पोलीस कोठडीमधला तेलगी प्रत्यक्षात स्वत:च्या घरात मजेत रहात होता.

१५ जानेवारी २००३ रोजी महाराष्ट्र टाइम्समध्ये छापून आलेल्या या बातमीने खळबळ उडाली. बातमी तितकीच सनसनाटी होती. कारण तेलगी काय छोटा आरोपी नव्हता. मुद्रांक घोटाळ्यात त्याच नाव होतच पण अनेक बलाढ्य समजल्या जाणाऱ्या राजकारण्याचा देखील त्यास पाठींबा असल्याचा संशय होता. पोलीस अधिकारी व्यवस्थित तपासाची सुत्र हालवत नाहीत असा जनसामान्यातून आरोप होत होता त्यातच ही बातमी छापली गेल्याने अनेकांची भंबेरी उडाली.

बातमी होती,

पोलीस कोठडीमधला अब्दुल तेलगी प्रत्यक्षात स्वत:च्या घरात मजेत ! 

ही बातमी छापली होती महाराष्ट्र टाईम्सचे खास प्रतिनिधी जयप्रकाश प्रधान यांनी. नेमकी ही बातमी काय होती आणि ती कोणत्या सोर्सच्या आधारावर छापण्यात आली यात कितपत तथ्य होतं याबाबत त्यांनी आपल्या बातमीमागची बातमी या पुस्तकात लिहलं आहे.

या बातमीच्या मागची बातमी सांगण्यापुर्वी ही बातमी नेमकी काय होती तर,

पोलीस कोठडीमधला अब्दुल तेलगी प्रत्यक्षात स्वत:च्या घरी मजेत ! अब्जावधी रुपयांच्या मुद्रांक गैरव्यवहारातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी मुंबई पोलीसांच्या कृपेमुळे पोलीस कोठडीत असतानाही पोलीसांनी सील केलेल्या त्याच्या कफ परेड येथील आलिशान प्लॅटमध्ये राहत होता. या मुद्रांक गैरव्यवहाराची चौकशी करत असलेले कर्नाटकचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आर. श्रीकुमार व महाराष्ट्राच्या चौकशी पथकाचे प्रमुख उपमहानिरीक्षक सुबोध जयस्वाल यांनी जेव्हा प्रत्यक्ष त्याच्या प्लॅटमध्ये हे दृश्य पाहिले तेव्हा त्यांचा विश्वास बसला नाही. यापद्धतीने तेलगी कशाप्रकारे स्वत:च्या घरातच आलिशान आयुष्य जगत होता याची सविस्तर बातमी देण्यात आली होती.

या बातमीचा सुगावा नेमका जयप्रकाश प्रधान यांना कसा लागला ते त्यांनी आपल्या पुस्तकात मांडले आहे. ते सांगतात, आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांचे संबध वरकरणी सौहार्दाचे वाटत असले तरी पडद्यामागे अनेकदा संघर्ष चालू असतो. IPS अधिकारी IAS अधिकाऱ्यांना सरकारी बाबू म्हणून हिणवतात तर IAS अधिकारी IPS अधिकाऱ्यांना गणवेषातील मुजोर समजतात.

पोलीसांचा असाच एक गुप्त अहवाल एका IAS अधिकाऱ्यांना मला दाखवून फोडला होता.

ताज येथील एका पार्टीत आपल्या प्राप्तिकर अधिकारी मित्रासोबत पत्रकार जयप्रकाश प्रधान गेले होते. तेव्हा त्या पार्टीत या उच्चपदस्थ IAS अधिकाऱ्यांसोबत त्यांची भेट झाली. पुर्वीपासून ओळख असल्याने त्या अधिकाऱ्यांनी पत्रकार जयप्रकाश प्रधान यांना दूसऱ्या दिवशी क्रिकेट क्लब ऑफ इंडियात भेटण्यासाठी बोलावले. दूसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेत जयप्रकाश प्रधान त्यांना भेटण्यासाठी गेले. जेवणासाठी ठरलेल्या या भेटीत ते उच्चपदस्थ अधिकारी मात्र एक फाईल घेवून आले होते. ती फाईल पाहून जयप्रकाश प्रधान यांना आश्चर्य वाटलं.

दोघांच जेवण झालं आणि IAS अधिकारी म्हणाले मी तुला आत्ता एक अत्यंत गोपनीय आणि खळबळजनक अहवाल दाखवणार आहे. त्यावर आधारित तू बातमी द्यावीस. मात्र बातमी देताना कमालीची गुप्तता पाळावी लागणार आहे कारण हा अहवाल फक्त चारच लोकांना माहित आहे. पत्रकारांनी कबुल केल्यानंतर IAS अधिकारी म्हणाले अब्दुल तेलगी प्रत्यक्षात पोलीस कोठडीत नव्हताच तर तो आपल्या घरी रहात होता. यावर पत्रकारांना विश्वासच बसला नाही. तेव्हा खात्री करुन देण्यासाठी त्यांनी तो अहवाल पत्रकारांना दाखवला. 

दिनांक ९ जानेवारी रोजी दक्षिण मुंबईतील कफ परेड येथील तेलगीच्या प्लॅटमध्ये कर्नाटकचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आर.श्रीकुमार व महाराष्ट्राच्या चौकशी पथकाचे प्रमुख उपमहानिरिक्षक सुबोध जयस्वाल तेलगी संबधित चौकशी करण्यासाठी पोलीसांनी सील केलेल्या त्याच्या घराची झटती घेण्यासाठी तिथे पोहचले होते.

ते सील केलेल्या त्या प्लॅटवर गेल्यावर त्यांना धक्का बसला कारण प्लॅटचा दरवाजा एका साध्या वेषातील पोलीस कर्मचाऱ्याने उघडला होता. दोन साध्या वेषातील पोलीस कर्मचारी त्या प्लॅटची बडदास्त ठेवत होते. किचनमध्ये स्वयपाक चालू होता तर शेजारीच असणाऱ्या ऑफिसमध्ये तेलगी चहा बिस्किटाचा आस्वाद घेत होता. तेलगीने पोलीस व्यवस्था कुठेपर्यन्त पोखरली आहे याचा हा ढळढळीत पुरावाच होता. काही पोलीस शिपाई व कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या जीवावर पोलीस कोठडीतून सील केलेल्या प्लॅटमध्ये राहण्याचा धाडस तेलगी करु शकत नव्हता.

यासाठी एखादे उच्चपदस्थ अधिकारी सहभागी असल्याचा संशय होता. कर्नाटकच्या पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ एक अहवाल तयार करुन मुंबई पोलीसांकडून तपास काढून घेवून तो केंद्रिय गुप्तचर खात्याकडे वर्ग करावा असा अहवाल दिला होता. अहवाल पाहताच जयप्रकाश प्रधान यांनी तिथेच ही बातमी तयार केली होती व म.टा.प्रतिनिधी म्हणून सोर्स कळू न देता ती छापण्यात आली होती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.