९३ च्या स्फोटावेळी मुंबई पोलिसांनी गोळा केलेला महत्वाचा पुरावा RAW ने हातचा घालवला

९ मार्च १९९३. मुंबईचा नवापाडा भाग. तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये किरकोळ गुन्ह्यासाठी पकडलेल्या एका गुल मोहम्मद नावाच्या गुन्हेगाराने पोलिसांना सांगितले मुंबईत धमाका होणार आहे. पण त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं म्हणून कोणी याच्या कडे लक्ष दिल नाही.

बरोबर दोन दिवसांनी गुल मोहम्मद म्हणाल्याप्रमाणे खरोखर मुंबई हादरली.

१२ मार्चच्या दुपारी  १.३० ते ३.३० च्या दरम्यान मुंबईत विविध ठिकाणी १३ शक्तिशाली बॉम्बस्फोट करण्यात आले. ही स्फोट मालिका होती. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज,एअर इंडियाची इमारत, प्लाझा थिएटर, शिवसेना भवन अशा महत्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते. जवळपास २५७ नागरिक ठार झाले. १४०० च्या वर जखमी झाले. कित्येकांची ओळख ही पटू शकली नाही.

हा फक्त मुंबईवर नाही तर देशाच्या विरुद्ध घातपाती हल्ला होता.

देशाच्या आर्थिक राजधानीला धक्का देऊन भारताचा कणा मोडायचा विचार होता. पण यात कोणाचा हात आहे हा प्रश्न मुख्य विचारला जात होता. आरडीएक्स सारख्या घातपाती वस्तूंचा वापर करण्यात आला होता. तेव्हाचे संरक्षण खात्याचे सल्लागार ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलताना  ही स्फोटके एक तर  देहूरोड येथील कारखान्यात अथवा कराची येथे तयार होतात असे सांगितले.

घटना घडून गेल्यावर पोलीस व गुप्तचर यंत्रणा या महाभयंकर घटनेचे सूत्रधार व गुन्हेगार शोधण्यासाठी अत्यंत वेगाने कार्यरत झाले. 

मुंबई पोलीसच्या टीमने वरळी भागातल्या एका व्हॅन मध्ये एक न फुटलेला बॉम्ब व शस्त्रास्त्रे शोधून काढले. आपल्या हुशारीसाठी आणि कार्यक्षमतेसाठी मुंबई पोलीस जगभरात फेमस होती. राकेश मारिया यांच्या धडाडीच्या नेतृत्वाखाली शेकडो अटक सुरु झाले. त्या मारुती व्हॅनवरून टायगर मेमन याच्या घरापर्यंत मुंबई पोलीस पोहचली.

अंडरवर्ल्डचा यामागे हात आहे हे एव्हाना सिद्ध झाले होते. टायगर मेमन पासून ते दाऊद इब्राहिमपर्यंत अनेकांची नावे समोर आली पण हे केव्हाच सीमापार जाऊन पोहचले होते.

पण फक्त मुंबईचे अंडरवर्ल्ड डॉन एवढं मोठं पाऊल उचलण्याचं धाडस करतील असं पोलिसांना वाटत नव्हतं. त्यांना जरूर पाकिस्तानची मदत झाली होती. पण यासाठी ठोस पुरावे मिळणे आवश्यक होते.

मुंबई पोलिसांनी गोळा केलेल्या पुराव्यामध्ये एक हॅन्ड ग्रेनेड, एक बॉम्बचा टायमर आणि काही एके४७ रायफल्स मिळाले होते.

पाकिस्तानी कनेक्शन शोधण्यासाठी भारताची विख्यात गुप्तहेर संघटना रॉची टीम पंतप्रधानांच्या सांगण्यावरून मुंबईला आली होती. पोलिसांनी त्यांच्याजवळचे हे अतिमहत्वाचे पुरावे रॉकडे सोपवले.

तो हॅन्डग्रेनेड ऑस्ट्रियन कंपनीचा होता, टायमर अमेरिकन कंपनीचा होता तर एके ४७ रायफल्स चिनी होती. पंतप्रधान नरसिंह राव यांनी सर्व देशांना या पुराव्याबद्दल संपर्क करण्याचे आदेश दिले.

