१५ ऑगस्टची जिलेबी खाताय तर मग हे खास तुमच्यासाठी आहे !

कुछ उलझने अच्छी होती हैं औंर कुछ उलझने मिठी होती हैं !!!असच मिठीं उलझनं वाली डिश म्हणजे जिलेबी.

आज १५ ऑगस्ट आज सर्व भारत आपल्या भारतीय असण्याचा आनंद जिलेबी खावून साजरा करतो. कुठे कुठे जिलेबी खातात याची आम्ही चौकशी केली तर उत्तर आलं भारतातल्या सर्वच कोपऱ्यात. मराठवाड्यातले काही लोकं म्हणाले आम्ही जिलेबी खात नाही पण ते मुद्दाम म्हणाले असतील.  १५ ऑगस्टला क्रांन्तीवीर आणि तिरंगा न बघणारा आणि जिलेबी न खाणारा माणूस भारतीय असू शकतो का ? 

थोडक्यात काय तर १५ ऑगस्ट आणि जिलेबीचं नातं हे भारतीय असण्याचं प्रतिक. पण याची सुरवात कशी झाली मुळात जिलेबी आली तरी कुठून ? 

भारतीय म्हणून खाल्ली जाणारी जिलेबी खरतर भारतीय नाही. जिलेबीचा जन्म पर्शियन साम्राज्यातला. तेराव्या शतकात तुर्कीच्या मोहम्मद बीन हसन बगदादी यांनी किताब अल तबीक नावाचं पुस्तक लिहलं. या पुस्तकात खाण्यापिण्याचं लज्जतदार वर्णन करण्यात आलं आहे. यामध्येच जलाबिया अर्था जिलेबीचा उल्लेख आढळतो. 

जिलेबीचा लिखित स्वरुपात असणारा सर्वप्रथम उल्लेख याच पुस्तकात केला आहे. 

आत्ता पर्शियन सम्राजातून हि जिलेबी भारतात कशी आली तर ती मुस्लीम व्यापारी आणि मुस्लीम सम्राटांबरोबर. जिलेबी भारतात आली आणि तीच्या गोड स्वभावामुळे. त्यानंतर मात्र ती खऱ्या अर्थाने भारतीयांची होवून बसली.

भारतात जिलेबीचा उल्लेख आढळतो ते १४५० साली लिहलेल्या जैन समाजाच्या एका पुस्तिकेत. प्रियम पर्णर्पकथा नावाच्या ईश्वराच्या भक्तीचा मार्ग सांगणाऱ्या या पुस्तकात देवांसाठी असणाऱ्या पदार्थात जिलेबीचा उल्लेख केला आहे. यापुढं जायचं झालं तर जिलेबीचा उल्लेख आढळतो तो सतराव्या शतकात लिहलेल्या भोजना कुतूहला नावाच्या ग्रंथात. कंजीरच्या राणीच्या दरबारात असणाऱ्या रघुनाथ नावाच्या विद्वानानं हा ग्रॅंथ लिहला. यामध्ये जिलेबी कशी बनवायची याचा जो उल्लेख आहे त्यामध्ये आणि आजच्या जिलेबीत काहीच फरक नाही.

त्यानंतर मात्र आसेतू हिमाचल जिलेबी चालू लागली. त्याचं मुख्य कारण अस होतं की तिचं सर्वव्यापी असणं. जसा आपला भारत आहे तसच की वो. म्हणजे कस ? तर जिलेबी सोबत खाखरा, जिलेबी सोबत खीर प्रत्येक ठिकाणी असणाऱ्या विविधतेच्या पाकात जिलेबीचा स्वाद मोकळेपणाने बुडाला. त्यातूनच सुरू झालं ते जिलेबीचं सर्वव्यापी असणं. 

मात्र जिलेबी १५ ऑगस्टला का खातात ? 

याच उत्तर कोरापासून ते गुगलच्या कानाकोपऱ्यात सर्वत्र शोधलं. पक्कं कारण मिळालं ते अमिताभ बच्चन सारखं, परंपरा प्रतिष्ठा औंर अनुशासन.

सर्वच म्हणतात प्रथा आहे चालायचं. खाण्यासाठी प्रथा जपणारा तर आपला देश आहे. म्हणजे कस धुळवडीला मटण, पंचमीला पोळ्या, गणपतीला मोदक अस प्रत्येक भागात काहीना काही चालू असतं. त्याच सोबत रमजानला शिरखुरमा, ख्रिसमसला केक अस देखील असतं. आत्ता जिलेबी पुरोगामी असण्याचं एकमेव कारण म्हणजे हिंदू, मुस्लीम, शीख, ईसाई हम सब बेटे भाई भाई असणाऱ्या प्रत्येकाच्या घरात जिलेबी हा एकमेव पदार्थ दिमाखात असतो. तसहा सण आणि खाणं या पाठीमागे असणार लॉजिक आपण कधी शोधायला गेलोच नाही.जिलेबीची महती वाचल्यानंतर फक्त एकच शक्यता वाटते की हा एकमेव पदार्थ असा आहे की जो खऱ्या अर्थाने पुरोगामी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.