गॅबावर ऑस्ट्रेलियाची ठासणारे टीम इंडियाचे भिडू सध्या काय करतात ?

तुटा है गॅबा का घमंड, जीत गया ये मुकाबला भारत, बॉर्डर गावसकर ट्रॉफी जायेगी गावसकर के देश…

विवेक राझदानच्या आवाजातले हे शब्द भारतीय चाहते आयुष्यात विसरु शकत नाहीत. ज्या ब्रिस्बेनच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया कधीही टेस्ट मॅच हरली नव्हती, तिथं भारतीय संघानं अशक्य वाटणारा विजय मिळवून दाखवला. विशेष म्हणजे, त्या विजयी संघात विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, आर. अश्विन यापैकी एकही हुकमी एक्का नव्हता. मात्र तरीही भारतानं नवख्या खेळाडूंच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला असलेला गॅबाचा माज मोडून काढला.

रिषभ पंत, शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज या तरण्या पोरांनी कांगारुंचा बाजार उठवला आणि त्यांना साथ दिली, ती तिखट ऑस्ट्रेलियन माऱ्यासमोर भिंत बनून उभ्या राहिलेल्या चेतेश्वर पुजारानं. अंगावर कित्येक बॉल आदळले, तरी पुजारा बधला नाही आणि अखेर पंतच्या धडाक्याच्या जोरावर भारतानं मॅच मारलीच.

ती मॅच जिंकल्यावर भारतीय टीमचा विजयी फोटो प्रचंड व्हायरल झाला, आजही कित्येकांच्या स्टेट्सला हाच फोटो आहे. त्या विजयाच्या वर्षपूर्ती निमित्त, या व्हायरल फोटोमधले भिडू सध्या काय करतायत, कोण टीममध्ये आहे आणि कोण नाही, याची ही झलक.

कॅप्टन अजिंक्य रहाणे-

आपल्या टीमचा लाडका जिंक्स. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रहाणेनं संघाचं नेतृत्व स्विकारलं. ॲडलेड टेस्टमध्ये भारतानं मजबूत मार खाल्ल्यावर मेलबर्न टेस्टमध्ये रहाणेनं दमदार सेंच्युरी ठोकली. भारतानं ती मॅच मारत इतिहास रचला. पुढं टीममधले खेळाडू एका मागोमाग एक इंज्युर्ड झाल्यावर त्यानं नव्या पोरांना जबरदस्त प्रोत्साहन दिलं. मात्र त्यानंतर रहाणेचा फॉर्म इतका बेक्कार गंडला, की आता त्याला टीममध्ये रहाणेही कठीण आहे.

भिंत 2.0 उर्फ चेतेश्वर भाऊ पुजारा-

पोरं बॉलिंग टाकून थकतील, अंगावर बाउन्सर टाकून थकतील, पण हा गडी थकायचं नाव घेणार नाही. २०१८ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुजारानंच कांगारुंना घाम फोडला होता. २०२०-२१ च्या दौऱ्यात पुजाराची बॅट शतक मारु शकली नाही, पण त्यानं लई जणांचा बाजार उठवला हेही तितकंच खरं. नुसतं क्रीझवर थांबून गडी भल्याभल्यांना घाम फोडत होता. सध्या मात्र पुजाराचाही फॉर्म गंडलाय, त्याच्या कसोटी संघात असण्यावरही आता टांगती तलवार आहे.

राडा करणारा रिषभ पंत-

गॅबावर खऱ्या अर्थानं धुरळा केला तो रिषभ पंतनं. त्याच्या नॉटआऊट ८९ रन्सनं विजय खेचून आणला. त्यानंतर पंतनं एकदा इंग्लंडला आणि एकदा आफ्रिकेला आपला तडाखा दिला. सध्या पंत भारतीय टीमसोबत अफ्रिकेत आहे आणि आता टेस्ट कर्णधारपदाच्या शर्यतीतला एक दावेदारही.

युवानेते शुभमन गिल-

तरण्याताठ्या शुभमन गिलनं ओपनिंगला येत ९१ मारले होते. त्या सिरीजनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल आणि आयपीएल वगळता गिल फारसा चमकला नाही. पण आगामी आयपीएलमध्ये पुन्हा कल्ला करुन, टीम इंडियात एंट्री मारायला तो उत्सुक असणार हे नक्की.

