख्या वाढत आहे. त्यामुळे पर्यावरणाचे, पुनर्वसनाचे प्रश्न आ वासून उभे होत आहेत. 

घुग्गुस मध्ये घडलेली घटना सरकारी कोळसा खाणीच्या जवळची आहे. सरकारी कोळसा खाणीच्या जवळ अशी परिस्थिती आहे तर बाकी कोळसा खाणींच्या जवळ काय परिस्थिती असेल याचे वास्तव दुर्दैवाने अशा घटनांमुळे वारंवार समोर येऊ शकतात.  

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.