आझाद हिंद सेनेचा कोट्यवधींचा खजिना कोणी लुटला ?

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भोवतीचे गूढतेचे वलय कधीही कमी होत नाही. कधी त्यांचा मृत्यूहा कट असल्याच्या चर्चा असतात तर कधी गुमनामी बाबा म्हणजेच नेताजी अशीही चर्चा असते. बंगाली लोकांना विचारलं तर ते आजही नेताजी जिवंत आहेत हे ठासून सांगतील.

एकूणच नेताजींच्या बद्दलचं प्रेम आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाच गारुड भारतीय जनमानसावर अजूनही टिकून आहे. स्वातंत्र्याला सत्तर वर्षे झाली मात्र नेताजींच्या बद्दलचे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित राहिले आहेत.

असाच एक प्रश्न आझाद हिंद सेनेच्या खजिन्याबद्दल देखील विचारला जातो.

गोष्ट आहे १९४५ सालची. दुसरे महायुद्ध अंतिम टप्प्यात आले होते. दोस्त राष्ट्रे सर्व आघाड्यांवर जर्मनीचा पराभव करत होते. अमेरिका देखील पर्ल हार्बरच्या हल्ल्यानंतर युद्धात उतरली होती. सुरवातीला त्यांच्यावरही भारी पडणारी जपानी सेना मागे पडू लागली होती.

जपानच्या मदतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्वतंत्र भारताचे अंतरिम सरकार स्थापन केले होते. त्यांच्या आझाद हिंद सेनेने भारताच्या नैऋत्य सीमेला धडक मारली होती. मात्र जपानच्या पिछेहाटीमुळे आझाद हिंद सेनेलादेखील माघार घ्यावी लागत होती.

जपानची मदत आपल्याला फार काळ टिकणार नाही याचा अंदाज सुभाषबाबूंना आला होता. याची तयारी त्यांनी आधीपासूनच केली होती. आर्थिक आधार असावा म्हणून आझाद हिंद बँकेची स्थापना केली होती. युद्धासाठी निधी हवा म्हणून जगभरातील भारतीय समुदायाला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. जपान, म्यानमार, इंडोनेशिया इथे राहणाऱ्या हजारो भारतीयांनी तशी मदत करण्यास सुरवात देखील केली होती.

सुभाषबाबूंची कीर्ती एवढी प्रचंड होती की स्त्रिया आपले सौभाग्यलंकार देखील काढून आझाद हिंद सेनेला देऊ लागल्या.

रंगून इथल्या सभेत हबीब साहेब नावाच्या एका व्यक्तीने आपली सगळी संपत्ती, जमीन जुमला दागिने विकून त्यातून आलेले एक कोटी तीन लाख रुपये दान दिले,याबदल्यात फक्त सुभाष बाबुंचा एक खाकी गणवेश आठवण म्हणून मागून घेतला. याच सभेत हिराबेन नावाच्या एका स्त्रीने त्याकाळी लाखो रुपयांचा असलेला मोतीजडित हार देखील आझाद हिंद सेनेच्या झोळीत टाकला होता. 

४२ कोटी रुपयांची सर्वात मोठी देणगी रंगूनचे सुप्रसिद्ध व्यापारी चलैया नाडर यांनी दिली.

२३ जानेवारी १९४५ रोजी सुभाषबाबूंच्या जन्मदिनी त्यांची तुला करण्यात आली. त्यादिवशी देखील प्रचंड मोठा निधी या सुवर्णतुलेत घालण्यात आला. हा सर्व पैसा आझाद हिंद बँकेच्या फंड मध्ये जमा करण्यात आला.      

download 2

पुढे जेव्हा शत्रूचा जोर वाढला तेव्हा सुभाषबाबूंना रंगून मधून माघार घ्यावी लागली. त्यांनी थायलंड व सिंगापूरमध्ये मोर्चा वळवला. रंगून मधील मुख्यालय सोडलं तेव्हा सुभाषबाबू आझाद हिंद बँकेचा फंड १७ बॉक्समध्ये भरून बँकॉकला गेले. तिथे  सरकारचे काही कर्जे फेडली. जवानांचे पगार दिले व इतर काही कारणांसाठी काही खर्च केली.

