यूपीत कॉंग्रेसचे आमदार फक्त 2 आणि युपीतले राज्यसभेवर नेते गेलेत 3 ; नेमकं काय कारण

उत्तर प्रदेशात विधानसभेतल्या एकूण ४०४ जागांपैकी भाजपच्या किती जागा आहेत ?? तर २६८ आणि काँग्रेसच्या ? तर २..

होय फक्त दोन जागा काँग्रेसकडे आहेत. एक वीरेंद्र चौधरी आणि दुसऱ्या म्हणजे, आराधना मिश्रा. काँग्रेसचे दिग्गज नेते प्रमोद तिवारींच्या कन्या. कधीकाळी स्ट्रॉंग राहिलेल्या काँग्रेसचे इथे फक्त २ आमदार असावेत याशिवाय पक्षाचं मोठं अपयश काही नाही. 

जुन्या गोष्टींवर बोलायचं नाहीये तर ताज्या घडामोडींवर फोकस करूयात,

उत्तर प्रदेशात फक्त २ आमदारांची ताकद असून काँग्रेसने ३ नेते राज्यसभेवर पाठवलेत. ते नेते म्हणजे, राजस्थानमधून प्रमोद तिवारी, महाराष्ट्रातून इम्रान प्रतापगढ़ी आणि छत्तीसगडमधून राजीव शुक्ला यांना राज्यसभेवर पाठवले आहे.

त्यामागचं कारण – राजकारण काय असू शकतं ???

मुद्दा स्पष्ट आहे, काँग्रेसला पडता काळ असला तरीही काँग्रेस डोक्याने खेळतोय हे ही लक्षात घेतलं पाहिजे…

या ३ नेत्यांमधील २ नेते ब्राह्मण आहेत तर १ मुस्लिम नेता आहे. या ३ नेत्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा काँग्रेसच्या निर्णयाला योगायोग म्हणताच येणार नाहीये.  त्यासाठी सविस्तरपणे बघूया,

इम्रान प्रतापगढी यांना निवडण्याचं कारण म्हणजे, 

उत्तर प्रदेशमधील मुस्लिम समाजात आपला जनसंपर्क वाढविण्यासाठी तसेच प्रदेशातील २० टक्के मुस्लिमांना एकटवण्यात काँग्रेस कामाला लागलीये त्यातल्या त्यात मुस्लीम तरुणांना आपल्याकडे खेचण्यासाठी इम्रान यांचा बराचसा फायदा पक्षाला होऊ शकतो कारण ३४ वर्षीय तरुण नेते इम्रान प्रतापगढी यांची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे.  

तसेच काँग्रेसच्या जाहीर उमेदवारांपैकी ते सर्वात तरुण उमेदवार ठरले आहेत. २०१९ मध्ये काँग्रेसकडून त्यांनी प्रियांका गांधींची सासुरवाडी म्हणजेच युपीच्या मुरादाबादमधून लोकसभा निवडणुक लढवली होती मात्र ते हरले होते तरी देखील पक्षाने २०२१ मध्ये त्यांना काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी दिलीय. 

हिंदी आणि उर्दू या दोन्ही भाषांवर त्यांचे चांगले प्रभुत्व आहे.  ते मुस्लिमांच्या शिक्षणाचा पुरस्कार करतात, तसेच मुस्लिमांचे हक्क आणि त्यांच्या राजकीय प्रश्नांवर त्यांचा अभ्यास आहे. तसेच भारतातच नाही तर परदेशातही त्यांनी मुशायऱ्यांमध्ये सहभाग घेतला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत देखील प्रतापगढी हे काँग्रेससाठी स्टार प्रचारक होते. 

उत्तर प्रदेशातील मुस्लीम समाजात इम्रान प्रतापगढी यांचे महत्त्व पाहता काँग्रेसला त्याचा राजकीय फायदा मिळू शकतो. इम्रानच्या राज्यसभेत येण्याने मुस्लिमांमध्ये पक्षाबद्दल चांगलीच छाप निर्माण होईल, असे मानले जात आहे. त्यामुळे काँग्रेसला मुस्लिम व्होट बँकेचा फायदा होणार आहे.

प्रमोद तिवारी आणि राजीव शुक्ला यांना निवडण्याचं कारण म्हणजे दोन्ही काँग्रेसचे जुने अन दिग्गज नेते आहेत.

ठाकूर, यादव आणि ओबीसी मतदार अजूनही काँग्रेसच्या आवाक्याबाहेरचे आहेत. अशा परिस्थितीत प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा जुनं फॉर्मेट वापरतांना दिसतंय. प्रमोद तिवारी आणि राजीव शुक्ला यांची यूपीतल्या ब्राह्मण गटावर चांगली पकड आहे. ती अधिक मजबूत व्हावी याचे प्रयत्न चाललेत.

उत्तर प्रदेशात सवर्ण मतदारांची संख्या सुमारे २३ टक्के आहे. त्यातील सर्वात जास्त म्हणजेच जवळपास १२ ते १४ टक्के ब्राह्मण मतदार आहे. बाकी राजपूत आणि कायस्थ यांचं प्रमाण आहे.  १४ टक्के ब्राह्मण मतदार जे थेट विधानसभेच्या ११५ जागांवर प्रभाव टाकतात. अशी १२ जिल्हे आहेत जिथे १५ टक्क्यांहून अधिक ब्राह्मण समाजातून येतात. 

