चीनच्या लुडबुडीमुळे भारत- भूतानचे पूर्वापार चालत आलेले संबंध बिघडण्यास सुरवात झालीय

भूतान हा भारताच्या शेजारील असा देश आहे जो भारताशी मजबूत संबंध प्रदर्शित करतो. या दोन्ही देशांमधील संबंध जगजाहीर आहे. कोरोना काळात हे सगळ्यांनीच पाहिलं. हे एक असे नाते आहे जे १९४९ पासून टिकून आहे. जेव्हा भारत-भूतान मैत्री करारावर स्वाक्षरी झाली ,ज्याने दोन्ही देशांमधील जवळच्या राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांचा पाया घातला.

पण आता भारत-भूतानच्या या मैत्रीत चीनने लुडबुड करायला सुरुवात केलीये. 

तर झालं असं कि, चार दिवसांपूर्वी म्हणजे गेल्या १४ ऑक्टोबरला भूतान आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांची आभासी बैठक झाली. यावेळी या दोन्ही देशांदरम्यान अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या सीमा विवादांचे निराकरण करण्यासाठी तीन-चरणांचा रोड मॅप करार करण्यात आला. सोबतच अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

आता भूतान आणि चीनच्या या बैठकीमुळे भारताची चिंता वाढली आहे. हो आता भारताने या कराराला सविस्तर प्रतिसाद दिला नाही, पण परंतु चीनसोबत सुरू असलेल्या तणावा दरम्यान या गोष्टी  दुर्लक्ष करण्यासारख्या देखील नाही.

त्यात चीनचं ठीक आहे तो या सगळ्या गोष्टी मुद्दाम घडवून आणतोय. पण भुतानचं काय? भुतान आणि भारत नेहमीच एकमेकांच्या सोबत असतात. पण आता भूतानची चीनसोबची ही  भूमिका भारताची चिंता वाढवणारी असून यावरून चीन दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये  निर्माण करण्याचा चीन प्रयत्न करतयं का असा प्रश्न निर्माण झालाय. 

आता सगळ्यात आधी भारत आणि भुतांच्या संबंधांवर नजर टाकायची झाली तर, भूतानची लोकसंख्या जवळपास आठ लाख आहे. आता कमी लोकसंख्येमुळे देशाची अर्थव्यवस्था लहान. त्यामुळे हा देश मुख्यत्वे भारतातील निर्यातीवर अवलंबून आहे. २००० ते २०१७ दरम्यान, भूतानला भारताकडून सुमारे ४.७ अब्ज डॉलरची मदत मिळाली, जी भारताच्या एकूण परदेशी मदतीचा सर्वात मोठा वाटा होता.

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाने १९६१ मध्ये सुरू केलेला दंतक प्रकल्प हा परदेशी भूमीवर राष्ट्र उभारणीसाठी हाती घेण्यात आलेला सर्वात मोठा प्रकल्प आहे. भारतीय सहाय्यानेच भूतानचा तिसरा राजा जिग्मे दोर्जी वांगचुक याने भूतान नियोजन आयोगाची पायाभरणी केली होती आणि तेव्हापासून भारत भूतानमध्ये चालू असलेल्या योजनांसाठी आर्थिक मदत देत आहे, जेणेकरून भूतानचा विकास थांबू नये.

सोबतचं आतापर्यंत भारत सरकारने भूतानमध्ये १४१६ मेगावॅटच्या तीन जलविद्युत प्रकल्पांच्या बांधकामाला पाठिंबा दिला आहे आणि हे प्रकल्प कार्यरत आहेत आणि भारताला वीज निर्यात करत आहेत. तर भारत हा भूतानचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे.

२०१८ मध्ये दोन्ही देशांमधील ९२२८ कोटी रुपयांचा  एकूण द्विपक्षीय व्यापार  होता. यामध्ये भारताकडून भूतानला निर्यात ६०११ ३२१७कोटी रुपये आणि भूतानमधून भारतात निर्यात ३२१७ कोटी रुपयांची नोंद झाली.

आता तसं पाहिलं तर चीनची सीमा १४ देशांशी आहे. त्यापैकी भारत आणि भूतान हे असे देश आहेत ज्यांच्याशी चीनचा सीमावाद अजूनही सुरू आहे. २०१७ मध्ये भारत आणि चीन यांच्यातील डोकलाम वाद या सीमा वादाचा परिणाम होता.

या करारापूर्वी भूतान आणि चीनमध्ये कोणतेही राजनैतिक संबंध नव्हते, तर भारत-भूतानचे खूप जवळचे संबंध आहेत आणि या दोन्ही देशांतमधले हे दृढ संबंध चीनला कधीच पटले नव्हते. त्यामुळेच या करारामागे चीनचा हेतू योग्य वाटत नाही. अर्थातचं या करारातून चीनला भूतान आणि भारत यांच्यात अंतर निर्माण करायचे आहे.

भूतानला चीन आणि भारत यांच्यातील बफर झोन असेही म्हटले जाते. कारण, भारतासाठी भूतानचे महत्त्व त्याच्या भौगोलिक स्थानामुळे अधिक आहे. १९५१ मध्ये चीनने तिबेटला जोडल्यानंतर भूतानचे भारतातील महत्त्व वाढले. भूतान भारताच्या पश्चिमेस अरुणाचल प्रदेश, आग्नेय आसाम आणि पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्याच्या सीमेवर आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर जाण्यासाठी व्हिसाची गरज नसते.

त्यातल्यात्यात विशेष गोष्ट म्हणजे चीन आणि भूतान या दोन्ही देशांमधील हा करार डोकलाम ट्राय जंक्शनवर भारत आणि चीन सैन्याच्या ७३ दिवसांच्या संघर्षाच्या चार वर्षांनी झाला आहे. चीनने भूतानने दावा केलेल्या भागात रस्ता बनवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा डोकलाममधील गोंधळ सुरू झाला.  

भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे भूतानमधील राजेशाही संपल्यानंतर, लोकशाही भूतान स्वतःच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणासाठी प्रयत्नशील आहे. या साखळीत, भारतासोबत मैत्रपूर्ण संबंधांव्यतिरिक्त, तो चीनसोबतही बॅलन्स बनवण्याचा प्रयत्न करतोय.मात्र  हो, भारताशी हितसंबंध जपून ठेवण्यासाठी भूतानने चीनच्या आकर्षणाकडे दुर्लक्ष केलंय.

पण ही  गोष्ट सुद्धा तितकीच खरी आहे कि, चीन भूतानशी औपचारिक राजकीय आणि आर्थिक संबंध निर्माण करण्यासाठी नेहमीच उतावळा असतो आणि नाही म्हंटल तरी भूतानचे लोक सुद्धा चीनबरोबर व्यापार आणि राजनैतिक संबंधांना पाठिंबा देत आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे येत्या काळात भारतासमोर आणखी काही आव्हाने निर्माण होऊ शकतात.

त्यामुळे भारताने आधीच ही चिंता दूर करण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे, कारण भूतानमध्ये चीनचा वाढत्या हस्तक्षेप भारत आणि भूतानमधील मजबूत द्विपक्षीय संबंधाला तडा जाण्याचा धोका आहे. आणि भारताच्या धोरणात्मक आणि मुत्सद्दी धोरणांसाठी भूतानची राजकीय स्थिरता अत्यंत महत्त्वाची आहे. 

हे ही वाचं भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.