तरीही जपानी अधिकाऱ्यांच्या मते त्यांच्याजवळ दीडशे किलो सोनं होतं.

पुढे अमेरिकेने जपानवर दोन अणुबॉम्ब टाकले आणि जपानने आपला पराभव मान्य केला व आत्मसमर्पण केले. आझाद हिंद सेनेला देखील शरणागती पत्करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. याच दरम्यान सुभाष बाबू मांचुरिया येथे जाण्यासाठी निघाले होते तेव्हा त्यांच्या कडे दोन चामड्याचे बॉक्स भरून आझाद हिंद सेनेचा खजिना देण्यात आला. ज्यात मुख्यतः ज्वेलरी होती. याचे वजन साधारणपणे २०-२० किलो असावे.

सुरवातीला सुभाषचंद्र बोस हे एवढी रक्कम घेऊन जाण्यास तयार नव्हते मात्र मागे राहिलेल्या सहकाऱ्यांनी ही जबाबदारी स्विकारण्यास नकार दिल्यामुळे अखेर सुभाषबाबूंना तो खजिना विमानात न्यावा लागला.

आझाद हिंद सेनेचे सरसेनापती जग्गनाथराव भोसले यांनी विमानतळावर त्यांची शेवटची भेट घेतली व सर्व खजिना त्यांच्या विमानात चढवला. फक्त आपल्या हातातलं सोन्याचं घड्याळ मात्र सुभाषबाबूंनी काढून त्यांना दिलं व भारतात परतल्यावर वापस कर असं सांगितलं.

मात्र हा सुभाषबाबूंचा शेवटचा प्रवास ठरला. तैवान नजीक त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या वेळी विमानात त्यांच्याबरोबर कर्नल हबीब ऊर रहमान होते. विमान जेव्हा जमिनीवर कोसळले तेव्हा सुभाषबाबू व ते या दोघांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला पण प्रचंड सामान असल्यामुळे विमानाचं दार बंद झालं होतं. आगीतूनच धावत हे दोघे बाहेर आले. त्यांना जापनीज सैनिकांनी स्ट्रेचरवर उचलून हॉस्पिटल वर नेलं.

असं म्हणतात की चेहरा व शरीरावर भाजून मोठ्या जखमा झाल्यामुळे सुभाष बाबुंचा तिथेच मृत्यू झाला.

कर्नल हबीब उर रहमान मात्र सुरक्षितपणे वाचले. त्यांना जेव्हा शुद्ध आली तेव्हा त्यांनी विमानात असलेल्या खजिन्याची चौकशी केली. त्यावेळी असं सांगण्यात आलं की अख्ख विमान जळलं असल्यामुळे फक्त काहीच सामान वाचलं आहे. यातली ज्वेलरी लष्कराच्या मुख्यालयात पाठवण्यात आली असल्याचं सांगितलं आहे.

पुढे बरे झाल्यावर कर्नल हबीब यांना जपानला नेण्यात आलं तेव्हा त्यांच्यासोबत त्याच विमानात हा लाकडी बॉक्स मध्ये सीलबंद करून हा खजिना देखील जपानला पाठवण्यात आला. १० सप्टेंबर १९४५ रोजी कर्नल हबीब यांनी राममूर्ती यांना हा खजिना टोकियोच्या हेड क्वार्टर वरून आपल्या ताब्यात घेतला. हबीब यांचं म्हणणं आहे कि जेव्हा त्यांनी ते बॉक्स पाहिले तेव्हा त्याचे सील उघडून परत लावलेलं सरळ सरळ कळत होतं. बॉक्सचं वजन देखील हलकं झालं होतं.

आझाद हिंद सेनेच्या दीडशे किलो सोन्याच्या खजिन्यातुन फक्त ११ किलोचे दागिने उरले होते.

