पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब टाकणार होता.. पण ? 

वर्ष १९९९. अटलबिहारी वाजपेयी यांना शांततेचं नोबेल मिळवायचे आहे अशी टीका विरोधकांनी सुरु केली. कारण घडलं होतं त्यांच्या बस यात्रेचं. 

नवाज शरीफ यांना भेटण्यासाठी वाजपेयी लाहोरला बसमधून गेले. पाकिस्तानसोबत शांततेचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी वाजपेयी प्रयत्न करत होते. आणि नवाज शरीफ आणि त्यांचं सैन्य मात्र त्याचकाळात गुप्तपणे एक कारस्थान रचत होतं. 

अतिशय खालच्या पातळीवर जाऊन विचार करणारं पाकिस्तान समुद्रसपाटीपासून १७००० फूट उंचीवर असलेल्या कारगिलमध्ये आपल्या सैन्याला घुसखोरांच्या रुपात कारवाईसाठी तयार करत होतं. नवाज शरीफ एकीकडे वाजपेयींशी शांततामय मार्गाने वाटाघाटीचं नाटक करत होते आणि दुसरीकडे मुशर्रफ कारगिलमध्ये कुटील डावपेच आखत होते. 

मुशरर्फ स्वातंत्र्याच्या आधी दिल्लीवासी. निर्वासितासारखं दिल्ली सोडून पाकिस्तानात जावं लागलं त्यांच्या कुटुंबाला फाळणी झाल्यावर. मुशर्रफ काश्मीर पाकिस्तानचा भाग आहे याबाबत कट्टर. अर्थात मुशर्रफ काय किंवा नवाज शरीफ काय, पाकिस्तानात नेमकं कोण निर्णय घेतं हे जगाला कधीच कळत नाही. पण पाकिस्तानी लष्कर आणि सत्ताधारी एकाच माळेचे मणी आहेत हे आता जगाला माहित झालंय. 

अटलबिहारी वाजपेयी यांची नेहरुंप्रमाणेच फसवणूक झाली. नेहरुंना जसं चीनने हिंदी चीनी भाई भाई घोषणेत अडकवून ठेवलं आणि आक्रमण केलं तसाच प्रकार पाकिस्तानने वाजपेयींच्या बाबतीत केला. वाजपेयी बस यात्रेत मग्न होते. त्यांना आता शांतता जवळ दिसत होती. तेवढ्यात पाकिस्तानने कारगिल सुरु केलं. 

जगाच्या दृष्टीने कारगिल युध्द भयंकर होतं कारण एक वर्ष आधी भारताने अणु चाचणी केली होती. आणि त्याला तोडीस तोड उत्तर पाकिस्तानने आणखी मोठी अणुचाचणी करून दिलं होतं. दोन्ही देश अणुबॉम्ब बाळगून असल्याने जगातले इतर देश चिंतेत होते. 

एक अणुबॉम्ब केवळ पाच मिनिटात मुंबईच्या दिशेला येऊन किमान दीड लाख ते साडे आठ लाख लोकांचा जीव घेऊ शकत होता. 

अमेरिका पाकिस्तानची सगळी कुंडली ओळखून होती. कारण प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत रडकी मुलं भोकाड पसरतात तसं पाकिस्तानी सत्ताधारी अमेरिकेपुढे हात पसरतात. या प्रश्नावर बिल क्लिंटन यांनी अमेरिकेत चर्चा सुरु केली. 

ब्रूस रायडेल हे या प्रश्नातले जाणकार. त्यांनी american diplomacy and the 99 kargil summit मध्ये या प्रकरणातल्या काही गुप्त गोष्टी खूप खुलासेवार लिहिल्यात. 

पाकिस्तानसाठी अमेरिका नेहमीच मोठ्या भावाच्या भूमिकेत होती. अमेरिकेसाठी पाकिस्तान हे एक मवाली पोर. त्याला दारू बिडीला पैसे दिले की कुठेही वापरून घेता येईल असा अमेरिकेचा उद्देश. पण कारगिल युद्धात क्लिंटन यांनी अचानक पाकिस्तानच्या बाजूने उभं राहायला नकार दिला. शरीफ आणि मुशरर्फ यांना माघार घ्यायला निरोप पाठवले. पण तसं काही घडत नव्हतं. युद्धाची तीव्रता वाढत होती. भारताला गाफील राहिल्याचा खूप तोटा झाला होता. एवढ्या उंचावर युध्द लढण सोपं नव्हतं. खूप नुकसान सोसावं लागत होतं. दोन्ही बाजू जीवाची बाजी लावून लढत होत्या. पण इथे भारतीय सैन्याने आपली जिगरबाज वृत्ती दाखवून दिली होती. 

