रागाने लालबुंद झालेला इंझमाम स्टेडियममध्ये घुसला आणि ‘आलू आलू चिडवणाऱ्याला धुतले.

गोष्ट आहे नव्वदच्या दशकातली. भारत पाकिस्तान वैर पूर्वापार चालत आलेल पण क्रिकेटच्या मैदानात ते त्वेषाने लढल जायचं. प्रेक्षक तर त्याहूनही खुंखार व्हायचे. मॅच हरल्यावर टीव्ही फोडला जायचा. पॅव्हेलीयनमध्ये आपआपसात मारामारी ठरलेली असायची. काही काही वेळा खुर्च्या जाळलेली उदाहरणे देखील आहेत. मात्र खेळाडू सोबत प्रेक्षकांची मारामारी होण्याचा एकमेव प्रसंग घडला होता.

१९९७ सालची ही घटना घडली होती टोरांटो कॅनडामध्ये. गंमत म्हणजे या सिरीजचं नाव होत भारत पाकिस्तान फ्रेन्डशिप सहारा कप.

भारताच कप्तान होता सचिन आणि पाकिस्तानचा कप्तान होता रमीझ राजा. सचिनची टीम तुलनेने नवीन होती. अझरूद्दीन आणि जडेजा हे दोनच तसे अनुभवी खेळाडू सचिनच्या सोबतीला होते. नाही तर देबाशिष मोहोंती, अॅबे कुरविल्ला, निलेश कुलकर्णी, साबा करिम असे अनेक नवे चेहरे खेळत होते. रॉबिनसिंग, गांगुली,द्रविड यांना येऊन सुद्धा जास्त काळ झाला नव्हता.

पाकिस्तानी टीम वासिम वकार या नेहमीच्या तगड्या बॉलर्स शिवाय आली होती मात्र तरीही त्यांची टीम स्ट्रॉंग वाटत होती. रमीझ राजाला वाटले देखील की आपण भारताला सहज हरवून टाकू.

मात्र घडल उलटच.

अगदी पहिल्या मॅच पासून सचिनच्या टीमने पाकिस्तानवर राज्य केलं. गांगुली तेव्हा विशेष फॉर्म होता. पहिली मॅच आपण त्याच्या बॉलिंग मुळे जिंकली. दुसऱ्या मॅच वेळी कुरविल्ला, मोहंती, गांगुली या भारतीय बॉलर्सनी पाकिस्तानच्या चिंधड्या उडवल्या, अवघ्या ११६ धावात पाकवाले ऑल डाऊन झाले.

जेव्हा भारताची बॅटिंग सुरु झाली तेव्हा आपला विजय  फक्त सोपोस्कर उरला होता.

भारतीय प्रेक्षक बेभान झाले होते. यापूर्वी पाकिस्तानला आपण एवढ रडवलं नव्हतं. पाक फॅन्स तर अगदी चिडीचूप झाले होते. पाकिस्तानी खेळाडूदेखील खांदे पाडून फिल्डिंग करत होते. सगळ काही ठीक चालल होतं. भारताची एक विकेट पडली होती तरी आपण मजबूत स्थितीत होतो.

अचानक सोळाव्या ओव्हरच्या दरम्यान बाउन्ड्रीलाईन जवळ काही तरी गोंधळ झाला.

पाकिस्तानचा इंझमाम उल हक मैदानातून थेट स्टेडियमच्या गर्दीत घुसला आणि एका प्रेक्षकाला त्याने बडवायला सुरवात केली.

कोणाला काहीच कळेना की काय चाललय. इतक्यात मागून एका राखीव पाकिस्तानी खेळाडूने इंझमामच्या हातात बॅट दिली.

धिप्पाड जनावरांसारखा दिसणारा इंझमाम कोणाच्या तरी डोक्यात बॅट घालतोय की काय असच वाटत होतं.

पोलीस धावत आले. बाकीच्या प्रेक्षकांनी देखील इंझमामला पकडल मात्र तो कोणाला आवरणारा नव्हता. त्याने जमिनीवर बॅट आपटली. काही तरी महाभयंकर घडलय असच वाटत होतं.

इंझमाम उल हक हा तसा शांत खेळाडू. कधी कोणाच्या अध्यात नाही न मध्यात नाही. कोणाशी त्याची भांडणे आहेत अस ऐकिवातही नाही. बोलताना चालताना सुद्धा निवांत हलत डुलत हत्तीसारखा वागणारा म्हणून तो फेमस होता.

मग त्या दिवशी अस काय झाल की इंझीचा कंट्रोल सुटला?

वेगवेगळे अंदाज केले जात होते की त्याला प्रेक्षकामधून कोणी तरी आईवरून शिवी दिली असेल. कोणाला वाटल धर्मावरून किंवा देशावरून चिडवल असेल. पण तस काही नव्हत.

इंझमामला आलू आलू म्हणून चिडवल म्हणून राग आला होता.

