मियाँदादने चेतन शर्माला ठोकलेल्या सिक्सरचा बदला ११ वर्षांनी पूर्ण झाला…

२०२१ चा टी२० वर्ल्डकप, भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच. भारत जिंकेल अशी शंभर टक्के खात्री होती, कारण भारतानं तोवर वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानकडून एकदाही हार खाल्ली नव्हती. मात्र या मॅचमध्ये कारभार गंडला. भारतानं थोड्या नाही तर १० विकेट्सनं मॅच गमावली.

२०२२ चा एशिया कप, वर्ल्डकपमध्ये झालेल्या पराभवाचा बदल घेण्याची पूर्ण संधी भारताकडे होती. भारतानं पहिली मॅच जिंकलीही, पण डू ऑर डाय मॅचला मात्र भारताचा पराभव झाला. एका वर्षाच्या आता भारताला पाकिस्तानकडून दोनवेळा हार स्वीकारावी लागली.

आता आज वर्ल्डकप मॅचमध्ये या दोन टीम्स पुन्हा एकदा भिडतील. वर्ल्डकप कॅम्पेनची सुरुवात विजयानं करायची इच्छा दोन्ही टीम्सला असेल, पण भारतीय चाहत्यांच्या मनात एकाच गोष्ट असेल तो म्हणजे बदला.

कारण कितीही म्हणलं तरी कणत्याही टीमकडून भारताची क्रिकेट टीम हरली की वाईट वाटतंच, पण मॅच इंडिया पाकिस्तान असली की पराभव पचवणं काहीसं जडच जातं.

२०२१ च्या वर्ल्डकपमध्ये बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानच्या नॉटआऊट पार्टनरशिपनं जशी जखम केली होती, अगदी तशीच जखम जावेद मियाँदादनं भारतीय चाहत्यांना दिली.

जावेद मियांदाद हा पाकिस्तानचा जबरदस्त खेळाडू होता. वर्षानुवर्षे जावेद मियाँदादने मारलेला तो शेवटच्या बॉलवरचा सिक्स भारतीयांना वाईट आठवण म्हणून आठवत राहतो. 

ते साल होतं १९८६. चेतन शर्माला त्याच्या ११ वर्षाच्या दीर्घ क्रिकेटसाठी कधीच ओळखलं गेलं नाही त्याला प्रसिद्धी मिळाली ती मियाँदादने मारलेल्या सिक्सरमुळे.

तो सुपरबॉल त्याने फेकला आणि जावेद मियाँदादने तो चेंडू थेट प्रेक्षकांमध्ये टोलवला होता. तो सिक्स मारल्याबरोबर सगळी पाकिस्तानी टीम मैदानात जल्लोष साजरा करत होते. भारताचा संघ नुसता टकमक करत चेतन शर्माकडे बघत होता.

शारजामध्ये हा सामना खेळवला गेला होता, २४५ धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानला शेवटच्या चेंडूवर ४ धावांची गरज होती. चेतन शर्माने लो फुलटॉस बॉल टाकला तो जावेदने थेट लोकांमध्ये पोहचवला. जानी दुष्मन असलेल्या पाकिस्तानकडून हा घाव भारतीयांच्या वर्मावर बसला होता.

हि जखम तोवर सलत राहिली जोवर संघात राजेश चौहान आलेला नव्हता.

राजेश चौहान हा तो माणूस होता ज्याने मियाँदादच्या त्या आठवणीतल्या सिक्सरचा बदला घेतला होता. त्या सिक्सरने पाकिस्तानची तोंडं बंद केली होती.

शेवटच्या बॉलवर तर नाही पण शेवटच्या ओव्हरमध्ये राजेश चौहानने षटकार मारून बहुअंशी त्या चेतन शर्माला पडलेल्या सिक्सरची भरपाई केली होती.

३० सप्टेंबर १९९७ मध्ये पाकिस्तानच्या २६५ धावांचा पाठलाग भारतीय संघ करत होता. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, मोहम्मद अझरुद्दीन, विनोद कांबळी, अजय जडेजा असे सगळे भारताचे नामी धुरंधर आउट झाले होते. ४ चेंडूत ६ धावांची गरज होती. त्यावेळी राजेश चौहान बॅटिंग करत होता. ड्रेसिंग रूममध्ये तो विनोद कांबळीला म्हणाला होता,

मैं बोलूं ना, तो मै करके दिखायगा भिडू !

समोर बॉलर होता मास्टर स्पिनर सकलेन मुश्ताक. मॅच एकदम रोमांचक स्थितीत आलेली होती. पण राजेश चौहान अशा कुठल्याही प्रकारच्या मूडमध्ये नव्हता. मॅच शेवटच्या बॉलपर्यंत नेण्याची तसदीही त्याने घेतली नाही. सकलेन मुश्ताकच्या तिसऱ्या बॉलवर षटकार लगावत राजेश चौहानने भारताला मॅच जिंकून दिली.

११ वर्षांनंतर भारताने बदला पूर्ण केला होता. राजेश चौहानने सिक्स मारल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये जे पाकिस्तानकडून हरण्याचं टेन्शन निर्माण झालं होतं ते राजेश चौहानच्या एका सिक्सने पूर्णपणे बदलवलं. सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली हे अक्षरशः ड्रेसिंग रुममध्ये नाचत होते. इतका महत्वाचा तो सिक्स होता.

भारतासाठी ११ टेस्ट मॅच आणि ३५ वनडे सामने राजेश चौहान खेळला. भारताला आजवर मिळालेल्या उत्तम ऑलराउंडर खेळाडूंपैकी राजेश चौहान एक होता. भलेही त्याला भारताकडून दीर्घकाळ खेळायचं भाग्य मिळालं नसेल पण राजेश चौहान फेमस झाला तो पाकिस्तानचा बदला पूर्ण केला या घटनेसाठी.

राजेश चौहानच्या बाबतीत अजून एक गोष्ट खास आहे ती म्हणजे तो ज्या २१ टेस्ट सामन्यांमध्ये खेळला त्यातला एकही सामना भारत हरला नाही.

आता आजच्या मॅचमध्येही भारताला एखादा राजेश चौहान मिळणार का ? आणि भारत २०२१ च्या वर्ल्डकप मॅचचा बदला पूर्ण करणार का हे महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.