आता लाल टोपी वाले इनकम टॅक्सच्या टार्गेटवर

सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांना टार्गेट करणं हा नेहमीचाचं विषय असतो. त्यात निवडणूका आल्या कि, काय विचारायलाच नको.  विरोधकांचं नाक दाबून बुक्यांचा मार कसा द्यायचा याचे प्लॅन सत्ताधारी आखत असतात. या घटनांचा पार जुना इतिहास आहे. त्यात आता या प्लॅनमध्ये सरकारी यंत्रणांचा सुद्धा वापर केला जातो. म्हणजे इनकम टॅक्सची  रेड टाकून विरोधी पक्षाचा कारभार चव्हाट्यावर आणणं हा त्यातलाच एक भाग.

आपल्या महाराष्ट्रात हे सत्र अधून मधून सुरूच असतं. पण आता उत्तर प्रदेशात ऐन निवडणुकीच्या आधी या रेड सेशनला सुरुवात झालीये. ज्यात सध्या लाल टोपीवाले इनकम टॅक्सच्या रडारवर आहेत.

लाल टोपीवाले म्हणजेच अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षातले. काही दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदी यांनी त्यांना हि उपाधी दिलीये. त्यांनतर समाजवादी पक्षातल्या मंडळींना लाल टोपीवाले म्हणण्याची प्रथा सुरु झालीये. असो,

आता गंभीर विषय म्हणजे पक्षातल्या ३ मोठ्या नेत्यांच्या ठिकाणांवर इनकम टॅक्सची ही रेड पडलीये. ज्यात मऊमध्ये सपाचे राष्ट्रीय सचिव राजीव राय, लखनऊमध्ये जैनेंद्र यादव आणि मैनपुरीमध्ये मनोज यादव यांच्या घरांवर हे छापे टाकले गेलेत.  सकाळी ७ वाजल्यापासून या भागांमध्ये कारवाई सुरू आहे.

महत्वाचं म्हणजे हे तिन्ही नेते सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या जवळचे आहेत आणि पक्षाचे मोठे फायनान्सर मानले जातात. त्यात अखिलेश मुख्यमंत्री असताना जैनेंद्र यादव हे यांचे ओएसडीही सुद्धा होते. आता एकाच दिवसातल्या विभागाच्या या तीन वेगवेगळ्या कारवायांमुळे राज्यात मोठी खळबळ उडालीये.

इनकम टॅक्सच्या आजच्या कारवाईचा रुटीन जर पाहिला तर शनिवारी सगळ्यात आधी सकाळ सकाळी बातमी ७ वाजण्याच्या सुमाराला मऊ येथील राजीव राय यांच्या शहादतपुरा येथील निवासस्थानावर छापे टाकल्याची बातमी आली. राय यांनी २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. ते सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांचे जवळचे मानले जातात.

राजीव राय हे सुरुवातीपासून सपाशी जोडले गेलेले आहेत. राज्यातला भूमिहार नेता म्हणून त्यांची ओळख. तो मूळचे बलिया येथील आहे. मऊ, बलिया आणि गाझीपूर प्रदेशात त्यांचा भूमिहार समाजात दबदबा आहे.  राजीव राय यांनी घोसीमधून निवडणूक लढवावी, अशी अखिलेश यादव यांची इच्छा आहे. त्यासाठी तीन महिन्यांपूर्वी ते मऊ येथे शिफ्ट झाले. नुकताच त्यांनी तिथं घरं घेतलं असून तिथं आपलं जनसंपर्क कार्यालय सुद्धा उघडलं आहे.

राय यांच्या मालमत्तेविषयी बोलायच झालं तर, त्यांची दुबई आणि बंगळुरू येथे मेडिकल कॉलेज आहेत. तसेच इतरही व्यवसाय आहेत. इनकम टॅक्सच्या छाप्याचे वृत्त समजताच त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने त्यांच्या घरी पोहोचले आणि भाजप सरकारच्या विरोधात घोषणा द्यायला लागले.

राजीव राय यांच्या घराची झडती सुरु असतानाचं आयकर पथकाचा दुसरा ताफा लखनऊमधल्या जैनेंद्र यादव यांच्या गोमती नगर येथील निवासस्थानी पोहोचला. अखिलेश मुख्यमंत्री असताना त्यांची ओएसडी म्हणून कारभार पाहिलाय.

यानंतर जैनेंद्र यादव यांनी रिअल इस्टेटमध्ये पाऊल ठेवले. आग्रा, लखनऊ आणि इतर अनेक शहरांमध्ये जैनेंद्र यांच्या अनेक जमिनी आहेत. याशिवाय त्यांचा मिनरल वॉटरचा कारखानाही आहे.

यानंतर काही वेळातचं इनकम विभागाचा १२ गाड्यांचा ताफा मनोज यादव यांच्या मैनपुरी येथील घरावर पोहोचला.  मनोज यादव हे लखनऊ मधले मोठे व्यापारी आहेत, ते RCL समूहाचे अध्यक्ष सुद्धा आहेत. आणि बऱ्याच काळापासून ते मैनपुरीमध्ये जिल्हा पंचायत अध्यक्षपद भूषवत आहेत.

आता हे तिन्ही नेते समाजवादी पक्षातले महत्वाचे आणि अखिलेश यादव यांच्या जवळचे. त्यांच्यावरच कारवाई म्हंटल्यावर अखिलेश यादव गप्प बसणाऱ्यातले थोडीना आहेत. त्यांनी रायबरेलीत लगेच प्रकारावरून भाजपवर निशाणा साधला. त्यांनी म्हंटले कि,

‘ आता फक्त आयकर वाले आले आहेत. ईडी आणि सीबीआय येणं अजून बाकी आहे. भाजपच्या पराभवाची भीती जितकी वाढेल तितकी विरोधी पक्षांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या छाप्यांचा फेऱ्या सुद्धा वाढतील. अशा छाप्यांमुळे त्यांचा पक्ष अजिबात घाबरत नाही, उलट अशा छाप्यांमुळे भाजप एक्सपोज होत आहे.’

दरम्यान इनकम टॅक्सच्या या छाप्याकडे राजकीय दृष्टिकोनातूनही पाहिले जातेय. कारण येत्या काही महिन्यामध्येचं उत्तरे प्रदेशात विधानसभेच्या निवडणूक आहेत. त्यामुळे सत्ताधारी भाजप अखिलेश यादव यांच्या नेत्यांची गळचेपी करण्याच्या प्रयत्नात असल्याचं बोललं जातंय.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.