आयकर विभागाच्या कारवाईमुळं अजितदादा अडचणीत?
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर, आता राष्ट्रवादी काँग्रेसला दुसरा मोठा धक्का बसला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना आयकर विभागानं नोटीस पाठवली आहे.
नोटीस पाठवण्यासोबतच आयकर विभागानं अजित पवारांच्या सहकारी कारखान्यासह काही मालमत्तांवर तात्पुरती जप्ती आणली आहे. ही संपत्ती जवळपास १००० कोटींची आहे.
या मालमत्तेवर झालिये तात्पुरत्या जप्तीची कारवाई:
- जरंडेश्वर साखर कारखाना – किंमत अंदाजे ६०० कोटी
- पार्थ पवार निर्मल ऑफिस – २५ कोटी
- गोव्यातलं रिसॉर्ट – २५० कोटी
- महाराष्ट्रातल्या जमिनी- जवळपास ५०० कोटी
- दक्षिण दिल्लीतला फ्लॅट – २० कोटी
आयकर विभागाच्या निशाण्यावर पवार
गेल्या महिन्यातच आयकर विभागानं दोन रिअल इस्टेट ग्रुप आणि अजित पवारांच्या नातेवाईकांच्या मालमत्तांवर छापे मारत १८४ कोटींच्या मालमत्तेचा शोध लावला होता. आयकर विभागानं ७ ऑक्टोबरला ७० पेक्षा जास्त ठिकाणी छापे मारले होते. त्यात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या प्रोप्रायटरशिपमधल्या अनंत मार्क्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आणि अजित पवार यांच्या बहिणींच्या मालकीतील कंपन्यांचाही समावेश होता.
सोमय्यांचे आरोप आणि तक्रार
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बेनामी संपत्ती केल्याचा आरोप केला होता. पवार कुटुंबाचे जावई आणि अन्य सदस्यांच्या बँक अकाऊंट्समध्ये कोट्यवधी रुपये ट्रान्सफर झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.
सोबतच आयकर विभागानं मारलेल्या छाप्यांमध्ये १ हजार ५० कोटी रुपयांची बेनामी संपत्ती समोर आली आहे आणि १८४ कोटी रुपयांची रोख रक्कम, दागिने, आर्थिक व्यवहारांची कागदपत्रं आयकर विभागाच्या हाती लागली आहेत, असंही सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हणलंय.
या प्रकरणात अजित पवार काय म्हणाले होते
आयकर विभागाचं छापासत्र सुरू असताना, अजित पवार यांनी त्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली होती. ते म्हणाले होते, मला आपल्याविरुद्धच्या शोधात कोणतीच अडचण नाही, परंतु माझ्या बहिणींना यात विनाकारण गोवणं चुकीचं आहे.
त्यामुळे आता अजित पवार आयकर विभागाच्या नोटिशीला काय उत्तर देतात? आयकर विभाग आणखी कुठली कारवाई करणार का? अजित पवार आणखी अडचणीत येणार का? या प्रश्नांची उत्तरं मिळण्यात महाराष्ट्राच्या जनतेची दिवाळी पार पडणार हे नक्की.
हे ही वाच भिडू:
- अजित पवारांना छळणाऱ्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची सुरवात १८५७ च्या उठावामुळे झाली होती
- अजित पवार अडचणीत आले ते जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरण नेमक आहे तरी काय?
- किरीट सोमय्यांच्या रडारवर कोणाचे जावई आलेत ?