दोन-तीन दिवसांपूर्वी चीन ने पुन्हा घुसखोरी केल्याच्या बातम्या आल्या, खरं काय आहे?

मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यात भारताच्या पुर्व लडाखमध्ये चीनने घुसखोरी केल्याच्या बातम्या आल्या. त्यानंतर एका महिन्याच्या आतच लडाखच्या गलवान खोऱ्यात संघर्षाचा भडका उडाला. यात तब्बल २० भारतीय सैनिक शहिद झाले आणि ४३ चीन सैनिक ठार झाले

आणि आता तीन महिन्यांच्या आत चिनी सैनिकांनी पँगाँग सरोवराच्या भागात भारतीय टेकड्यांवर कब्जा केल्याची बातमी जागतिक स्तरावरून प्रसिद्ध झाली. 

या मागील चार-पाच महिन्यांतील भारतात चीनच्या घुसखोरीच्या अशा साऱ्या बातम्या वाचनात आल्या. भारत – पाकिस्तान सीमेवर सतत तणाव असतोच. पण चीनची सीमा शांत असायची. पण मागील दोन महिन्यांपुर्वी तब्बल ४५ वर्षांनंतर भारत – चीन सीमा रक्तरंजीत झाली. चीनने पूर्व लडाखमधून सैनिकांना मागे हटवावे यावर भारत ठाम आहे. तर चीन मागे हटण्यास तयार नसल्याने दोन्ही देशातील चर्चा अपयशी ठरली.

सीमेवरील हा तणाव दूर करण्यासाठी भारत-चीनमधील लष्करी आणि राजनैतिक स्तरावर अनेक चर्चा चालू होत्या.

अशातच दोन दिवसांपुर्वी चीनने पुन्हा घुसखोरी केल्याच्या बातम्या आल्या.

शेकडो चिनी सैनिकांनी प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडून घुसखोरी करत पँगाँग सरोवराच्या भागातील भारताच्या हद्दीत असलेल्या दोन टेकड्यांवर कब्जा केला आहे. चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी पँगाँग त्सो सरोवराच्या दक्षिण भागात असलेल्या हेल्मेट टॉवर कब्जा केला आहे.

रविवारी ही घटना घडल्याचे वृत्त ‘बिझनेस स्टँडर्ड’ने दिले आहे.

चिनी सैनिकांनी भारतीय टेकड्यांवर फक्त कब्जाच केला नाही तर तिथे बांधकामही सुरू केले आहे. थाकुंग पोस्ट (Thakung post) येथील भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापटही झाली आहे. पण तिथे कुठलाही गोळीबार झालेला नाही. तसेच भारतीय जवानांची कुठलीही हानी झालेली नाही, अशी माहिती केंद्र सरकारमधील सूत्रांनी दिल्याचे बिझनेस स्टँडर्डने वृत्तात म्हटले.

चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत प्रवेश करुन भारतीय सैनिकांना उकसवून सीमेवरील जैसे थे स्थितीत बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. पण भारतीय सैनिकांनी त्यांना रोखले, असे भारत सरकारने म्हटले आहे. तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीन प्रशासनासोबतच्या चर्चेसाठी नकार दिला आहे.

भारतीय लष्कराने देखील या संबंधामध्ये निवेदन दिले असून या निवेदनानुसार,

“भारतीय सैन्याने पॅंगोंग त्सो तलावामध्ये चिनी सैन्यांना थांबविले. भारतीय सैन्य चर्चेच्या माध्यमातून शांतता पुर्नस्थापित करण्याच्या बाजूने आहे परंतु त्याचबरोबर आपल्या प्रदेशाच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी देखील कटिबद्ध आहे”.

भारतीय लष्कराच्या म्हणण्यानुसार २९ आणि ३० ऑगस्टच्या रात्री चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी म्हणजे पीएलए कडून ही घुसखोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चेपुझी कॅम्पवरून चीनच्या ७ ते ८ मोठ्या गाड्या भारतीय सीमेच्या दिशेने येत होत्या. परंतु सावध भारतीय सैनिकांनी हे होऊ दिले नाही.

तर चीन सरकारचे अधिकृत वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सच्या मते, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने असे म्हटले आहे की चीनचे सैन्य वास्तविक नियंत्रण रेषेचे काटेकोरपणे पालन करते आणि चीनी सैन्याने ही रेषा कधीच ओलांडली नाही.

  •  ऋषिकेश नळगुणे

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.