कर्नल हबीब घर फाळणीनंतर पाकिस्तानला गेले. जाताना त्यांनी राममूर्ती यांना आझाद हिंद सेनेच्या उत्तराधिकाऱ्याकडे हि संपत्ती जमा करण्यास बजावले. हि सगळी संपत्ती राममूर्ती यांच्याकडे १९४५ ते १९५१ या दरम्यान राहिली. त्यांनी ती बँकेत देखील ठेवली नाही ना त्यांनी भारत सरकारशी याबद्दल संपर्क केला.

राममूर्ती यांना याबद्दल विचारल्यावर त्यांचं म्हणणं होतं की त्यांनी आझाद हिंद सेनेचे माजी प्रसिद्धीप्रमुख अय्यर यांच्याशी याबाबत बोलणं झालं होत.

अय्यर यांनी त्यांना सुभाषबाबूंच्या अस्थींचा वाद मिटू दे मग यावर आपण खजिन्याचा विषय मार्गी लावू असं सांगितलं होतं.

पंडित जवाहरलाल नेहरू आपले पहिले पंतप्रधान बनले तेव्हा त्यांना टोकियोमधून पत्र पाठवण्यात आलं की आझाद हिंद सेनेची संपत्ती टोकियो मध्ये ठेवण्यात आली आहे. अय्यर  अस्थींचा तपास करण्याच्या निमित्ताने टोकियोला आले व त्यांनी राममूर्ती यांच्याकडून ही सगळी संपत्ती भारतीय दूतावासात जमा करून घेतली.

पुढे भारताच्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय म्यूजियममध्ये हा अकरा किलोचा खजिना ठेवण्यात आला.

4c23b6140058af03e1385bffa6eb862a5aa7e1dd

पण आजही या खजिन्याबद्दल वाद आहे. अनेकांचा छाती ठोकपणे दावा आहे की हा खजिना अय्यर आणि राममूर्ती यांनी संगनमत करून लुटला. जपानमध्ये पेपरात एकेकाळी कंगाल असणारे राममूर्ती व त्यांचा भाऊ मोठमोठ्या कार मध्ये फिरतोय व त्यांच्याकडे इतके पैसे कुठून आले याबद्दलची बातमी देखील छापून अली होती असं म्हणतात.

जपानमधून टोकियो मिशनने नेहरू सरकारला राममूर्ती यांच्याबद्दल अनेक पत्रे पाठवन्यात आली मात्र परराष्ट्र खात्यातर्फे आझाद हिंद सेनेच्या खजिन्यात भारत सरकारला रस नाही असे उत्तर देण्यात आल्याचं सांगण्यात आलं.

उलट अय्यर यांची नियुक्ती पंचवार्षिक योजनेचे सभासद म्हणून केली.

०३ नोव्हेंबर १९५५ रोजी जवाहरलाल नेहरू यांनी संसदेत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी आझाद हिंद सेनेचे माजी अधिकारी शाहनवाज खान यांची एक चौकशी कमिटी बसवली. यात सुभाषबाबुंचे बंधू सुरेशचंद्र बोस आणि सनदी अधिकारी एस एन मैत्रा होते.

या कमिटीने जो रिपोर्ट संसदेपुढे ठेवला यात एक अध्याय आझाद हिंद सेनेच्या हरवलेल्या खजिन्याबद्दल होता.

त्यांनी अनेकजणांचे साक्षी जवाब घेतले पण हा खजिना कोणी लुटला याचे ठोस पुरावे मात्र कधीच समोर आले नाहीत. काही जण म्हणतात की जपानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी यातला मोठा वाटा नेताजींच्या अपघातावेळी पळवला होता. तर अनेकांचा दावा आहे की तो अय्यर आणि राममूर्ती या जोडगोळीनेच पळवला.

गेल्या काही वर्षांपूर्वी मोदी सरकारने नेताजींच्या फाईली पुन्हा उघडल्या तेव्हा त्या निमित्ताने ही चर्चा पुन्हा सुरु झाली. पण आजही याचे गूढ संपलेले नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.