चीनने तर सर्वप्रथम हात वर केले. त्यांचं म्हणणं होतं की

आमच्या फॅक्ट्रीमध्ये सध्या रजिस्टर गायब असल्यामुळे या गन्स आमच्या इथे बनले आहेत की  माहिती देता येणार नाही. 

ऑस्ट्रिया चा एक्सपर्ट भारतात आला तेव्हा त्याने मान्य केले कि हे ग्रेनेड ऑस्ट्रियन बनावटीचे आहेत. मात्र ते पाकिस्तानमध्ये ऑर्डनन्स फॅक्ट्री मध्ये तयार झाले आहेत. काही काळापूर्वी ऑस्ट्रियाने पाकिस्तानी सरकारला हे ग्रेनेड बनवण्याचे मशीन आणि टेक्नॉलॉजी हस्तांतरित केलेली होती. तिथेच हा बॉम्ब तयार झालेला असू शकतो.

सेम असच टायमरच्या बाबतीत देखील झालं होतं. ऐंशीच्या दशकात अमेरिकेने पाकिस्तानला शस्त्रास्त्रांची मदत केली होती त्या मदतीत हा टायमर देखील होता. अमेरिकेने हे मान्य केले तर भारताला सबळ पुराव्यानिशी पाकिस्तान सरकारपुरस्कृत हा दहशतवादी हल्ला आहे हे सिद्ध करता आले असते. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळी वर कोंडी करण्याची संधी होती.

अमेरिकेतून एक अँटी टेरेरिजम स्क्वाड पुराव्याची पाहणी करण्यासाठी मुंबईला आले. रॉच्या अधिकाऱ्यांनी त्यांना हा टायमर दाखवण्यात आला. या टीमने त्या टायमर पाहिला मात्र त्याची तपासणी करण्यासाठी तो अमेरिकेला घेऊन जाण्याची मागणी केली.

हा विषय तेव्हा रॉचे बॉम्बब्लास्टची पाहणी करणारे प्रमुख बी. रमण यांच्याकडे आला.

रमण यांनी यापूर्वी अमेरिकेच्या सीआयए सोबत काम केलं होतं. त्यांचा अमेरिकन गुप्तचर संघटनेवर विश्वास होता. त्यांच्या आदेशामुळे रॉने अमेरिकी टीम कडे तो टायमर सोपवला.

पुढे काही दिवस गेले. रमण यांना अमेरिकेतून एक छोटं पत्र आलं. या पत्रात हा टायमर अमेरिकेत तयार झाला होता व तो पाकिस्तानला पाठवलेल्या मदतीचा भाग होता हे मान्य केलं होतं. रमण यांनी या पुराव्याच्या आधारे पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली. पण अमेरिकेने याला नकार दिला. त्यांचं म्हणणं होतं की

पाकिस्तानच्या कारखान्यातून टायमर, हँन्ड ग्रेनेड, एके ५६ रायफल्स चोरीला गेलेल्या असू शकतात. यात पाकिस्तान सरकारचा किंवा त्यांच्या आयएसआय या संघटनेचा हात नाही.

रमण यांचा विश्वासघात करत अमेरिकन सीआयएच्या टीमने पलटी मारली होती.

भडकलेल्या रॉच्या अधिकाऱ्यांनी अमेरिकेला टायमर मागितला तर त्यांचा रिप्लाय आला की

सीआयएच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाहणी असताना एक अपघात झाला आणि तो टायमर त्यात नष्ट झाला.

अमेरिकेचं हे बालिश उत्तर बघून बी.रमण यांनी डोक्याला हात मारून घेतला. याचाच अर्थ या बॉम्बस्फोट हल्ल्याची माहिती अमेरिकन सीआयए असण्याची शक्यता होती. मात्र त्यांनी आपले नाव समोर येऊ नये म्हणून थेट पुरावाच नष्ट केला आणि भारताने  गमावली.

हा किस्सा बी.रमण यांनी आपल्या द काव बॉईज ऑफ रॉ या पुस्तकात सांगितला आहे.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.