लढाईत पाकिस्तान हातघाईला आला होता. भले पाकिस्तानी सैन्यासाठी ही लढाई आपल्या मानाने सोपी होती. पण भारतीय सैन्याच्या पराक्रमापुढे त्यांना हवं तसं यश मिळवता येत नव्हतं. शेवटी जगभर होणारी नाचक्की आणि युद्धाचा वाढत जाणारा खर्च याने खचून जाऊन शरीफ यांनी बिल क्लिंटन यांना फोन करून रडगाणी गायला सुरुवात केली. 

मदत करा म्हणून टाहो फोडू लागले. शेवटी माघार घेणार असाल तर भेटायला या असा निरोप क्लिंटन यांनी  दिला. शरीफ ४ जुलैला अमेरिकेला निघाले. आता देव नाही क्लिंटनच त्यांची इज्जत वाचवणार होते. या सगळ्या चर्चेत क्लिंटन यांच्यासोबत ब्रूस रायडेल सहभागी होते.

शरीफ यांना दोन चिंता होत्या. एकतर अमेरिकेचं ऐकलं तर मानहानीकारक माघार घ्यावी लागणार होती. दुसरीकडे मुशरर्फ यांचं ऐकलं तर लढतच रहावं लागणार होतं. जे झेपणारं नव्हतं.

क्लिंटन यांनी चर्चेच्या सुरुवातीलाच शरीफ यांना सांगितलं की बरं झालं तुम्ही ४ तारखेला आला. मला पाच तारखेला अमेरिकेतल्या काही गरीब राज्यांना भेटी द्यायच्यात. तिथे गरिबी हटाव कार्यक्रम हाती घेतलाय. हे ऐकून हा गरीब नव्हे तर दरिद्री देशाचा पंतप्रधान लाचारपणे आपला गरिबी हटाव कार्यक्रम रेटू लागला. शरीफ यांना वाटत होतं की अशा वेळी अमेरिकेने काही पैसे दिले तर भारताला भीती वाटेल. 

शरीफ त्यासोबत भारताने आधी अणुबॉम्ब चाचणी केली असे सांगू लागले. जणू काही ते अमेरिकेला माहीतच नव्हते. पण क्लिंटन आधी माघार मग पुढची चर्चा किंवा मदत यावर ठाम होते. त्यानंतर मग शरीफ यांनी आग्रह धरला की बाकीचे लोक नको आपण दोघेच चर्चा करू. या भ्रष्ट पाकिस्तानी नेत्याला चार लोकांमध्ये चर्चा करण्याची तशीही सवय उरलीच नव्हती. पण क्लिंटन यांनी ब्रूस रायडेल सोडले तर बाकी लोकांना बाहेर पाठवून दिलं. 

शरीफ पुन्हा दोघेच बोलू असा आग्रह करू लागले. पण क्लिंटन यांना भेटीचं रेकॉर्ड ठेवायचं होतं. त्यांनी ऐकलं नाही. क्लिंटन यांनी स्पष्टपणे पाकिस्तानची भारतावर अणुबॉम्ब टाकायची तयारी होती असं शरीफ यांना सुनावलं. शरीफ यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. उलट भारत असं करणार असं सांगितलं. पण क्लिंटन यांना त्यांच्या सहकाऱ्यांनी सगळी माहिती आधीच दिली होती. नवाज शरीफ यांच्याकडे उत्तर नव्हतं. आता नवाज शरीफ यांना क्लिंटन यांनी सांगितल्याप्रमाणे माघार घ्यावी लागणार होती. त्यांनी त्याप्रमाणे तयार असलेल्या कागदावर सही केली. 

अणुबॉम्बचा वापर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानला पुन्हा एकदा भारतासोबतच्या युद्धात लज्जास्पद रित्या माघार घ्यावी लागली. 

अमेरिकेत हे जाहीर करून नवाज शरीफ यांना आपल्या देशात जायची भीती वाटत होती. पुढ पदोपदी अमेरिकेच्या जीवावर त्यांना जीवदान मिळत गेलं. 

आपल्याच देशातल्या लोकांनी आपल्याला मारू नये म्हणून अमेरिकेपुढे लाचार होणारे नवाज शरीफ पाकिस्तानशी तरी किती प्रामाणिक असतील काय माहित ? पण त्यांच्या लाचारीमुळे आणि क्लिंटन यांच्या कठोर निर्णयाने एक भयंकर बॉम्बस्फोटाची योजना बारगळली. 

Leave A Reply

Your email address will not be published.