रोहित शर्मा (शेठ)-

भारताच्या व्हाईट बॉल टीमचं नेतृत्व आता रोहितच्या खांद्यांवर आहे. विराट कोहलीनं टेस्ट टीमची कॅप्टन्सीही सोडल्यानं साहजिकच तिथंही रोहितचा नंबर पहिला येऊ शकतो. सध्या दुखापतीमुळं त्याला टीमच्या बाहेर बसावं लागलंय, मात्र शेठ मैदानावर उतरतील तेव्हा राडा नक्की करतील.

मयांक अगरवाल-

गॅबानंतर मयांकनं भारतात न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या सिरीजमध्ये दमदार बॅटिंग केली. आफ्रिकेत भावाचा फॉर्म थोडा गंडला, पण पुढच्या संधीची वाट तो आतुरतेनं बघत असेल.

वॉशिंग्टन सुंदर-

मिशेल स्टार्क सारख्या बॉलरला मारलेला हुक, लायनला बॉलकडे न बघता मारलेला सिक्स आणि दोन्ही इनिंग्समध्ये केलेली फटकेबाजी, जोडीला चांगली बॉलिंग. यामुळं सुंदर चांगलाच लक्षात राहिला. त्यानंतर इंग्लंड भारतात आलं तेव्हा सुंदर संघात दिसला, त्याची स्पर्धा थेट आश्विनशी असल्यानं त्याची वाट तशी खडतरच आहे. साऊथ आफ्रिकेला जाणाऱ्या वनडे टीममध्ये त्याला स्थान मिळालं खरं, पण कोरोना झाल्यानं त्याची ही संधीही हुकली.

लॉर्ड शार्दूल ठाकूर-

नाव ऐकलं की गाव हालतंय. गॅबानंतरही भावानं धुमाकूळ घालणं सोडलं नाही. टीम इंडियाला अगदी गरजेच्या वेळी ब्रेक थ्रू मिळवून देणारा, लोअर ऑर्डरमध्ये येऊन रन्स करणारा शार्दूल तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा हुकमाचा एक्का आहे. सध्या साऊथ आफ्रिकेतही त्यानं लॉर्डगिरी दाखवावी असं, प्रत्येक भारतीय चाहत्याला वाटत असेल.

नवदीप सैनी-

भारताची ही स्पीडगन आयपीएलमध्ये म्हणावी तशी धडाडली नाही. आफ्रिकेत वनडे सिरीज खेळणाऱ्या भारतीय संघात मात्र सैनीनं स्थान मिळवलं आहे. पण विषय असा आहे की, बुमराह, भुवी, चहर, ठाकूर, सिराज या गर्दीत सैनीला संधी मिळणं तसं कठीणच आहे.

मोहम्मद सिराज-

टीम इंडियाच्या या लाडक्या ‘मियाँ’ नं आपल्या वडिलांच्या निधनाचं दुःख बाजूला सारत, या सिरीजमध्ये दमदार कामगिरी केली. गॅबावर त्यानं काढलेला पंजा अजूनही कित्येक लोक विसरु शकलेले नाहीत. सिराजनं व्हाईट बॉल टीममध्ये आपलं स्थान बळकट केलं असून, तोही आफ्रिकेविरुद्ध खेळतोय. त्याला आधी पडणारा मार पाहता,  त्याची कामगिरी सुधारत गेलीये, हे मात्र नक्की.

टी. नटराजन-

टीमसोबत फक्त नेट बॉलर म्हणून आलेल्या नट्टूनं, भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान तिन्ही फॉरमॅट्समधून पदार्पण केलं. गॅबावर झालेली चौथी टेस्ट ही तर त्याची पहिलीच टेस्ट होती. त्यानंतर नट्टू आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात दिसला नाही. आधी गुडघ्याची दुखापत आणि त्यानंतर कोविड झाल्यानं त्याला बऱ्याच संधी गमवाव्या लागल्या. आता आयपीएलच्या लिलावात सामील होऊन, नवी सुरुवात करण्याची आशा त्याला असेल. या सगळ्यात त्यानं आपल्या गावाकडं स्टेडियम बांधलंय, गावातल्या तरुण पोरांना खेळण्याची आणि क्रिकेट विश्वात चमकण्याची संधी मिळावी म्हणून.

गेल्या वर्षभरात आणखीही लई गोष्टी बदलल्या, तेव्हा आजी असणारे हेड कोच रवी शास्त्री, फिल्डिंग कोच आर. श्रीधर आणि बॉलिंग कोच भारत अरूण हे आता माजी झालेत. भारतीय टीमचं नेतृत्व बदललंय, पण ताकद आणि दरारा आजही तोच कायम आहे, हे नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.