त्यापैकी बलरामपूर, बस्ती, संत कबीर नगर, महाराजगंज, गोरखपूर, देवरिया, जौनपूर, अमेठी, वाराणसी, चंदौली, कानपूर, अलाहाबाद हे प्रमुख आहेत. इतकेच नाही तर पूर्व ते मध्य, बुंदेलखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेश अशा जवळपास १०० जागांवर ब्राह्मण मतदारांची संख्या फारशी नसली तरी थोड्याबहुत प्रमाणावर हा समाज त्या-त्या जागांवर प्रभाव टाकतो. 

राजकीय वातावरण निर्माण करण्याची किंव्हा बिघडवण्याची ताकद या ब्राम्हण गटात आहे असं म्हणलं जातं.

या जातीची व्होट बँक संपूर्णपणे कोणत्याही राजकीय पक्षाने कधीच काबीज केलेली नाही. उलट हे सवर्ण गट कायमच स्वत:च राजकीय पक्षांमध्ये आपलं वर्चस्व असल्याचा दावा करत आलेत. 

१९९० पूर्वीचा काळ पाहिला तर, उत्तर प्रदेशच्या सत्तेवर ब्राह्मण आणि राजपुतांचे वर्चस्व होते. त्यानुसार, उत्तर प्रदेशला ८ ब्राह्मण मुख्यमंत्री आणि ३ राजपूत मुख्यमंत्री मिळालेले आहेत.

इथे सर्वाधिक प्रमाणात समाजवादी पक्ष आणि बसपाने ब्राह्मणांना आकर्षित करण्यात यश मिळवले आणि सत्तेची चव चाखलीय. सद्या इथे भाजपची सत्ता आहे, सत्ताधारी पक्ष देखील ब्राह्मणांना एकत्र करण्यात बिझी आहे. 

अशा परिस्थितीत काँग्रेस देखील जेंव्हा जेंव्हा संधी मिळेल तेंव्हा तेंव्हा ब्राह्मण आणि मुस्लिमांचे आम्हीच हितचिंतक आहोत असं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे.

यातले प्रमोद तिवारी यांची राजकीय ताकद पाहूया,

उत्तर प्रदेशातील प्रतापगडमधील संग्रामगडचे रहिवासी प्रमोद तिवारी यांचा राजकीय प्रवास मोठा आहे. त्यांचा प्रवास विद्यार्थीदशेतून सुरू झाला. त्यांच्या नावावर सलग ९ वेळा निवडणूक जिंकण्याचा विक्रम नोंद आहे. १९८० मध्ये त्यांनी पहिल्यांदा रामपूर खास विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकले. ते दोन वेळा राज्यमंत्रीही राहिलेत. 

२०१३ ते २०१८ पर्यंत ते राज्यसभेचे सदस्यही होते. आता पुन्हा एकदा ते राजस्थानमधून खासदार म्हणून राज्यसभेवर गेले आहेत. 

रामपूर खास विधानसभा मतदारसंघातून ते सलग १० वेळेस आमदार राहिले आहेत.  

त्यांची मुलगी आराधना मिश्रा २००२ च्या यूपी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आल्यात, त्या उत्तर प्रदेश विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्याही आहेत.

राजीव शुक्ला यांच्याबाबत बोलूया,

राजीव शुक्ला हे प्रियांका गांधींचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांची पत्नी म्हणजे भाजप नेते रविशंकर प्रसाद यांची बहीणन तसेच टीव्ही अँकर आणि BAG फिल्म्स कंपनीच्या चेअरपर्सन अनुराधा प्रसाद या आहेत. राजीव शुक्ला यांनी राजीव शुक्ला यांनी एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या हाताळल्या आहेत. 

  • २००० मध्ये ते अखिल भारतीय लोक क्रांती काँग्रेस पक्षाकडून पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य झाले होते. 
  • २००३ मध्ये त्यांचा लोक क्रांती काँग्रेस हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाला, 
  • त्यानंतर शुक्ला काँग्रेसचे प्रवक्ते बनले. 
  • २००६ मध्ये ते अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे सचिव बनले.
  • २००६ मधेच ते पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून गेले.
  • २००८ ते २०१३ पर्यंत त्यांनी आयपीएल  चे अध्यक्ष म्हणून काम पाहिले.
  • २०११ मध्ये ते BCCI संचालित IPL चे अध्यक्ष बनले.
  • २०१२ मध्ये पुन्हा एकदा आयपीएलच्या अध्यक्षपदी निवड झाली.
  • आणि नुकतेच ते राज्यसभेवर पोहोचलेत.

पत्रकार, टीव्ही होस्ट, आयपीएलचे अध्यक्ष, संसदीय नियोजन आणि कामकाज राज्यमंत्री अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्यात. त्यांनी हाताळलेले पदं आणि त्यांचा दांडगा अनुभव पक्षाच्या कामी येऊ शकतो म्हणूनच त्यांनाही पक्षाने राज्यसभेवर पाठवल्याचं स्पष्ट होतं.

थोडक्यात जात, धर्म, पार्श्वभूमी आणि अनुभव या सर्वांचा मेळ घालून पक्षाने या तिन्ही नेत्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला.

उत्तर प्रदेशातील विधानसभा पार पडल्यात आणि येत्या लोकसभा निवडणुकीला अजून वेळ असला तरीही काँग्रेसची ही रणनीती उत्तर प्रदेशात नव्या राजकारणाची नांदी ठरणार हे फिक्सयं..

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.