ज्याने हे केल त्याच नाव शिवकुमार धिंड. तो कॅनडास्थित भारतीय माणूस. तो व त्याचा मित्र विक्की अगदी सुरवातीपासून वेगवेगळ्या प्लेयर्सच्या खोड्या काढून आसुरी आनंद मिळवत होते. त्यांनी भारतीय खेळाडूना सुद्धा सोडल नव्हत. अझरुद्दीनला संगीता बिजलानीला घटस्फोट दिला म्हणून चिडवल तर देबाशिष मोहंतीला सावळ्या रंगावरून कालिया, कालिया म्हणत होते.

एक मोठा कर्णा घेऊन त्यातून हा चिडवण्याचा प्रकार सुरु होता.

सगळेच खेळाडू वैतागले होते पण दुर्लक्ष करत होते. पण जेव्हा त्यांनी इंझमामला मोटा आलू म्हणून चिडवायला सुरवात केली तेव्हा मात्र सहनशक्तीचा अंत झाला. तो चिडलाय हे बघून शिवकुमार जास्त चेकाळला. त्याच्या सोबतचे साथीदार त्याला प्रोत्साहन देऊ लागले आणि स्टेडियमभर आलू आलूचा नारा सुरु झाला.

उखडलेल्या बटाट्याने आपल्या पेक्षा निम्म्या साईजच्या शिवकुमार धिंड ला ओढून ओढून मारले.

तिथून प्रचंड राडा सुरु झाला. कॅनडामध्ये मॅच असूनही दोन्ही देशातून आलेल्याचे प्रेक्षकांचे प्रमाण खूप आहे. हे सगळे लोक हमरीतुमरीवर आले होते. पोलीसाना देखील ते आवरत नव्हते. यात खूप वेळ गेला.

आता मॅच कॅन्सल होऊन भारताच्या हाता तोंडाशी आलेला विजय निसटून जातो की काय अस वाटत होतं.  

अखेर रमीज राजा आणि सचिन तेंडूलकर मैदानात आले त्यांनी शांततेच आवाहन केल. मग कुठे सामना सुरु झाला. गांगुली, द्रविड आउट झाल्यावर अझर आणि सचिनने संयमाने खेळून मॅच जिंकून दिला.

पण अजून गोंधळ संपला नव्हता. मॅच रेफ्रींनी झालेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करून इंझमामला 2 सामन्यासाठी बॅन केले. पण यात समाधानी नसणाऱ्या शिवकुमार धिंडने इंझमाम विरुद्ध पोलीस कंप्लेंट केली.

पाकिस्तानच्या मॅनेजरने त्याला तक्रार मागे घेण्याची विनंती केली आणि याबदल्यात मॅचची तिकिटे देऊ केली. पण शिवकुमार यासाठी तयार झाला नाही. पाकिस्तानने दिलेले १०००० हजार डॉलर एवढे पैसे सुद्धा त्याने नाकरले.

शिवकुमारच्या हेकेखोरपणामुळे हा प्रश्न आणखी चिघळला होता. सगळ्या जगभरातील मिडियामध्ये ही क्लिप दाखवली जात होती.  जेवढे हे प्रकरण वाढेल तेवढी दोन्ही देशांची बदनामी होणार होती.

शिवकुमारला समजावून सांगण्यासाठी त्याला भारतीय ड्रेसिंग रूममध्ये भेटायला बोलवल.

शिवकुमार एका मुलाखती मध्ये सांगतो की तिथे सचिन अझर आणि जडेजा हजर होते. कधीकधी एखाद्या व्यक्तीचा संयम सुटतो आपण त्याला माफ केल पाहिजे अस ते त्याला समजावून सांगत होते. अझर आणि सचिनने तर त्याला आम्ही तुझ्या पाया पडतो पण ही कंप्लेंट मागे घे अस सांगितल. पण शिवकुमार सचिनला  म्हणाला म्हणे की,

“मै आपके लिये जान भी डे सकता हुं मगर कंप्लेंट पीछे नही लुंगा. इंडिया का प्राईम मिनिस्टर भी मुझे आके बोलेगा तब भी नही.”

हे ऐकून अजय जडेजा म्हणाला,

” तू इंडिया में होता तो डंडे से मना लेते “

सचिनची मध्यस्ती उपयोगाची ठरली नाही. इंझमामला पोलिसात हजर व्हाव लागल. त्याने धिंडच्या विरोधात कर्णा फेकून मारल्याची तक्रार नोंदवली. धिंडला ही पोलिसात आणण्यात आले.

अखेर दोघांनीही आपापली तक्रार मागे घेतली आणि अखेर या प्रकरणावर पडदा पडला.

पुढे  ही सिरीज आपण ४-१ ने निवांत जिंकली. भारताचा पाकिस्तानवरचा हा सर्वात मोठा विजय होता. गांगुली मॅन ऑफ द  सिरीज झाला. पण शेवटपर्यंत चर्चा इंझमामला आलू म्हटल्याचीच झाली. आजही त्याला भारतात आलू या नावानेच ओळखल जातं.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.